गुलाबी आयाळीचा घोडा
“गुलाबी आयाळीचा घोडा” हा ३५८ पृष्ठांचा सोवियत लघुकथा संग्रह तेव्हाचे प्रगती प्रकाशन, माॅस्को या प्रकाशनाने १९८० मध्ये प्रकाशित केला आहे.अनुवादक आहेत अनिल हवालदार. तेव्हा मी अवघ्या ६ रुपयात प्रदर्शनात घेतला होता. आज ही प्रकाशन संस्था बंद पडली आहे आणि पुस्तक दुर्मीळ झालेले आहे.
“गुलाबी आयाळीचा घोडा” ही विक्तर अस्ताफियेव यांची कथा. या कथेत लेवोन्ती काकांच्या घरुन आजी कतेरिना पेत्रोव्ना परत येते आणि पेत्रोव्ना याला नदीकिनार्यावर स्टाॅबेरी गोळा करायला जाणाऱ्या मुलांबरोबर जायला सांगते. त्याची टोपली विकून त्याच्यासाठी प्रॅनिक (मैदा, साखर, आल्याच्या अर्कापासून तयार केलेले व वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकारात बनवलेले गोड बिस्कीट) विकत घेऊन येईन सांगते. पेत्रोव्ना तिला घोड्याच्या आकाराचे प्रॅनिक आणायला सांगतो. त्या शुभ्र घोड्याची आयाळ गुलाबी असे. या निमित्ताने त्याने आजीसोबतच्या बालपणातील अनेक आठवणी या कथेत सांगितल्या आहेत. आजीचे, लेवोन्ती काकाचे यात व्यक्तिचित्रण रेखाटले आहे. लेवोन्ती काका खलाशी होते. त्यांना समुद्र आवडायचा. पेत्रोव्ना पोरका असतो. त्याची आई बुडून मेलेली असते. नदीकिनार्यावर तो सबंध दिवस घालवतो. सान्का बरोबर लागलेल्या पैजेत गोळा केलेली सगळी स्ट्राॅबेरी खाऊन टाकतो. टोपलीत गवत पसरुन वर थोडी स्टाॅबेरी पसरवून तो आजीला देतो.आजीला फसवले याची त्याला जाणीव होते. त्याची लबाडी आजीच्या उशीरा लक्षात येते. ती घरी येते तेव्हा पेत्रोव्नाची घालमेल होते. एवढे सगळे होऊनही शेवटी आजी त्याला गुलाबी आयाळीचा घोडा देते. बालपणातील ही आठवण कधीही विसरणे शक्य नाही असे तो म्हणतो.

“खुणा” ही वादिम कोझेवनिकोव यांची कथा. या कथेत कडाक्याच्या थंडीने सारे गोठून गेलेले आहे. सूर्य तळपतोय. भलीमोठी नदी थिजलेल्या बर्फाचा ढीग बनते. तैगाचा अफाट विस्तार. सिमेंटच्या पोत्यांनी भरलेली एक घसरगाडी एक ट्रॅक्टर ओढून नेत असतो. त्याच्या चाकांखाली एक चाकोरी उमटत चालली आहे. सेर्गेई ल्यूतिकोव हा ट्रॅक्टर ड्रायव्हर. मोटर डेपोत मॅकेनिक म्हणून काम करत असतो. त्याची बायको तमारा एक जार्जीयन असते व प्रयोगशाळेत सीमेंट पृथक्करणाचे काम करत असते. भूगर्भशास्त्रज्ञाचे एक पथक तुंद्रामध्ये अडचणीत सापडलेले असते. त्यांचा शोध करण्याचा हुकूम ल्यूतिकोवला देण्यात येतो. ट्रॅक्टर दलदलीत कोसळतो. ल्यूतिकोव त्याला खेचून वर काढतो. वाट चुकलेले ४ भूगर्भशास्त्रज्ञ ट्रॅक्टरच्या ट्रेलरमध्ये मुडद्यासारखे पडून असतात. पल्युखिन याच्याबरोबर ल्यूतिकोव प्रवासात गप्पा सुरु करतो. पण गप्पा मारत जायचा हा रस्ता नाही. चढाचे डोंगर आहे असे तो सांगतो. शुभ्र प्रकाशाने तुंद्रा उजळते. सबंध दिवसाचा प्रवास कंटाळवाणा, दमवणारा असतो.ट्रेलर जोडलेला ट्रॅक्टर त्या बिनसावलीच्या, बिनतार्याच्या आर्क्टिक – रात्रीच्या तेजस्वी संध्याप्रकाशात प्रवास करीत असतो. शेवटी ल्यूतिकोव घरी येतो. ट्रॅक्टरच्या पट्टेरी चाकांच्या पोलादी पात्यांनी उमटवलेली नागमोडी चाकोरी तुंद्राच्या अनंत सपाटीवर उमटलेली होती. कोरड्या बर्फाची सपाट ढेकळे एव्हाना चाकोरीच्या त्या खुणा पुसू लागली होती. अशी ही विलक्षण कथा!
