Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ५

दुर्मीळ पुस्तके : ५

खुणेची पाने

डॉ सरोजिनी बाबर ह्यांचे नाव लोकसंस्कृतीच्या अनुषंगाने अग्रक्रमाने घेतले जाते. लोकसाहित्य संकलनामुळे त्यांचे त्या क्षेत्रात महत्वाचे योगदान आहे. लोक साहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या आणि त्यांनी लोकसाहित्य व लोकसंस्कृती विषयक विविध ग्रंथांचे संपादन केले आहे. त्याच बरोबर ललित लेखनही विपुल केले आहे.

डॉ सरोजिनी बाबर यांचा जन्म ७ जानेवारी, १९२० रोजी सांगली जिल्ह्यात बागणी येथे झाला व २० एप्रिल, २००८ रोजी त्यांचे निधन झाले. लहानपणीच त्या पोलिओच्या बळी ठरल्या व पायाने थोड्या अधू झाल्या. त्यांचे वडील कृष्णराव बाबर यांनी त्या काळात त्यांना उच्च शिक्षण दिले. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपूर येथे झाले. १९४० मध्ये शालांत परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. १९४४ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी ए पदवी संपादन केली. Contribution of Woman Writers in Marathi Literature या प्रबंधा वर त्यांनी पीएचडी संपादन केली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्यांना १९८२ मध्ये डी एस्सी ही पदवी दिली.

डॉ सरोजिनी बाबर या १९५२ ते १९५७ या काळात तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधानसभा सदस्य होत्या. १९६४ ते १९६६ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या होत्या. १९६८ ते १९७४ या काळात त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या.

लेखन…

‘माझ्या खुणा माझ्या मला’ हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे. ‘सुंबरान मांडील’ (१९५७), गुलाबकळी (१९६१) ही लोककथांची संकलने, ‘नक्षत्रमाला’ हे मराठी लोककथांचे हिंदी भाषांतर, जनलोकांचा सामवेद, कुलदैवत, भोंडला भुलाबाई, श्रावण भाद्रपद, सण उत्सव, दसरा दिवाळी, आदिवासींचे सण उत्सव, बाळराज, जा माझ्या माहेरा, राजविलासी केवडा, जाई मोगरा, नादब्रह्म, कारागिरी, रांगोळी इ. संपादने आहेत. या खेरीज आमची गाणी, काळी मखमल, कुलाचार, खिरापत, खुणेची पाने, ग्रामलक्ष्मी, चंद्राची मारजा, चिंचेची पत्रावळी, झालं गेलं सांगते, डोंगरची मैना, देवदर्शन, धरित्रीच्या लेकी, नवलाख तारांगण, नवलाखी हार, नवाची पुनव, निरशा दुधाची घागर निळे डोळे, पाट पाणी, भांगतुरा, भिंगरी, भूक लाडू तहान लाडू, मंगलाक्षता, महिला मंडळ, मानवी प्रवास, मी माझ्या घरची, मुक्तांगण, यशोधरा, राधाई, राही रुक्मिणी, रुखवत, सुशोभन, स्थित्यंतर, स्वारी सुखात आहे हे त्यांचे कथासंग्रह आणि ललित लेखसंग्रह. चाफेकळी व झोळणा (१९६४)हे काव्य संग्रह. इतरही त्यांचे विपुल लेखन आहे. समाज शिक्षण मालेच्या त्या संपादिका होत्या आणि त्या मालिकेत ५५० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

खुणेची पाने हे डॉ सरोजिनी बाबर यांचे सुविचार प्रकाशन मंडळ, नागपूर – पुणे यांनी आॅक्टोबर १९६१ मध्ये प्रकाशित केलेले ललित लघुनिबंधाचे पुस्तक असून त्यावेळी त्याची किंमत होती ४ रुपये. या संग्रहात १५२ पृष्ठे असून खुणेची पानं, माझं घर आईची शाळा, ग्रामधर्माची माणसे, मी पाहिलेला नवा खेळ, गैरसोयीचं आयुष्य, आमचे आम्ही, स्वामी विवेकानंदाचा काळ, आमची जडण घडण, काव्यानंद मीमांसा, घरगुती माणसं, शेजारधर्म, आपली तपासणी, ज्ञानदेवी आणि मी, जुनी श्रध्दा, नव्या आयुष्यात, समाज – चित्रे, अनोळखी माणसं, स्नेहसंमेलन, ही माणसंहि बोलतात आणि आतां इथंच थांबूं या असे २१ ललित लघुनिबंध आहेत.

