बालपण : भाग २
प्रकरण ६ ते १०
‘बालपण’ हे माक्सिम गोर्की यांच्या आत्मचरित्रात्मक त्रयीमधील(बालपण – १९१४, दाही दिशा १९१५, माझी विद्यापीठे १९२३)पहिले पुस्तक.
बालपणचा नायक स्वतः लेखक आहे. छोटा अल्योशा पेश्कोव (माक्सिम गोर्की) समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न करतो की, जगाची दोन भागांमध्ये विभागणी का झालीय? एक जग आहे त्याच्या आजीचे. ह्या तेजस्वी जगात तिला लोकांविषयी अपार प्रेम आणि करुणा वाटते ;आनंदी स्वभावाचा रंगारी त्सिगानोक व झकास हेसुद्धा याच जगातील! दुसरे जग संकुचित आणि लोभी वृत्तीच्या माणसांचे. भावी लेखकाला अगदी लहानपणापासूनच दुष्ट जीवनाविषयी तिटकारा होता. जीवनाची पुनर्घडण करण्याची लहानपणापासूनच त्याला आस होती. बालपण या आत्मचरित्रात्मक कादंबरीचा नायक पेश्कोव कुटुंबातील लहानगा लेखक असून वयाच्या ८ व्या वर्षांपर्यंतच्या आठवणी १३ प्रकरणांतून कथन केल्या आहेत
सहाव्या प्रकरणात पुन्हा एकदा आयुष्य म्हणजे एक महाभयानक स्वप्न बनले असे लेखक सांगतो. मिखाईलमामा मोकाट सुटतो. झिंगेपर्यंत पितो व पिसाळतो. आपल्या स्वतःच्या बापाला ठार मारायला येतो. त्याच्या येण्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी आजी लहानग्या अलेक्सेयवर सोपवते. आजोबा, याकोवमामा आणि दारु- दुकानदाराकडे काम करणारा मेल्यान हे मिखाईलमामाला फाटकातून रस्त्यावर ढकलून देतात. आजोबा पोलेवायाच्या रस्त्यावरच्या घरात वर्षभरच राहिले पण एवढ्या कालावधीतच ते घर कुप्रसिद्ध झाले. मिखाईलमामा नासधूस करायचा. आजोबा त्यामुळे हताश झाले होते.
सातव्या प्रकरणात आजोबांचा देव एक होता व आजीचा देव दुसरा होता हे लेखक सांगतो. तिचा देव सारा दिवस तिच्या सांगाती असायचा. प्राण्यांनासुध्दा ती देवाबद्दल सांगायची. आजोबांप्रमाणे ती सारखा देवाच्या नावाचा उच्चार करीत नसत. शेजार्यांच्या परस्पर युध्दांमधील सूडांचे प्रकार लेखकाने कथन केले आहे. आजी सांगायची मोठ्या माणसांच्या भानगडीमध्ये कधीही नाक खुपसू नकोस. मोठी माणसं ही कष्टांमधून आणि मोहांमधून गेल्यानं बिघडलेली असतात. आजोबा पण देवाबद्दल सांगत पण आजीसारखी प्रार्थना करीत नसत. त्यांची प्रार्थना म्हणजे जोरदार मागणी केल्यासारखी असे. त्यांची प्रात:स्मरणे आणि स्तोत्रे अलेक्सेयला तोंडपाठ होती. आजोबा कुठे चुकतात त्याकडे तो लक्ष ठेवून असायचा. तुमच्या प्रार्थना ऐकताना देव कंटाळून जात असेल असे एकदा आजी गमतीने आजोबांना म्हणाली. तुमच्या देवाला तुम्ही आपल्या अंतःकरणापासून एकही शब्द वहात नाही असे ती म्हणायची. आजोबा रागाने बशी भिरकावयाचे. त्या दिवसात लहानग्या अलेक्सेयच्या मनात प्रामुख्याने देवाविषयी विचार येत. आयुष्यात तेवढे एकच सौंदर्य त्याला आढळले. इतर सर्व गोष्टींची घाण व क्रूरता पाहून त्याला त्यांच्याविषयी घृणा वाटे.त्याला रस्त्यावर खेळायची परवानगी नव्हती. रस्त्यावर अलेक्सेय चेकाळायचा. हमखास मारामारी करुन यायचा. इगोशाच्या पाठीच्या कुबडावर पोरं दगडे मारायची. ग्रिगोरी भीक मागताना दिसायचा. अलेक्सेयला याचं दु:ख व्हायचे. आजोबा त्याला खाऊ का घालत नाही असा त्याला प्रश्न पडे. परमेश्वर याबद्दल फार मोठी शिक्षा करील ही आजीची भविष्यवाणी. ती चुकली नाही. सुमारे १० वर्षांनी आजी चिरविश्रांती घेत होती तेव्हा आजोबा भीक मागत फिरत होते. बोरोनिखा या म्हातारीचीही कथा सांगितली आहे. आजीने बोक्यापासून वाचवलेल्या मैनेला बोलायला शिकवले.

आठव्या प्रकरणात आजोबांनी दारु – दुकानदाराला घर विकले व कानातनाया रस्त्यावर दुसरे विकत घेतले असे कथन केले आहे. लहानग्या अलेक्सेयला सर्वात त्यांच्या घरी जेवूनखाऊन राहणाऱ्या ‘झकास’ चे आकर्षण वाटले. हा भाडेकरु उंच व पाठीला पोळ आलेला होता. त्याला काही काम सांगितले की तो म्हणायचा ‘झकास’. त्या माणसाच्या भूतविद्येच्या कुतुहलापोटी लेखक तासंतास छपरावर बसून त्याच्याकडे पहायचा. घरात तो कुणालाही आवडत नसे.तो अगदी एकटा असतो. अलेक्सेयची त्याच्याशी मैत्री होते. पण अखेरीस लोकांनी त्याला हाकून लावले. रागाच्या भरात अलेक्सेय चमचा मोडतो. त्याला त्याबद्दल खरपूस मार मिळतो.
नवव्या प्रकरणात अलेक्सेय नमूद करतो की बालपणाच्या त्या काळात तो जणू मधमाशीचे पोळे होता. वेगवेगळी साधी माणसे आपल्या ज्ञानाचा आणि जीवनविषयक दृष्टीकोनाचा मध घेऊन येत होतं. ‘झकास’ गेल्यावर त्याची प्योत्रकाकांशी गट्टी जमते. ते साक्षर होते. त्यांचा धार्मिक ग्रंथांचा अभ्यास चांगला होता. त्यांचा आणि आजोबांचा नेहमी वाद चाले. टापटीप आणि स्वच्छतेची त्यांना आवड होती. ते अलेक्सेयला विचारीत की तो मोठेपणी कोण होणार? शिपाई की कारकून?. अलेक्सेय उत्तर देत ‘शिपाई’! मानवी छळ आणि अपमानास्पद वागणूक यांची त्याला किळस आली होती. प्योत्रकाका त्याला गोष्टी सांगत. पुढे त्यांच्याशी त्याचे असलेले संबंध बिघडतात.त्यांच्यात एक प्रकारचे मूक, नाठाळ युद्ध सुरु होते. प्योत्रकाका व त्याचे साथीदार बरेच दिवस चर्चमध्ये चोरी करत होते. एके दिवशी प्योत्रकाका मृत आढळतात.
दहाव्या प्रकरणात अलेक्सेय पेत्रोव्नाच्या बागेत सुंदर पिसार्याचे गाणारे पक्षी धरायला जातो. पक्ष्यांच्या जीवनाचे निरीक्षण करण्यात आणि त्यावर चिंतन करण्यात त्याला स्वारस्य होते. त्या दरम्यान त्याची आई घरी आलेली असते. आजी तिला सांगते की तो अगदी हाताबाहेर गेलाय. आता त्याच्या आजोबांचाही त्याला धाक राहिला नाही. ती अलेक्सेयच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवते. केस कापले पाहिजे आणि आता शाळेत जायचे वय झाले आहे असे म्हणते. लाडाने कुरवाळते. तिने आजोबांच्या संमतीविना बाळाला जन्म दिला होता व कुणापाशी तरी ते सोडून आली होती. लौकरच आई अलेक्सेयचे अधार्मिक शिक्षणाला आरंभ करते. काही पुस्तके ती विकत आणते. ‘रशियन पाठमाला’ हे त्यातले एक. त्यामधून तो मुळाक्षरे शिकतो. कविता तोंडपाठ म्हणवून घेण्याचा छळवाद सुरु होतो. चुकल्यावर आई रागवायची. हट्टी मूर्ख म्हणायची. कोपर्यात उभे राहण्याची शिक्षा करते. त्याला थोडं तिंबून काढ म्हणजे येईल वठणीवर असे आजोबा सांगतात. त्याला परीकथा आणि गाणी तोंडपाठ येतात असे आजी सांगते. अंकगणित त्याला कठीण जात नव्हते पण व्याकरण मात्र कळत नव्हते. आजीने आजोबांबद्दल आईला सांगितले असे वाटून ते आजीला मारतात. त्याचा लहानग्या अलेक्सेयला राग येतो. आजोबांनी मारले हे आईला सांगू नकोस म्हणून ती अलेक्सेयला बजावते. आजोबांना त्यांच्या दुष्टपणाबद्दल काय अद्दल घडवावी याचा विचार अलेक्सेय करीत राहतो. तिरस्काराच्या भावनेने त्याचे अंत:करण जळत राहते. तो आजोबांकडील संतांचे कॅलेंडर फाडतो. संतांची डोकी कापतो. त्याला आजोबा चुलाण्यावरुन खेचतात आणि त्याला व आजीला मारतात. आई त्याला खेचते व एका कोपऱ्यात घेऊन जाते व आजोबांना ते सारे थांबवायला सांगते. त्याला मार द्यायला पाहिजे असे आई आजोबांना म्हणते. फार पुढे लहानग्या अलेक्सेयला समजून आले की दारिद्र्य आणि आयुष्यातील रटाळपणा यांच्यापाशी रशियन माणसे आपल्या दु:खामध्ये थोडे वैचित्र्य आणू पहात. आयुष्य जेव्हा एकसुरी बनते तेव्हा दु:खदेखील हवेसे वाटते.
हे प्रकाशन आता बंद झाल्याने हे पुस्तक दुर्मीळ झालेले आहे. प्रकरण ११ ते १३, भाग ३ मध्ये….

— परीक्षण : विलास कुडके.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800