“पेरी-हाला आणि लेनिन” ही मिर्झा इब्राहीमोव यांची कथा. अल्मामीक नावाच्या अझरबैजानी खेड्यात राहणाऱ्या पेरी-हालाचे एकेकाळी स्वतःचे घर होते. प्रेमळ आई-बाप्पांनी तिचे लाड केले होते. एका देखण्या उमद्या धीट नजरेच्या निष्ठावंत तरुणाने कासिमने आपल्या हृदयाशी घट्ट धरले होते. तिचा मुलगा नाजिम आणि मुलगी तेल्ली आज्ञाधारक होती. बेक (श्रीमंत जमीनदार) एकदा त्यांचेकडे येतो आणि त्यांनी फळबाग लावलेली जागा आणि त्यांचं झोपडं खाली करायला सांगतो. तो ऐकत नाही. थोड्याच दिवसात नाजिमला अटक होते.एक घोडेस्वार कासिमला दूर शहरात घेऊन जातो. बेकची माणसे पेरी – हाला व छोटी तेल्ली यांना घराबाहेर काढतात.तेल्लीची जीवनज्योत विझून जाते. कासिम तुरुंगात मरण पावतो. पेरी-हाला एकाकी उघडी पडते. तिला कोणी आसरा देत नाही. तिच्या मुलाच्या वयाचा वेली तिची काळजी घेऊ लागतो. तो तिला लेनिनचे नाव सांगतो. लेनिन तुला तुझा मुलगा, तुझं घर, तुझी फळबाग परत करतील असे सांगतो. तो काॅम्रेड लेनिनना काॅम्रेड नरीमानोव यांच्या मार्फत तिचा निरोप पोहचवतो. लेनिनमुळे तिच्या मुलाची नाजिमची सुटका होते. तिला तिचे घर फळबाग परत मिळते. त्या घराच्या दारात सफरचंदाचे फुललेले झाड तिची वाट पहात असते. निरक्षरता नाहीशी करण्यासाठी ती पुरुषांचे बायकांचे वर्ग चालू करते. टोपलीभर सफरचंदे लेनिनना भेट द्यावी असे ती ठरवते. लवकरच तो योग येतो. लेनिनना भेटायला ती माॅस्कोला जाते. लेनिनना ती भेटते आणि सफरचंदांची टोपली भेट म्हणून देते. तिच्या मागणीनुसार गावात छपाई यंत्र येते अशी ही प्रदीर्घ कथा आहे.
“घेऊनी घडा गेली पाण्याला” ही राफाएल आराम्यान यांची कथा. या कथेत कुताईचा आर्मेनियन महंत कोमितास एका धनगराबरोबर सारीग्यूहला गाणी गोळा करायला जातो. तिथली एक म्हातारी त्याला ताकाची कढी भाकर व शिजवलेले गव्हाचे दाणे देते. ती तिच्या मुलासाठी प्रार्थना करायला सांगते. तो परमुलखात गेलेला असतो आणि त्याचा काही पत्ताच नसतो. तिच्या सुनेचे आयुष्य वाया चाललंय, ती त्याची वाट पाहतेय. पाण्याचा घडा घेऊन डोंगरातल्या झर्याशी जाते आणि रस्त्याकडं नजर लावून बसते असे ती महंताला सांगते. यातूनच त्याला ” घेऊनी घडा गेली पाण्याला SS”हे गाणे मिळते अशी ही कथा आहे.