१) खुणेची पाने – हातांंतलं पुस्तक मिटवून ठेवण्यापूर्वी आपण आठवण ताजी रहावी म्हणून त्यात खुणेसाठी कागदाचा तुकडा टाकून ठेवतो. हे करताना नकळत आयुष्यानं माखलेल्या कित्येक खुणा नजरेसमोर सरकू लागतात. कुठल्या सभेत लोकांच्या समोर काही बोलण्याचा प्रसंग तेथे मन क्षणार्धात धीट होणं, न अडखळता, न घाबरता अस्खलितपणे चांगले बोलणे आणि त्यातून एखादी गोष्ट करायची म्हटली की मार्ग सापडतो आणि यशस्वी होऊ शकतो याची जाणीव होणे, बारा तेरा वर्षाचे असतानाची चिमुकली बहिणीची आजारपणातील आठवण, सात आठ वर्षाची असतानाची दक्षिण सातारा जिल्ह्यातील शिराळ्यात नाथाच्या देवळाजवळ सुंदर पिसार्‍याच्या मोराची तेथील पावसाची ओढ्याच्या पुरात सापडल्यावर आईच्या भेटीची तगमग, अशा प्रकारच्या अनेक प्रसंगांना तोंड देताना मनानं धरलेली हिंमत, कुतरओढ आणि भावनांचा खेळ त्यामुळेच जीवनाला गति येते. पुस्तकांतल्या भावनाविष्कारापेक्षां आयुष्यात हरघडी निर्माण होणाऱ्या संग्रमामुळे मनातल्या मनात होणारा भावनाविष्कार श्रेष्ठ दर्जाचा आहे. आयुष्याच्या महान ग्रंथातील खुणेची पाने फार मोलाची आहेत. जगावं कसं हे तीव्रतेने कळल्याखेरीज वाचलेलं, अभ्यासलेलं पचवून टाकून शहाणं कसं व्हावे हे कळणे फार कठीण आहे. स्वतःच्या जीवनाची पारख झाल्याशिवाय इतरांच्या जीवनाचा अर्थ समजणं त्यामुळंच फार अवघड होऊन बसतं! ‘मिस्टर स्पीकर सर !’ हे पुस्तक वाचत असताना बोटांची खूण धरुन मिटवले तेव्हा जीवनाकडे थोडं मागं वळून पाहिलं. निवडणूकीत विरोधी उमेदवारांनी केलेला प्रचार, निवडणूकीतील एकेक अनुभव आणि शेवटी निवडून आल्याचे जाहीर होणं, विधिमंडळातील पहिलं भाषण व त्याही कसोटीत उतरणं असा हा आपल्याशी हितगुज साधणारा सुंदर लघुनिबंध आहे.

२) माझं घर – छोट्या छोट्या काव्यात्मक वाक्यं हे या लघुनिबंधाचे वैशिष्ट्य. वाचताना नकळत मनात एक लय लागते. दारात उगवला चंद्र. अंगणात आलं चांदणं. भैन भावाचं निघाला बोलणं, अशी सुंदर सुरुवात होते. मुलुखातील गाव, चिरेबंदी घर, गोरंपान बाळ, सकाळची न्ह्यारी, दुध-दह्याची भरती झारी, सूर्यनारायणाची स्वारी, घराचा डामडौल, माडी उप्पर माडी, रेशमी साडी, घरी वासाचे तांदूळ, दारी वासाचं फूल, नवरा कृष्णदेव, नणंद, दीरजाऊ, सासूबाई, मामांजी, शेतमळा, ऊसमळा, गोड भ्रताराचं सुख असा सुंदर भावाबहिणीतील सुंदर संवाद यात चित्रित केला आहे.

