गेल्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अकोला येथे न्यू ईरा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचा आनंद मिळाला. तर या 14 फेब्रुवारी रोजी मी पदवी मिळविलेल्या नगर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहता आले. अशा मेळाव्याचा मुख्य फायदा म्हणजे आपले वर्ग मित्र भेटतात, हा होय. ते इतक्या वर्षांनी भेटत, दिसत असल्यामुळे होणारा आनंद अवर्णनीय असतो.
नगरच्या मेळाव्यात मला माझे वर्ग मित्र सर्वश्री जालिंदर भोर किशोर सोनावणे, नितीन कुलकर्णी, गणेश काकाणी, संजीव भोगे, निकुंभ हे भेटले. सर्वश्री किशोर सोनावणे आणि जालिंदर भोर यांच्याशी माझ्या नियमित भेटीसाठी होत आल्या आहेत. पण बाकी चौघे मात्र चक्क 43 वर्षांनी पहायला मिळाले, याचा मला अतोनात आनंद झाला.

मेळाव्याच्या शानदार उद्घाटनपर समारंभात मी लिहिलेली आम्ही अधिकारी झालो, करिअरच्या नव्या दिशा, माध्यमभूषण, कला साहित्य भूषण ही चार पुस्तके कॉलेजला भेट दिली. तसेच माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी मला मिळाली.
मध्यंतर झाल्यावर समूह भोजनाचा आस्वाद घेता आला. त्यानंतर कॉलेजच्या परिसरात मारलेला फेरफटका तर भूतकाळाची सुंदर सैर घडवुन आणणारा ठरला. पण कॉलेजमध्ये बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने वातावरणात तणाव जाणवत होता.
भोजनानंतरच्या सत्रात सर्व काही माजी विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. तसेच एकमेकांच्या ओळखीपाळखी झाल्या. त्यातूनच लाभलेले एक नवे मित्र म्हणजे दिपक पापडेजा होत.
उपरोक्त मेळाव्याचा वृत्तांत आपण पुढील👇लिंक वर क्लिक करून पाहू, वाचू शकता.
अहमदनगर महाविद्यालय : सुखद मेळावा…
✒️ प्रा. जवाहर मुथा. 👇
https://newsstorytoday.com/अहमदनगर-महाविद्यालय-सुख/
या मेळाव्यात ओळखीचे झालेले दिपक पापडेजा ह्यांचे मला खूप कौतुक अशासाठी वाटते की, एका बहुराष्ट्रीय औषध कंपनीचे ते विक्री अधिकारी असले तरी स्नेहालय संस्थेच्या कामात सुरुवातीपासूनच अग्रेसर रहात आले आहेत. नोकरीमुळे प्राप्त झालेली व्यावसायिक कौशल्ये ते मोठ्या कौशल्याने स्नेहालय साठी वापरत असतात. माझी ओळख झाल्यावर मला त्यांनी अतिशय अगत्याने मला स्नेहालय संचलित “रेडिओ नगर” केंद्रात नेले. तेथील निवेदिका अनुराधा यांच्याशी माझी ओळख करून देऊन त्यांना माझी मुलाखत घ्यायला सांगितले. तशी काही वर्षांपूर्वी माझी “रेडिओ नगर” वर एकदा मुलाखत झाली होती. पण त्यावेळचे रेडिओ नगर आणि आत्ताचे रेडिओ नगर ह्यात खूप छान बदल झाला आहे. पीकार्यक्रम कार्यक्रमांचे स्वरुप, प्रसारण, अद्ययावत स्टुडिओ, तांत्रिक सुविधा, अंतर्गत सजावट असे सर्व काही बदललेले कौतुकास्पद आहे. ज्यांना रेडिओ क्षेत्राची आवड आहे, अशा व्यक्तींनी तर नगर येथे गेल्यावर ह्या केंद्राला अवश्य भेट द्यावी.
मुलाखतीचे ध्वनीमुद्रण झाल्यावर जेष्ठ पत्रकार तथा रेडिओ नगर चे प्रमुख श्री भूषण देशमुख ह्यांचे आगमन झाले. त्यांची आधीची ओळख असल्याने भेटण्यात काही औपचारिकता न राहता अतिशय स्नेहाने ही भेट झाली. रेडिओ नगर तर्फे त्यांनी मला एक छान पुस्तक आणि प्रमाणपत्र भेट दिले. मी ही माझे “कला साहित्य भूषण” हे पुस्तक भेट दिले.
हे सर्व आटोपल्यावर दिपकजीनी स्नेहालय आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सहयोगाने ‘महिलांची छेडछाड आणि पाठलाग’ या विषयावरील दोन दिवसांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेबाबत माहिती देऊन दुसर्या दिवशी, कार्यशाळेस भेट देण्याचा आग्रह केला. त्यात या निमित्ताने स्नेहालय परिसरात उभ्या राहिलेल्या नवीन वास्तू बघता येतील असे ही सांगितले. त्यामुळे मी दुसर्या दिवशी तिथे येण्याचे मान्य केले.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी जरी मी उपस्थित नव्हतो, तरीही ह्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन, प्राप्त केलेल्या माहितीनुसार पहिल्या लाटेत आपल्या दिवशीचा वृत्तांत पुढे देत आहे.
ह्या कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ विजया रहाटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना त्यांनी मुली आणि महिलांना सुरक्षा, सन्मान देणं ही पोलिसांबरोबर कुटुंबीय आणि समाजाचीही जबाबदारी आहे असे सांगून मुलींना आपला आवाज उठवता आला पाहिजे; अन्यथा प्रारंभी किरकोळ वाटणारी छेडछाड आणि पाठलागाची घटना गंभीर बनू शकते, असा इशारा दिला.