“विजयाचे लाल मद्य” ही येवगेनी नोसोव यांची कथा.माॅस्कोपासून ७० मैलावर सेपुर्खोव या छोट्या गावात पूर्व प्रशियन संरक्षण फळी रशियन सैनिक फोडतात. तेव्हा त्यातील जखमी झालेले सैनिक इस्पितळात दाखल होतात. तो शत्रूचा प्रदेश असतो. तेथे हिटलरचे गुप्त तळ असण्याची त्यांना शंका असते. तेथून त्यांना मलावा या छोट्या पोलिश खेड्यात हलवले जाते. पूर्व प्रशियन क्षेत्रात त्यांच्या फौजा पोझेटानियाची मैदाने ओलांडत होत्या. जर्मनी विरुध्द युध्द सुरु असते. युध्दात जखमी झालेले साशा सेलीवानोव, बोरोदुखोव, कोपेश्कीन इ. ७ जखमी रशियन सैनिकांची ही कथा.कोपेश्कीन सैन्याला रसद पुरवणार्या विभागात असतो. बोरोदुखोव मेझेनमधील लाकुडतोड्या असतो. मोर्दोविया की चुवारिया यांच्या आसपास पेन्झा प्रदेशात कोपेश्कीनचे सुखाय झितेन हे खेडे गाव येते. तो अत्यवस्थ असतो. त्याच्या घरुन पत्र येते ते त्याच्या डोळ्यासमोर धरण्यात येते. त्याच्या घराचे कल्पनेने चित्र काढून दाखवतात त्याने तो शेवटच्या क्षणी आनंदी होतो.बर्लिनवर युध्दात विजय होतो. त्याप्रित्यर्थ लाल मद्य येते पण कोपेश्कीन हे जग सोडून गेलेला असतो. त्याला चिअर्स करुन राहिलेले जखमी सैनिक दु:खी अंतःकरणाने विजय साजरा करतात अशी ही कथा आहे.
“हर्क्युलसची तेरावी करामत” ही फाझिल इस्कंदर यांची ही त्यांच्या शाळेतील खार्लाम्पी दिओगेनोविच या गणिताच्या शिक्षकाची कथा. त्यांच्या तासाला वर्गात कशी शांतता असायची. विनोदावर सुध्दा शांतता असायची. वर्गात उशीरा आलेल्या मुलाचे ते कसे स्वागत करायचे. त्याला वेल्सचा राजपुत्र कसे म्हणायचे. त्यांच्या तासाला काॅपी करणे कसे व्यर्थ असे. दुसऱ्याचे विडंबन करणे त्यांचे शस्त्र होते. टायफॉइड विरोधी लस टोचणार्या पथकाला ५ वी अ चा वर्ग दाखवण्याच्या नादात शेवटी त्या वर्गात ते पथक न जाता गणिताचा तास सुरु असताना त्यांच्या ५ वी ब च्या वर्गात कसे येते त्यामुळे ते गणिताचे शिक्षक नाराज कसे होतात याची ही अगदी गमतीदार कथा आहे.
“सोयरीक” ही वासिली शुक्शीन यांची कथा. स्तेपान येमेल्यानोव एलोच्का नावाच्या तरुणीच्या प्रेमात पडतो. ती पडीक जमीन लागवडीखाली आणण्याच्या मोहिमेत सैबेरियात आलेली असते. त्याने तिला शहरातून खेड्यापर्यंत आपल्या लाॅरीतून लिफ्ट दिलेली असते.तेव्हा ती त्याला एवढी खास वाटत नाही. नंतर तो तिला पार विसरुन गेलेला असतो.एका रात्री तो खेड्यात स्थानिक नाटक मंडळीचा प्रयोग पहायला जातो तेव्हा जिला त्याने लिफ्ट दिलेली असते तीच तरुणी रंगमंचावर असते. तेव्हा मात्र ती त्याला सुंदर वाटते. रंगमंचावर दुसर्या तरुणाबरोबर वास्का सेम्योनोव बरोबर पाहताना त्याच्या मनात खळबळ उडते. तो अस्वस्थ होतो. नंतर तो एका संध्याकाळी एलोच्काला भेटायला बाहेर पडतो. पण फाटकाशीच थबकतो. कुक्सीन नावाच्या म्हातार्या जोडप्याच्या घरात ती रहात असते. नंतर तो खंगतो. शेवटी तो वडीलांना येगोर सेवेर्यानिचला सांगतो की ‘मला लग्न करायचंय’ ती ओळखीची नाही म्हटल्यावर सोयरीक जमवणं जमायचं नाही असे म्हणतात. येगारचे वडील सेवर्यान मात्र येगारशी सोयरिकीवरुन भांडतात. दुसर्या दिवशी बाप आणि मुलगा सोयरिकेच्या मोहिमेवर निघतात. कुक्सीनच्या घरी जातात. पण एलोच्काच्या खोलीत आधीच एक तरुण वास्का सेम्योनोव बसलेला असतो. येगोर त्याला आम्ही सोयरिक जुळवायला आल्याचे सांगतात. वास्का स्तेपानला सांगतो की त्याला उशीर झाला आहे. स्तेपान व येगोर जायला निघतात पण एलोच्का त्यांना थांबवते. दोघांपैकी एकाला संमती मिळणार असते. शेवटी वास्काला जावे लागते. अर्थात स्तेपानशी सोयरिक जुळते अशी ही कथा आहे.
“आर्क्टूरस” ही युरी कझाकोव यांची कथा. अस्सल शिकारी कोस्रोमा जातीतील आंधळ्या कुत्र्याच्या पिल्लाची ही अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे. आंधळा असूनही तो कसा केवळ वास घेत घेत सावजाचा वेध घ्यायला व त्याची शिकार करायला कसा शिकतो. एका शिकारीच्या प्रसंगी त्याचा हृदयद्रावक पध्दतीने कसा अंत होतो अशी ही विलक्षण चित्तथरारक व तितकीच हृदयस्पर्शी कथा आहे.
“एक कहाणी” ही तेम्बोत केराशेव यांची कथा.एके दिवशी माशुक नावाचा एक शेतकरी कुटुंबातील तरुण आपल्या खेड्याकडे घोड्यावर निघतो. त्याचे वय २५ पेक्षा जास्त नसते.वाटेत त्याला एक म्हातारा भेटतो. तो घोड्यावरुन उडी मारुन खाली उतरतो व म्हातार्याला सलाम ठोकतो. आपले घोडे बसायला देऊ करतो. शेवटी म्हातारा घोड्यावर स्वार होतो व माशुक बरोबर चालत राहतो. खेड्यापर्यंत पोहचल्यावर म्हातारा उतरतो व माशुकाला त्याच्या दयाळूपणाबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल आणि त्याच्या उद्योगशीलतेबद्दल बक्षिस देऊ इच्छितो. सर्वात अधिक आवडणार्या ३ गोष्टी मागायला तो सांगतो. माशुक वेळ मागून घेतो. शेवटी तो उत्तम घोडा, उत्तम शस्रे आणि उत्तम बायको मागतो. उत्तम घोडा व उत्तम शस्त्रे शोधणे अवघड नाही पण उत्तम बायको मात्र देऊ शकत नाही असे म्हातारा सांगतो. उत्तम पत्नी होऊ शकतील अशा ३ बायका पैकी २ कुटुंबवत्सल माता असतात. वयाने मोठ्या व म्हातार्या. तिसरी तरुण असते मात्र तिचे २ वर्षापूर्वी लग्न झालेले असते. माशुकाला म्हातारा त्या तरुणीकडे जायला सांगतो. ती त्याला आवडली तर ती त्याची होईल असे सांगतो. माशुक त्या तरुणीच्या गावी जातो. ती त्याला आवडते पण त्या नवरा बायकोच्या सुखात जर विष कालवलं तर आपली सदसद्विवेकबुद्धी सतत टोचत राहील तेव्हा तो फक्त उत्तम घोडा व उत्तम शस्त्रे यावरच समाधान मानतो अशी ही कथा आहे.
“तांबड्या डोक्याचा हिरवा पक्षी” ही यूरी नगीबिन यांची कथा.पावलोव एका सॅनिटोरियमच्या भोजन विभागाच्या बांधणी – स्थळावर काम करीत होता. त्याला जुळी मुले असतात. त्यांची फुफ्फसं नाजुक असल्याने त्यांना शहरात ठेवता येत नसते. वोल्खोव आघाडीवर असताना १९४२ मध्ये ज्युनियर लेफ्टनंट पावलोव तोंड धुतांना नमस्कार तोंडातून रक्त येते हे समजते. वेढ्यात अडकलेल्या लेनिनग्रादला सोडवण्यात यश येत नव्हते. तोफगोळ्याचा एक कपचा त्याच्या शरीरात घुसतो. इस्पितळात काळ कंठावा लागतो. दोन वर्षांनी तो नवीन जीवनात पदार्पण करतो. तो लग्न करतो. जुळे मुले खेड्यात रमून जातात. तेथील देवदाराच्या राईत मुलांच्या सांगण्यानुसार तांबड्या डोक्याचा एक खास हिरवा पक्षी रहात होता. पावलोवला वाटते मुलांनी स्वतःच्या कल्पनेमधून हा पक्षी निर्माण केला. शाळा, गृहपाठ आणि हिरवा पक्षी एवढ्याभोवतीच मुलांचे आयुष्य फिरत असते. पावलोवला तो पक्षी आहे यावर विश्वास नसतो. शेवटी मुले त्याला दाखवायला घेऊन जातात तिथे फक्त हिरवी आणि लाल पिसे शिल्लक राहिलेली तो पाहतो अशी ही कथा आहे.
“मोल्दावियातील शरदामधले दिवस” ही ईआन द्रुत्से यांची ही प्रदीर्घ कथा. शरदातला मोसम हा मोल्दावियात भेटायला घरी जाण्याचा काळ.उपनगरी आगगाडी स्तेपमधून येत होती. खेड्यातील लोक पाहुण्यांची वाट पाहत होते. लेखक आपल्या खेड्याकडे आगगाडीने परतलेला असतो. एक म्हातारी देखील आपल्या अपेक्षित पाहुण्याची वाट पहात असते. ती त्यांची प्रेमळ वृध्द आई असते. शरदाच्या हवेत सायंकाळी वडील झिंगलेल्या अवस्थेत घरी यायचे. त्यांची लेखक धरुन ६ मुले कोणी कुठे कोणी कुठे अशी खेड्याबाहेर दूरवर विखुरलेली असतात. वडील मरणाच्या दारी पडले आहे अशा तारा केल्यातर मुले येतील असे आईला वाटते. ती मुलांना तारा करते. वडील खरोखर आजारी पडतात. त्यांची मुलगी मरिन्का तार पाहून आधी येते पण तिच्यावर ते नाराज असतात. मुले येत नाही असे पाहून वडील त्यांना जाऊन भेटण्याचे ठरवतात. ते पायी प्रवास करुन फ्रूमूशिका या युक्रेनी खेड्यात पोहचतात. त्यांचा सर्वात मोठा मुलगा आंद्रेई तिथे रहात होता. त्याचे वय ५० वर्षे झाले होते.
तो गॅरेजमध्ये ट्रॅक्टर दुरुस्ती करायचा. तेथे वडीलांचे थाटात स्वागत होते. तिथून निरोप घेऊन ते चालत साखर कारखान्याच्या वसाहतीत दुसरा मुलगा निकोलायकडे पोहचतात. त्यावेळी तो न्हाणीघरात असतो. दार लवकर उघडले जात नाही म्हणून वडील भडकतात व निकोलायला आवाज देतात. निकोलाय साखर कारखान्यात गुदाम मॅनेजर असतो. त्याची बायको आनिका. निकोलाय संभाषणात जुन्या कौटुंबिक भांडणाचा धागा उकरुन काढतो. त्याचा वडीलांवर राग होता. वडील तिथून बसने निघतात व सर्व भावंडात अत्यंत प्रामाणिक आणि तर्हेवाईक असलेल्या जंगल खात्याचा अधिकारी अंतोनकडे पोहचतात. ते त्याला जंगलातच भेटतात. तो सर्वात आज्ञाधारक असतो. त्याला आनंद होतो. तिथून ते ट्रकने ज्ञीस्तर नदीकिनारी वसलेल्या सोरोकी गावी पोहचतात. तेथे त्यांचा विद्यार्थीदशेतील मुलगा सेराफिम पशुवैद्यक विद्यालयात असतो. तो त्यावेळी व्हाॅलीबाॅल खेळत असतो. तो वडीलांचा लाडका असतो.त्याने लग्न करण्याचा निश्चय केलेला असतो. तो वडीलांना अनेक मुली दाखवतो. दुसर्या दिवशी वडील विमानाने जाण्याचे ठरवतात पण पैसे कमी असतात. सेराफिम आपल्याकडील पैसे त्यांना देतो. ते विमानाने किशिन्योव विमानतळावर उतरतात. बसने शहरात जातात. लेखकाने त्यांना सांगितलेले असते की ते त्या शरदात किशिन्योमध्ये असणार नाही, माॅस्कोमध्ये असेन पण त्यावर वडीलांचा विश्वास बसला नव्हता. ते लेखकाच्या घरी जातात व निराश होऊन संध्याकाळी घरी परततात. नेहमीप्रमाणे म्हातारी आई फाटकाशी वाट पहात असते. तिला वडील झिंगलेले येताना दिसतात अशी ही कथा आहे.
“इल्यिन्स्की डोह” ही काॅन्स्तन्तिन पाउस्तोवस्की यांची कथा आहे प्रत्येक. उन्हाळ्यात लेखक ज्या लाकडी ओंडक्याच्या, निमुळत्या छपराच्या जुन्या पध्दतीच्या घरात ज्याला रशियन भाषेत इझ्बा म्हणतात त्यापासून १० मैलावर अका नदीकिनारी ‘इल्यिन्स्की डोह’ आहे. अत्यंत सामान्य रानफुलांनी बहरलेल्या या ठिकाणात विलक्षण गोडवा आणि निर्व्याज सौंदर्य आहे असे लेखक म्हणतो. अका नदीवरच्या इल्यिन्स्की डोहानजीकच्या, वाळुंजांनी वेढलेल्या, मैदानामध्ये धुकट रशियन सूर्यास्त पसरलेल्या आपल्या साध्यासुध्या ओंडक्याच्या घराकडे परतावे अशी इच्छा लेखक व्यक्त करतो. या ठिकाणाचे सौंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यांसमोर एका पाठोपाठ एक अशा ६ पट्ट्यांनी उलगडत जाणार्या भव्य दृश्यामध्ये होते. प्रत्येक पट्ट्याची रंगसंगती वेगळी होती. इल्यिन्स्की डोह या नावातून ठळकपणे रशियन ग्रामीण प्रदेशाचे खरेखुरे रुप व्यक्त होते. अशी ठिकाणे निर्मळ, सांत्वनकारी असतात आणि त्यांच्यात पावित्र्य वास करत असते असे लेखक म्हणतो. चेखोव एका उन्हाळ्यात जिथे राहिले होते ती बगिमोवो इस्टेट अका नदीच्या उजव्या तीरावर होती. चेखोव या ठिकाणी कार्प माशाची शिकार करत. माणसाचा मायदेश म्हणजे त्याचा जीवनरस. त्याशिवाय तो जगू शकत नाही असा विचार लेखक या कथेत शेवटी मांडतो.
“बायकोचे हात” ही विक्तर अस्ताफियेव यांची तैगामधील कथा. स्तेपान त्वोरोगोव पिळदार स्नायूंचे खांदे असलेला पण हात नसलेला. दातांनी काडतूस खेचून दातांनीच ती बंदुकीत तो ठासायचा. उजव्या हाताच्या खुंटाला बांधलेल्या लोखंडी आकड्याने तो चाप ओढायचा. तो कोयत्याने गवत कापीत. कुर्हाड चालवे.सुतारकाम करी. खाणीत काम करीत असताना वयाच्या १९ व्या वर्षी सुरुंगाच्या स्फोटामुळे त्याचे हात तुटून पडले होते. तरीही तो सर्वोत्तम शिकारी असतो. त्याच्याबद्दल लेख लिहून आणायला लेखकाला सांगण्यात आलेले असते. स्तेपान रानकोंबड्याची शिकार करुन दाखवतो. स्तेपान अपंग असला तरी भीक न मागता स्वतःची भाकरी कष्ट करुन मिळवतो. पण त्याला आपल्या सहचारिणी नादयाचे हात लाख मोलाचे वाटतात.जेव्हा त्याचे हात तुटून पडतात तेव्हा ती त्याची सुश्रुशा करते. अशी ही कथा आहे.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ☎️9869484800
आम्हाला आमच्या न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे पूर्व (आमच्या बॅच ला सचिन तेंडुलकर 6 वी पर्यन्त होता) येथे ही पुस्तके विकत मिळायची. अतिशय सुंदर आणि मजबूत बांधणी, आणि अतिशय कमी किमतीत ही पुस्तके आमच्या शाळेने कशी काय पण उपलब्ध करून दिली होती. आमच्या IES च्या शाळेने जे अनेक उपकार आमच्या वरती केलेत त्यापैकी हा एक.. त्या वेळी या रशियन कथा वाचताना मन खुप हरवून आणि हरखून जायचे… मला आजही ही सगळी (मिळतील तितकी) पुस्तके कोणाकडे असतिल तर योग्य तो मोबदला देऊन घ्यायची इच्छा आहे… कोणी उपकृत करेल काय? राजन मांजरेकर, मुंबई – 93-2121-4545 🙏🏽☺️🌸
वेगळी भाषा,वातावरणही वेगळे.पण मानवी भावना समान असतात. त्याचे चित्रण सुरेख. मराठीत अनुवादही तिककाच सक्षम.
मनापासून धन्यवाद सर
उत्तम परिक्षण पण रशियन कथांचे अनुवाद वाचताना त्यातील माणसांची नाव वाचताना आणि लक्षात ठेवताना थकून जायला होते.
हे मात्र खरे आहे. मनापासून धन्यवाद सर