३) आईची शाळा – लहान मुलांच्या संगोपनाबाबत शिकलेल्या स्त्रिया अलिकडे उत्सुक कां दिसत नाहीत व घरच्या नोकरांचेवर मुले सोडून इतरत्र अनेक कार्यक्रमात भाग घेण्यात त्या आनंद कां मानतात असा प्रश्न त्यांना कार्यक्रमात विचारला जातो. त्यावर त्या निरुत्तर होत असतात. स्त्रियांना फारसे शिकवूच नये म्हणजे हा प्रश्न निघायचा नाही अशा वडिलधार्‍यांच्या निर्णयाचा त्या उल्लेख करतात. शिक्षणाची गरज, स्त्रीला आपल्या मुलाला वळण लावता आले पाहिजे, गृहपाठ देता आला पाहिजे, आई ही मुलाची पहिली शिक्षिका आहे. घर हे स्त्रीचे मुख्य कार्यक्षेत्र. संस्कृतिसंवर्धनाची देवता म्हणून स्त्रीला पूर्वी समाजात मान मिळे. आज काळ बदलला आहे. शिकलेल्या स्त्रियांना घरकाम आवडेनासें झाले आहे. घराबाहेर वेळ काढण्याची त्यांची वृत्ति बळावत चालली आहे. एकेकाळी बाई जिवापाड मुलाला सांभाळीत असे. चिऊकाऊच्या गोष्टीपासून तो राजाराणीच्या कहाणीपर्यंत मुलांना गोष्टी सांगून त्यांची जिज्ञासा वाढीला लावीत असे. शाळेत जाण्यापूर्वी मुलाच्या मनाची जडणघडण तयार होत. हा विचार यात अगदी समर्पक शैलीत मांडला आहे.

४) ग्रामधर्माची माणसे – खेड्यातील माणसं भारी मागासलेली.. त्यांना संस्कृति म्हणून नाहीच. स्वतःचं देखील भलंबुरं कळू नये एवढी अडाणी असे धावत्या पळत्या इंग्रजीत काही मंडळी बोलायला लागतात तेव्हा त्यांच्या अज्ञानाची लेखिकेला कीव येते. त्यांनी कधी खेडे बघितले आहे का? उगाच कुणाचं तरी वाचून ऐकून बोलावं असे त्यांना वाटू लागते. खेड्यातील लोकांचे मानसशास्त्र निराळं आहे. त्यांचं जग जगून मग काय ते बोला. आपल्या हातानं घर सारवून घराचं मन निर्मळ करणारी खेडूत स्त्री गावंढळ कशी असू शकते. आपल्या घामाने उभ्या दुनियेला पोसणारं माणिक – मोती शेतात पिकविणारा शेतकरी अडाणी कसा म्हणावा? त्यांच्या संस्कृतीची पारख करणारे आम्ही कोण? वर्षानुवर्षे आपली खेडी स्वावलंबी ठेवून त्या गांवाच्या धर्मानं वागणारी आमची खेडुत माणसं नव्या सुधारलेल्या जगात किती अडाणी ठरतात या प्रश्नाने लेखिका व्याकुळते. खेड्यांविषयी व त्यातील माणसांविषयी लेखिकेने आपले विचार मांडले आहेत.

५) मी पाहिलेला नवा खेळ – या लघुनिबंधात लेखिका तमाशा पाहायला गेल्यावर त्यांच्या मनात उठणारे तरंग चित्रित केले आहेत. त्यांनी पाहिलेला हा खेळ सगळ्यांना आवडेल, त्यातील उत्तान शृंगारानं बायका उठून जाणार नाहीत आणि कला वाढीला लागेल यासाठी काय करावं? याची आज फार गरज आहे असा प्रश्न शेवटी त्यांनी विचारला आहे.

६) गैरसोयीचं आयुष्य – दुसर्‍या कुणाला आपल्यापायी दुखवायचं नाही हा लेखिकेचा स्वभाव. या त्यांच्या स्वभावानं मात्र त्यांची कशी विलक्षण गैरसोय करुन टाकली याचे वर्णन या लघुनिबंधात आहे. आपल्या भावनांचा चोळामोळा करुन स्वतःच्या भावनांना खतपाणी घालून वाढवणार्‍या स्वार्थी माणसांची आपणही किती किंमत राखायची हे आपल्याला कळलं पाहिजे असा विचार यात मांडला आहे.

७) आमचे आम्ही – घरातला कचरा बाहेर नेऊन टाकण्याच्या प्रवृत्तीवर हा लघुनिबंध आहे. अशा लोकांना जेव्हा इतर लोकांच्या घाण बाहेर फेकण्याच्या प्रवृत्तीचा त्रास होतो तेव्हा त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी कशी असते, रस्त्यावरचा कचरा स्वच्छ करायला म्युनिसिपालटीचे लोक असतात.. त्यांना त्यासाठी पगार मिळतो अशा लोकांच्या विचारधारेचेही मोठे गंमतीदार दर्शन यात लेखिकेने घडवले आहे.

