Thursday, November 21, 2024
Homeसाहित्यदिवाळी : काही कविता

दिवाळी : काही कविता

१. उठा दिवाळी आली

पहाटे उठावे, उटणे लावून स्नान करावे,
देवाला उष्णोदकाने न्हाऊ घालावे,
निरंजन लावावे, आरती करावी,
घरासमोर पणत्या, दिव्यांचा प्रकाश करावा,

बाहेरील व आतील अंधार निघून जावा,
पाहुण्यांनी घरे गजबजावी, आनंद वाढवा,
निरनिराळ्या फराळाची चैन व्हावी,
गप्पा रंगाव्या, आठवणी उजळून याव्या,

याहून अधिक ते काय, आनंद ओसंडून जाय,
प्रत्येकाकडे सण साजरा, प्रत्येक जण हासरा,
लक्ष्मी सगळ्यांना पावते, अन्नपूर्णा वर देते,
पूर्ण होती साऱ्या इच्छा, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा….!!!

— रचना : हेमंत भिडे.

२. दिवाई उनी…

दिवाई ऊनी दिवाई ऊनी
लेकना बिगर दिवाई सुनी
लयनारे भाऊ लेक ले मनी
लेक ना बिगर दिवाई सुनी..

तोंडभर हासी नि खुशाली पुसी
कशी से माय डोयास्मा देखी
भवजाया भासा बी व्हतीन खुस
घरम्हानं पई जाई बठ्ठजं दुःख …

ई लागी ई लागी माय मनी आक्का
घरम्हां गलका हासाना देखा
भाऊ म्हने बहिनले मुक्काम ठोका
बहिण म्हने भाऊले ववायनी टाका…

हसीखुसीम्हा भरी गे घर
जसा भरना घरमां दरबार
गलगलगलगल गोड ते वाटे
दखीनी मनमां हारीक दाटे…

गाय नि गोठा घरम्हां बोभाटा
चला जेवाले बठा पटपटा
मायनी रांधी पुरनपोयी
गोड लागनी भलती दिवाई…

— रचना: प्रा. सौ. सुमती पवार. नाशिक

३. मौज दिवाळीची

मौज दिवाळीची
वाटे मजला भारी
घराघरात करिती ताई आई
फराळाची तयारी

क्षण आनंदाचे घेऊन आली
आली दिवाळी माझ्या घरात
लाडू करंज्या चकली कडबोळी
अन् चिवडयाने भरली परात

लक्ष लक्ष दीप उजळत
सर्वांची लाडकी दिवाळी आली
दारी रांगोळी सजली
फुलांची तोरणे झुलू लागली

फटाक्यांसोबतच किल्ले बनवण्यात
बच्चे कंपनी रममाण झाली
लाडू करंज्या चकल्या खाऊन
आबालवृद्धांची रसना तृप्त झाली

घरं दुकानं कार्यालयं
दिवाळीच्या स्वागता सज्ज झाली
आकाशकंदिल आणि दिव्यांच्या माळा
पाहून मने प्रसन्न झाली

गीत संगिताच्या तालात
दिवाळी पहाट रंगली
भाऊबीजेच्या पवित्र सणाला
बहीण भाऊरायाला ओवाळी

दिवाळी म्हणजे आनंद
प्रेम आपुलकीचा सुगंध
तिमिराकडून तेजाकडे
मंत्र हा दिवाळीचा गोड मकरंद

— रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई

४. सण दीपावलीचा

दिवाळी पखरण करते आनंदाची |
दिवाळी उधळे गंधफुले सौख्याची ||धृ||

उंंच दारी कंदील लावलेला
स्वागतास तोरणे दीपमाळा
प्रेमाने निमंत्रण देतो मी तुम्हाला
या ना आमुच्या घरी दिवाळीला
संधी आली मनमुराद भेटण्याची ||१||

सुवासिक तेेल उटणे लावूनिया अंगाला
अभ्यंग स्नान झाले नरकचतुर्दशीला
लेक आली दिवस चार माहेराला
दामात पातले शुभदिनी पाडव्याला
तयारी गोड पक्वान्न अन फराळाची ||२||

मोद देई नातवांचा गोड कल्ला
धडाडधूूम फटक्यांचा आवाज घुमला
आला बहिणीकडे भाऊ, भाऊबीजेला
नातेवाईकांचा जमला गोतावळा
दिवाळी आठवण ठेवते नात्यांची ||३||

— रचना : प्रवीण देशमुख. कल्याण

सर्वांना दीपावली२०२४ च्या काव्यमय खूप हार्दिक शुभेच्छा ! Happy Diwali !

५. “सुखानंदाची दिवाळी”

दिवाळीच्या पहाटस्वप्नांना छान जाग यावी
मनामनातील सकल स्वप्ने छान बहरावी
पहाटसमयी सुगंधी उटणे स्नान करुनी
मनप्रसन्न भक्तीगीते, भावगीते ऐकावी

या प्रफुल्लित वातावरणी आनंदी होऊनी
एकमेका संवाद साधीत अमुल्य प्रेम द्यावे
हा जीवनानंद सोहळा यासाठी येतो जीवनी
वर्षभर साजरा करा उत्कट प्रेमानंद, जीवनी

पहाटचांदण्यांचा घ्यावा सुखद शिडकावा
सदैव साजरा करावा दीपावलीचा पाडवा
प्रेम, आपुलकीचा सुगंध सकलांना वाटावा
मिळेल तुम्हास जीवनी सदैव आनंद गोडवा

– रचना: मधुकर ए. निलेगावकर. पुणे

— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments