Home लेख संगती रंग : २२

संगती रंग : २२

0

“कळीचा नारद”

स्नेहल ऑफिसमध्ये रुजू झाली. तिनं प्रवेश करताच विद्याताईंनी हातात चॉकलेट देऊन तिचं स्वागत केलं. नमिता आणि मी दोघींनी तिला धरून तिला तिच्या डेस्कपाशी बसवलं. डिपार्टमेंट हेडनी स्वतः येऊन तिला पुष्पगुच्छ दिला.
“वेलकम स्नेहल !“ मजल्यावर असलेल्या सर्वांनी पुकारा केला.
“हे काय, सगळं ?” स्नेहल भांबावली.
“हे म्हणजे, तुझं स्वागत !“ वैदेहीने तिला मायेने थोपटत सांगितलं.
स्नेहलच्या ब्रेनमध्ये ट्यूमर कळल्यापासून आमचा ग्रुप तिची काळजी करतो आहे. तिला दडपण येईल म्हणून आम्ही कोणीही तिला भेटायला गेलो नाही. तिच्या घरी रोज एकीचा चौकशीचा फोन किंवा मेसेज जात असे. मग आम्ही ते एकमेकींना कळवायचो. ऑपरेशन पार पडलं. त्यानंतर रिपोर्ट नॉर्मल आल्याचा आनंद आम्ही साजरा केला व्हीडीओ कॉल वर !

पुरेशी विश्रांती घेऊन, अगदी नॉर्मल होऊन आज ती कामावर हजर झाली. सर्वांना ह्याचा आनंद झालेला होता.
लंचअवर मध्ये केक आणून तिच्या हातून तो कापला.
“किती छान वाटतंय.“ स्नेहल खुशीने उद्गारली.
जेवायला सुरुवात केल्यावर मग गप्पा रंगल्या.
“आज मला नॉर्मल वाटतंय, आपल्या ग्रुपमध्ये जेवायला मिळाल्यामुळे.”
“आम्ही खूप मिस करत होतो, स्नेहल ! “
“गंडान्तर टळलं.”
“देवाला काळजी !
मुलांना आई हवी ! टेक्नॉलॉजी आहे. निष्णात डॉक्टर आहेत. नातेवाईकांची मदत असेलच. तरीही मी मनोमन प्रार्थना हीच करत असे, देवा, बाळांच्या आईला सुखरूप ठेव. असं म्हणतात ना देवाचे हात सगळीकडे पोचू शकत नाहीत म्हणून त्याने आई या नात्याची निर्मिती केली ते मला पटतं अगदी… .आई ती आईच..”

विद्याताईंनी असं म्हटल्यावर स्नेहल भारावून म्हणाली, “खरं आहे हो अगदी, विद्याताई. मलासुद्धा वाटतं मुलांचं नशीब म्हणूनच मी ह्यातून पार पडले.”
“स्नेहल, तुझ्या सासूबाईंचं ब्लड प्रेशर खूप वाढलं होतं म्हणे. घरात दोन दोन संकटं….“ वैदेही म्हणाली.
“तुझं ऑपरेशन ठरल्यापासून त्यांना काळजी लागून राहिली असणार गं. त्यामुळे वाढलं बीपी.“ नमिता म्हणाली.

“खरं सांगू, त्यांचं ब्लडप्रेशर नातलगांनी वाढवलं. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी मला ऍडमिट केलं. त्या दिवसापासून कोणी ना कोणी घरी यायचं. इकडचे लोक बरे आहेत. फॉर्मल आहेत. त्रासदायक नाहीत. चुलतनणंद तर राहायला येऊ का हॉस्पिटलमध्ये असंसुद्धा विचारत होती. सासूबाईंकडची बरोबर नाहीत. म्हणजे श्रीच्या आजोळची म्हणते मी…”
“बरोबर नाहीत, म्हणजे काय ?”
“एकेक अतिरथी, महारथी ! एकेकाच्या कॉमेंट्स ऐकायला हव्यात. केवढं मोठं ऑपरेशन… आजपर्यंत फक्त ऐकून होतो आम्ही. पण हे घरातच असं. मेंदूचं ऑपरेशन किती कठीण. कुणी फसलेल्या सर्जरीच्या कहाण्या चालू करायचं. म्हणे अशा सर्जरीमध्ये माणूस वाचणं कठीण. वाचला तर त्याची मेमरी शाबूत रहाणं कठीण. ट्यूमर म्हणजे कॅन्सर असण्याची शक्यता असतेच. कुणा कुणाचं जनरल नॉलेज ! सगळे स्वयंघोषित तज्ञ ! माझी ताई अमेरिकेला आहे ना, तिकडे जायला पाहिजे असे कुणीतरी सल्ले अनाहूत देतंय …”

“बापरे ! म्हणजे धीर द्यायचा सोडून सगळं निगेटिव्ह बोलत राहायचं.”

“सांगते ना सासूबाईंकडची मंडळी थोरच आहेत. त्यात अंजूताईंनी तर हाईटच केली. धाकटं पिल्लू माझं, पहिलीत गेलंय. अगदी लाडोबा आहे, माहित आहे ना ! दादूला नीट सांगितलं होतं, आमच्या. ह्याला काय सांगणार ? आई हॉस्पिटलमध्ये बरं होण्यासाठी जाणारे. तिच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे थोडंसं बाऊ. ते बरं होणार आहे एडमिट केलं की,. असं श्रीने सगळं त्याला समजावलं होतं. दादूला पण ह्या गोष्टीसाठी श्रीने व्यवस्थित तयार केलं होतं. माझी सर्जरी चालू झाली ,इकडे अंजूताईं आल्या आमच्या घरी. आल्या आल्या, शोनुला विचारतात तुझी तुला आंघोळ तरी करता येते का, शौनक ? तुझी आई चालली वर. अगदी ठसक्यात हाताचं बोट वर करून बरं का…“

“अंजूताईं म्हणजे श्रीची मामेबहीण ना गं ? अलीकडे तुमच्या सोसायटीत राहायला आली आहे ..”
“घरातून हाकलून द्यायला पाहिजे.”
“मंद आहे का ती ?”
“शोनुने तर भोकाड पसरलंच. दादूपण ! त्याचं बघून दादू जो रडायला लागला. सासूबाईंचं ब्लड प्रेशर खूप वाढलं. सासरे घाबरले. ते घरी एकटेच आणि ह्या अंजूताईं सोबतीला म्हणून आलेल्या. श्री हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत ! इतकी परवड झाली. शेजारच्या सोमण काका काकूंना बोलावलं.”
“माय गॉड !“
“डिस्चार्ज मिळून मी घरी येईपर्यंत तो अस्वस्थ होताच. नंतर तो मला कुठे जाऊच देईना. सारखं धरून ठेवायचा. चेकअप करायला जाते वेळी ह्याचा परत धिंगाणा..”
“गळाच दाब त्या अंजूताईंचा..तिला थोडा अंदाज येऊदे वर जायला कसं वाटतं … ”
“नात्याची कसली गोत्यात आणणारी मंडळी ही !”
“तरीच नात्यागोत्याची असा शब्द प्रयोग आहे..”
“काऊन्सेलरकडे न्यावं लागलं त्याला. म्हणून मी रजा वाढवली. ऑफीसची पर्स घेऊन मी आले, तर खूश आहे आज स्वारी. त्याला आता खात्री पटली आई नाही जाणार वर !”

“नावासकट हिचं कर्तृत्व जाहीर करा..”
“आणि काय सत्कार करावा म्हणतेस ..“
“कसं वागू शकतात गं, असं ?”
“म्हणजे बघा कळीचा नारद तर पृथ्वीवर पोचू शकत नाही. मग कळ लागणार तरी कशी ? थोडक्यात देवाचे हात पोचू शकत नाहीत, म्हणून त्याने आईची निर्मिती केली. म्हणतो ना आपण, तशी कळीच्या नारदांची देखील व्यवस्था देवाने केलेली असते !!“
विद्याताईंनी असं म्हणताच आम्ही साऱ्याजणी हास्यकल्लोळात बुडून गेलो.
क्रमशः

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version