८) स्वामी विवेकानंदांचा काळ – शेजारची २-४ जाणती काॅलेजात शिकणारी मुले हातात कागद धरुन जोरजोराने वाचीत होती व एकमेकांत काही बजावीत होती. ते कानावर आल्यावर लेखिकेचे तिकडे लक्ष जाते. त्यांना अप्पाकाकांनी सांगितलेले असते की काही चांगले वाचा. उत्तमातलं उत्तम वाचून आमचं मन धष्टपुष्ट झालंय. आम्ही स्वामी विवेकानंदांच्या काळातले आहोत. त्यांनी दिलेल्या टिपणाच्या वह्या ती मुले वाचत होती. आमच्यात बदल झाला नाही तर आप्पाकाका झोडपून काढतील असेही ते लेखिकेला सांगतात. त्यावर लेखिका त्यांना स्वामी विवेकानंदांच्या भाषेत समजावते की तोंडाने तुम्ही जे बोलता त्या भाषेत आणि तुमच्या कृतीत कधीही विसंगतपणा येऊ देऊ नका.

९) आमची जडण-घडण – लेखिकेला त्यांचे गुरुजी फार दिवसांनी भेटतात. आजकालच्या शिक्षणासंबंधी आपली आणि त्यांची मतं कितपत जुळतात यावरुन त्यांच्यात संवाद सुरु होतो. या संवादातून हा लघुनिबंध त्यांनी अगदी सुंदर रितीने फुलवला आहे.

१०) काव्यानंद मीमांसा – वनिता मंडळाच्या सभागृहात लेखिकेचा कार्यक्रम असतो पण बाहेर मुसळधार पाऊस पडत असतो. तशातही त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचतात. तेथील प्रसन्न वातावरणाने आपलं गाणं रंगणार म्हणून खात्री वाटते. त्या लोकगीत गातात. ते भावगीत असते. कुणाला चाल आवडते. कुणाला त्यातील भावना जिव्हाळ्याची वाटते. त्यांच्या गाण्याचे स्वागत होते. नव्या काळात जुनं काय कामाचे अशा मैत्रिणींच्या प्रश्नांची त्यांना आठवण होते. नभोवाणीसाठी त्या ‘नागपंचमी’ वर श्रुतिका लिहायचे कबूल करतात. ध्वनिक्षेपणाच्या दिवशी आलेला अनुभव त्या कथन करतात.

११) घरगुती माणसं – आयुष्याच्या प्रवासाची चढण चढत असतांना अशा प्रकारच्या माणसांशी आपली जी संगत जडत असते त्या माणसांना लेखिका घरगुती माणसं समजते. या माणसांचा आपल्या जीवनात संबंध येतो तो केवळ घरगुती प्रसंगापुरता. एरव्ही त्यांचं नि आपलं जग निराळं असतं. कांही काम निघेल तेव्हाच त्यांचं नि आपलं दर्शन घडायचं अशी वस्तुस्थिती असते. त्यांचे वडील असिस्टंट डेप्युटी होते. त्यांचा शिपाई येसू घरात आलेला असतो. त्याच्या आठवणी लेखिकेने सांगितल्या आहेत. नंतर येसूची जागा कोंडी घेते. नंतर लक्ष्मण कार्वे त्यांच्या घरात येतो. गोपीच्या नंतर आठवणी आहेत. नंतर लक्ष्मी. नंतर चंद्रा. सुंदर स्मरणसाखळी यात गुंफली आहे.

१२) शेजारधर्म – शेजारणींनं तिला लेखिकेने पैसे दिले नाही त्याचा वचपा मोलकरणीकडे आपलं धुणं आणून देऊन काढला. शेजारणीला आपली घरची मानून लेखिका हक्काने वागवायला गेल्या तर ते त्यांच्या गळ्याशी येते. नसता अपमान तिने त्यांना गिळायला लावला होता. शेजारणींच्या एकेक तर्‍हा या लघुनिबंधात लेखिकेने वर्णन केल्या आहेत. पण मग शेजारणीशिवाय चैनही पडत नाही असा गोड शेवट केला आहे.