स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी स्नेहालय महिलांसाठी करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यापुढे “व्हॅलेंटाईन डे” हा “अँटी स्टाॅकिंग डे” म्हणून साजरा करावा, या त्यांनी केलेल्या सूचनेस रहाटकर यांनी तात्काळ समर्थन दिलं.
स्नेहाधारच्या अहिल्यानगर आणि पुण्यातील कामांविषयीची माहिती विद्या आणि मानसी चंदगडकर यांनी दिली. स्नेहालयाचे संचालक हनिफ शेख यांनी संस्थेच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.

नीक कॉक्स, तसेच स्वाती भटकळ यांनी ‘स्टॉकिंग’ या विषयावर तयार केलेल्या चित्रफिती यावेळी दाखवण्यात आल्या.
प्रारंभी स्नेहालयाची विद्यार्थिनी साक्षी हिने महामानव बाबा आमटे यांची ‘थांबला ना सूर्य कधी थांबल्या ना धारा..’, ‘दिवारे उची है…’ या कविता, तर आयएमएस अॅकॅडमी अँड परफॉर्मिंग आर्टसच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम सादर केलं. सूत्रसंचालन रूपाली खरडकर यांनी केले.
चेहर्याला लावण्यात येणार्या पावडरीत टाल्कम हा विषारी घटक असून त्यामुळे कॅन्सरही होऊ शकतो. टाल्कम नसलेली फेसपावडर इंग्लंडमधील कॅरोलिन हॉर्नसबी आणि जॉईस कनोली यांनी स्नेहालयात उत्पादित केली आहे. या पावडरच लॉंचिंग यावेळी करण्यात आले.

महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अतिरिक्त पोलिस महासंचालक आश्वती दोरजे, तेलंगणामधील प्रज्वला संस्थेच्या डॉ. सुनिता कृष्णन, तेलंगणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत, न्यायाधीश योगेश पैठणकर, अॅडव्होकेट शिरीन मर्चंट, जिल्हा पोलिस प्रमुख सोमनाथ घार्गे आदी यावेळी उपस्थित होते.

दुसर्या दिवशीच्या सत्रात मानसिक आरोग्य, चित्रपट, रंगभूमी, साहित्य या क्षेत्रातील मान्यवरांनी विविध संलग्न विषयांची मांडणी केली. मानसग्राम प्रकल्पात कार्यरत रूपाली खराडकर यांनी डॉ. साठे यांची प्रकट मुलाखत घेतली.
डॉ. साठे म्हणाले की, लिंग आधारित भेदभाव आणि अत्याचार कमी करण्यासाठी कुटुंबाने मुलगा आणि मुलगी या दोघांनाही समान वागणूक द्यावी. डॉ. साठे पुढे म्हणाल्या की, घर आणि शाळा या दोन्ही स्तरांवर समान कामे, समान संधी आणि समान जबाबदाऱ्या मुला मुलींना मिळाल्या तरच समानतेचे मूल्य समाजात रुजेल.
जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मानसग्राम प्रकल्पातील मानसोपचार तज्ञ डॉ. तेजस्विनी मिस्कीन यांची मुलाखत स्नेहालय संस्थेच्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख संजय चाबुकस्वार यांनी घेतली.डॉ. तेजस्विनी मिस्कीन नमूद केले की,मानसिक प्रवृत्ती आणि विकृतींमुळे व्यक्ती वास्तव आणि कल्पना यामधील सीमारेषा ओलांडते. त्यातूनच पाठलाग, छळ असे त्रासदायक वर्तन होत जाते.
डॉ. प्रीती भोम्बे यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधील प्रोफेसर तसेच भारतातील आघाडीचे ध्वनीतज्ञ कामोद खराडे यांची मुलाखत घेतली.श्री.खराडे म्हणाले की,अनेक चित्रपटांमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, जबरदस्तीने प्रेम व्यक्त करणे, किंवा एखाद्या स्त्रीवर अधिकार गाजवण्याची भावना यांचे चित्रण आढळते. अशा प्रकारचे सादरीकरण समाजाच्या मानसिकतेवर दुष्परिणाम करतात.
इंग्लंडमधून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां कॅरोलिन हॉर्नसबी ह्यांनी तेथील कायदे आणि भारतीय कायदे यांचा तौलनिक अभ्यास सादर केला.
हे दोन कार्यक्रम झाल्यावर मी नको नको म्हणत असताना स्नेहालय चे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी ह्यांनी मला व्यासपीठावर बोलावून शाल, पुष्पगुच्छ आणि अहिल्यादेवी होळकर यांची सुंदर मूर्ती भेट देऊन सत्कार केला.

भोजनानंतरच्या सत्रात नगरचे लोकप्रिय जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ह्यांची मनमोकळेपणाने मुलाखत झाली. उपस्थितांच्या काही सूचनांचे त्यांनी केवळ स्वागत न करता पोलिसांमधील संवेदनशीलता वाढण्याची गरज मान्य करून या साठी स्नेहालयाच्या सहकार्याने एक विशेष कृती कार्यक्रम हाती घेण्यात येईल, असे सूतोवाच केले. ह्या त्यांच्या सूचनेला डॉ गिरीश कुलकर्णी यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात ह्या प्रतिसादाचे स्वागत केले.
ह्या कार्यक्रमाहून परत येताना माझी पुतणी सौ दिपा, जावई श्री जितेंद्र सिंग ह्यांची त्यांच्या घरी जाऊन उभ्या उभ्या भेट घेतली. वेळेअभावी जेवून जाण्याचा आग्रह त्यांचा प्रेमळ आग्रह मान्य करता येईना म्हणून मग दिपाने छानपैकी पराठे लोणचे, इडल्या, चटणी असे सर्व डब्यात दिले. खरीखुरी भूक लागली असताना, असे काही खाण्याचा आनंद काही औरच असतो.
या भेटीची एक महत्वाची उपलब्धी म्हणजे मित्र अनिल शाह ह्याच्या तीनचार वर्षापासुनच्या सततच्या आग्रहामुळे त्याचे नवीन घर नुसते पाहायलाच मिळाले नाही तर त्याच्या आणि मयुरी वहिनींच्याही आग्रहामुळे दोन दिवस त्यांच्या घरी राहता आले. खूप गप्पा गोष्टी करायला मिळाल्या आणि त्या महत्वाचे म्हणजे मला मनाप्रमाणे दोघांचीही मुलाखत घ्यायला मिळाली. ही मुलाखत आपण पुढील 👇 लिंक वर क्लिक करून वाचू शकता.
झेप :12
“अनिल शाह”
✒️ देवेंद्र भुजबळ. 👇
https://newsstorytoday.com/झेप-12/
एकंदरीत अपेक्षेपेक्षा नगर भेट खूपच छान, अविस्मरणीय झाली.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
