“कुष्मांडा देवी”
आज 25 सप्टेंबर 2025. नवरात्रातील चौथा दिवस ! जाणून घेऊया या रूपाची माहिती.
नवरात्रातील देवींच्या नऊ रूपांपैकी पाहिले शैलपुत्री, दुसरे ब्रह्मचारीणी, तिसरे चंद्रघंटा देवी तर या देवीचे, दुर्गेचे चौथे रूप म्हणजे ‘कुष्मांडा देवी !’ आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. ही सृष्टीची आद्यशक्ती आहे.
शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी साधकाचे मन ‘गती चक्रात’ स्थित असते. सनातनच्या धर्मग्रंथात असे सूचित केले आहे की विश्वाची निर्माती कुष्मांडा माता सूर्यमालेत वास करते. या देवीच्या चेहऱ्यावर तेज दिसते. या प्रकाशाने संपूर्ण विश्व प्रकाशित झाले आहे.
कुष्मांडा मातेची पूजा केल्याने साधकाला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच शारीरिक आणि मानसिक विकारांपासून आराम मिळतो अशीही मानता आहे.
देवी कुष्मांडा ही आठ हातांची आहे. तिच्या हातात अनुक्रमे गदा, कलश, कमळ, कमंडलू आणि धनुष्य-बाण आहेत. तिच्या एका हातात जपमाळ आहे. याने तिन्ही लोकांचे कल्याण होते. आईचे वाहन सिंह आहे.
देवी कुष्मांडा आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करते आणि त्यांना सुख, शांती आणि समृद्धी देते. शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या पद्धतीने मातेची पूजा करा. तेज आणि यश, कीर्ती देणारी दैवता अशी तिची महती आहे.
पुजेची पद्धत :
शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. यावेळी सर्वप्रथम देवीचे ध्यान करून तिची पूजा करावी. यानंतर, घर स्वच्छ करावे. रोजचे काम उरकून गंगाजल असलेल्या पाण्याने स्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करून सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे. आता खालील मंत्राने मातेचे आवाहन करावे..
1 या देवी सर्वभूतेषु माँ कूष्मांडा रूपेणसंस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।
2 ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै’
3 ॐ जयन्ती मंगला कालीभद्रकाली कपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते ।।
आता कुष्मांडा देवीची पूजा फळे, फुले, धूप, दिवा, हळद, चंदन, कुमकुम, दुर्वा, सिंदूर, दीप, अक्षता इत्यादींनी साग्रसंगीत पूजा करुनदेवीला मालपुआ अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच देवीला प्रसाद म्हणून मालपुव्याचा नैवेद्य दाखवावा. देवी पूजे दरम्यान चालीसा आणि मंत्रांचा जप अवश्य करावा. शेवटी, आरती करावी आणि सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. दिवसभर उपवास ठेवावा. संध्याकाळी आरती करुन फळे खावी, मिठाई खावीत. अशी मनोभावे पूजा केली तर देवी कुष्माण्डा सर्वांना नक्कीच प्रसन्न होईल.
या देवीला पिवळा रंग आवडतो, आजचा शुभ रंग सुद्धा पिवळाच असल्यामुळे या रंगाची वस्त्रे परिधान केली तर उत्तम फळ मिळते अशी भाविकांची श्रद्दा आहे.
क्रमशः

— लेखन : सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.