१३) आपली तपासणी – फारच जरुरीचे काम निघाल्याने लेखिका एका मोठ्या गृहस्थाला भेटायला जातात. ७-८ मिनिटे ताटकळावे लागते. आपण ह्या गृहस्थाकडे काम घेऊन आलो हे चुकले की बरोबर इ. विचारांनी त्या अस्वस्थ होतात. शेजारी एक नव्यानेच आलेल्या बिऱ्हाडांत एक बाई पेशा मास्तरकीचा, लेखिकेला वाटते बाई स्वभावाने फारच चांगल्या असणार म्हणून त्या ओळख काढायला जातात पण त्यांचा असतो शिवण क्लास. गरज असेल तर तिकडे या असे म्हणून त्या मान फिरवून नापसंती दर्शवतात. असेच एके दिवशी लेखिका पत्र लिहायला बसतात तर तिथे शेजारची एक मोलकरीण तिथे एक पत्ता घेऊन येते आणि आपलं पत्र लिहायला सांगतात. त्याच क्षणाला त्या बाईच्या घरच्या पोराने दौतीला हातातल्या दांडूने टोला देऊन त्याच कागदावर उपडी केली. लेखिका पोरावर चिडून डोळा मोठा करते तर ती बाई लढाईच्या पावित्र्यात उभी राहते. असाच एक अनुभव जिला वाचवायची शिकस्त केली ती बाई बरी झाल्यावर धड बोलायलाही तयार होत नाही. या उलट एक बोहारीण लेखिका मोठी परीक्षा पास झाल्याचे समजल्यावर दंडावरच्या चोळीत ठेवलेला पेढा कौतुकाने लेखिकेच्या तोंडात घालते. दुसऱ्याचे दोष काढण्यापेक्षा आपण स्वतःलाच आधी तपासून बघावं असा विचार शेवटी मांडला आहे.

१४) ज्ञानदेवी आणि मी – ज्ञानदेवांच्या ज्ञानदेवीला लेखिका लहानपणी जवळून पाहते तिची त्यांच्याशी सोबत जुळते व तिच्याशी जिवाभावाचे सूत जमते याचे लेखिकेने या लघुनिबंधात वर्णन केले आहे. त्यासाठी त्या तिच्या आकर्षक आणि गोंडस स्वरुपाप्रमाणे तिनं केलेली भाषा हे कारण देतात. केवळ धार्मिक भावना उराशी बाळगून ज्ञानदेवीची पारायणे न करता तिचा अभ्यास करण्याचा त्यांना बी ए व एम ए च्या परीक्षेच्या निमित्ताने योग येतो. हा त्यांना अपूर्व योग वाटतो. त्यांचे गुरुजी म्हणजे प्राचार्य सोनोपंत दांडेकर. ज्ञानदेवांची ज्ञानदेवी लिहिण्यामागची भूमिका, त्यांची विनयशीलता, थोरवी आणि ज्ञानेश्वरीची महती या लघुनिबंधात लेखिकेने अतिशय उत्कटपणे मांडली आहे.

१५) जुनी श्रध्दा – एका म्हातारीच्या लेखिकेची दृष्ट काढण्याच्या भोळ्या श्रध्देने त्यांना जिंकले असे या लघुनिबंधात त्या वर्णन करतात. ही श्रध्दा महत्त्वाची नसली तरी दृष्टिआड करण्याजोगीही नाही. तिच्यामागे वात्सल्यामुळे निर्माण होणाऱ्या भीतीची भावना आहे. गुणांचे कौतुक आहे आणि त्या कौतुकाला बाध येऊ नये म्हणून भोळ्या भावनेने परंपरागत चालत आलेले निराकरणहि आहे म्हणून हा गुण घेण्यासारखा आहे असे त्यांना वाटते. पाल चुकचुकणे, तुळसीवृंदासमोर शेणाच्या गौळणी घालणे, दसरा आला की देव्हार्‍यात पत्रावळीवर काळी माती घालून व तीत धान्य पेरुन त्याचे कोंब आणणे, संक्रातीला ववसा पूजणे, नागपंचमीला दळणं, कांडणं, सारवणं, लाटणं हे सारं बंद ठेवणं अशा पिढ्यानपिढ्या जुन्या माणसांनी चालवलेल्या श्रध्दा कोणत्या हेतूने बाळगल्या ते लेखिकेच्या लक्षात येते.

१६) नव्या आयुष्यात – निवडणूकीच्या नव्या आयुष्यात प्रवेश करताना लेखिकेला वाटते की आता मनाला येईल तसे वागू. पण प्रचार करताना त्यासाठी गावोगावी भटकताना आपल्या मार्गातला ससेमिरा संपला नाही याची त्यांना जाणीव होते. विधानसभेत निवडून गेल्यावर तिथेही निराळी कटकट.

१७) समाज-चित्रे – एक वयोवृद्ध गृहस्थ जे मोठे समाजसेवक होते ते एकदा लेखिकेकडे येतात आणि ”आता तुमचं कसं होणार ?” असे विचारतात. आमदार होता, पगार मिळत होता, आता इलेक्शनला उभ्या राहिला नाहीत. आता भागणार कसं? काय ही चौकशी. हा नाउमेद करायचा मार्ग की पाठिंबा व्यक्त करुन सहानुभूती दाखवायचा प्रकार! दुसर्‍या एका प्रसंगात एक फार मोठे म्हातारे पंडित लेखिकेचा कार्यक्रम आवडला म्हणून अभिनंदन करतात. तिसऱ्या एका प्रसंगी लेखिका झोपेत असताना एक ओळखीची बाई तिथे येते. समाज कल्याण समितीवर आपण नाही हे लेखिकेने तिला सांगताच ती तडकाफडकी निघून जाते. अशा विविध प्रसंगांतून लेखिकेने या लघुनिबंधात विविध समाज चित्रे आपल्यापुढे उभी केली आहेत.

१८) अनोळखी माणसं – लहानपणापासून लेखिकेशी अगदी खेळीमेळीने आणि जिवाभावानं वागणारी कमळी तिरसटासारखे वागते. लग्न झालं की माणूस एवढं बदलतं की काय असा त्यांना प्रश्न पडतो.त्यांना जी माणसं ओळखीची वाटतात आणि ज्यांच्यावर त्या विश्वासून राहते त्यांच्यापैकी अनुभवानं पुढे बरीच अनोळखी ठरली आहेत. अशी अनेक उदाहरणे त्या या लघुनिबंधात देतात.

१९) स्नेहसंमेलन -भाद्रपदात लेखिकेच्या शेजारणी हळदीकुंकवाला एकत्र जमतात. संगीत फुगडी, उखाणे, कोंबडा, खेळ, गाणी त्याचे लेखिका फोटो काढून घेते. हे स्नेहसंमेलन त्यांच्या मनात ठाण मांडून बसते.

२०) ही माणसंहि बोलतात – लेखिका हळदीकुंकवाच्या निमित्ताने एका गावात जातात. त्या निमित्ताने तेथे बायका जमतात. त्या कार्यक्रमात लेखिका त्यांना बोलते करते. ही माणसंहि बोलकी असतात पण आपण त्यांना संधी दिली पाहिजे. बोलू दिलं पाहिजे. त्यांच्याशी एकजीव झालं पाहिजे. त्यांना हवं ते दिलं पाहिजे. आपला देश खरा हा.

डॉ सरोजिनी बाबर

२१) आतां इथंच थांबूं या ! – लहानपणापासून काबाडकष्ट करणारा, कोणीही विचारपूस करणारे नसलेला ‘भैय्या’ याच्याशी लेखिका संवाद साधते. आता तू हे आयुष्य सोडून दे सांगते. त्याला शिकवायला तयार होते पण तो सांगतो ‘नग आता मला इथंच थांबू द्या बाईसाहेब! वज्जी उचलून उचलून हात लाकडावाणी कठीणढोक झाल्याती तिथं लेकनी बसल कशी हो ? परमेश्वर ठेवील त्या परिस्थितीत जीवनाचं केलेलं मोजमाप भैय्यासारखे प्रत्येकाला करता आलं पाहिजे.

डॉ सरोजिनी बाबर यांचे समग्र साहित्य पुन्हा प्रकाशित होण्याची आवश्यकता आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. सरोजिनी बाबर यांच्या पुस्तकांतील गोषवारा अतिशय सुंदर त-हेने मांडला आहे. प्रत्येक पुस्तक वाचण्याची इच्छा तीव्र व्हावी असा हा गोषवारा आहे. धन्यवाद 🙏🏻

  2. धन्यवाद सर, अजून एक छान वाचनात आले आपल्यामूळे. यातील जुनी श्रद्धा हा लेख वाचनीय आणि रोमांचक आहे. जुन्या चालीरीती बाबत सर्व काही नमूद आहे.👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा