“चंद्रघंटा देवी”
आज 24 सप्टेंबर. नवरात्राचा तिसरा दिवस ! देवींच्या नऊ रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते. त्यापैकी पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी म्हणजेच भवानी, पार्वती देवी तर दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारींणी म्हणजेच तपश्चारीणी देवी यांची माहिती आपण पाहिलीच आहे. आता नवरात्रातील तिसरी देवी चंद्रघंटा देवी हिची माहिती पाहू.
नवरात्रीमध्ये तिसरी माळ ही देवी चंद्रघंटा हिच्या नावाने बांधतात. तिसऱ्या दिवशी दुर्गेची तिसरी शक्ती चंद्रघंटा या देवीची पूजा केली जाते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो. विविध प्रकारचे दिव्य आवाज ऐकायला येतात.
साधकासाठी हे क्षण अत्यंत महत्वाचे असतात. या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते. शांतीदायक आणि कल्याणकारी अशी ही देवी सर्व संकटांचे निवारण करते. मस्तकावर घंटेचा आकार असणारा अर्धचंद्र असल्यामुळे हिला चंद्रघंटा देवी म्हणतात.
नवरात्रमध्ये तिसऱ्या दिवशी या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. हा लाल रंग म्हणजे सर्वाच्या वैयक्तिक आयुष्य आणि व्यवसायिक आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारा हा रंग आहे.
नवरात्रीतील देवीचे चंद्रघंटा स्वरुप खूपच कल्याणकारी असतं असे मानले जाते . चंद्रघंटा देवीला दशभुजा असून गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ असते. गोकर्ण किंवा कृष्णकमळ यांची मालाही तिला प्रिय आहे .
चंद्रघंटा देवीला दहा हात आहेत. खड्ग, धनुष्यबाण ही तिची शस्त्रे आहेत. तर वाहन सिंह आहे. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. नेहमी युद्धासाठी तयार अशी हिची मुद्रा आहे.
चंद्राघंटा देवीच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर होतात. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. हा लाल रंग वैयक्तिक आयुष्य ते व्यवसायिक आयुष्यापर्यंत सर्वात जास्त प्रभाव टाकणारा रंग आहे. सगळ्यात जास्त आकर्षक मानला गेलेला रंग आहे. म्हणून लाल रंगाला सर्वांत जास्त महत्व आहे. अधिक आशादायी आणि कार्यक्षम असा हा लाल रंग आहे.
भारतात आणि बऱ्याचशा पूर्व आशियाई देशात लाल रंगाला खूप महत्त्व आहे. लग्नकार्यात वधूची साडी, कपाळावरचे कुंकू, शेला, तोरणे यांचा हा रंग. सर्वांचे लक्ष लवकर वेधून घेणारा हा रंग. धोका दर्शवण्यासाठी जगभरात हा प्रमाणित आहे. लाल रंगाची जे निवड करतात ते अधिक आशादायी आणि कार्यक्षम असतात. उत्साह, क्रिया, इच्छाशक्ती याचे हा रंग प्रतीक आहे. शक्ती, युद्ध आणि धोका यांना सूचित करणारा, लाल रंग आकर्षित करून घेणारा आहे. लाल रंगामुळे पचनक्रिया आणि श्वसनक्रिया सुधारते तर रक्तदाब वाढतो. ‘मी, माझे’ या भोवतीच घुटमळणारा रंग असे याचे वर्णनं करता येईल. याच्या प्रभावाखाली बाकीचे सर्वच रंग एकदम फिके पडतात .
स्त्रियांच्या आयुष्यात लाल रंगाचे विशेष महत्व आहे. एखाद्या मिटिंगमध्ये स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, कोणासमोर भाषण देताना हा रंग सर्वाचे लक्ष तुमच्यावर केंद्रित करायला, आकर्षीत करायला मदत करतो. लहान मूल सुद्धा म्हणूनच तर लाल रंगाकडे लगेच आकर्षित होते. लाल रंग शारीरिक ऊर्जेशी जोडला गेला आहे. या रंगामुळे स्वत:ची शारीरिक ऊर्जा वाढते पण समोरच्याची कार्यक्षमता आणि विचार करण्याची कुवत घटते. वेगाचा, आक्रमकतेचा, स्त्री-पुरुषातील आकर्षणाचा रंग आहे. स्त्रियांच्या आयुष्यात याचे विशेष महत्व. दर महिन्याला स्त्रीच्या शरीरात जो सृजनाचा उत्सव साजरा होतो त्या शरीरधर्माचा, स्त्रीत्वाचा हा रंग समजला जातो.
चंद्रघंटा देवीचे पूजन अत्यंत मनोभावे करावे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर व्रताचा संकल्प करून पूजा करावे. चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान करावे, तसंच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये खीर, बर्फीचा आवर्जुन ठेवा. याशिवाय देवीला मध अर्पण करा.
नवरात्रीच्या तिसर्या दिवशी चंद्रघंटा देवीसमोर एका छोट्या लाल कपड्यात लवंग, सुपारी आणि पान ठेवून ते चंद्रघंटाच्या चरणी अर्पण करा. यानंतर देवाच्या नवार्ण मंत्राचा 108 वेळा जप करा. त्याशिवाय तुम्ही चंद्रघंटाच्या बीज मंत्राचाही जप करु शकता. त्यानंतर ही लाल कपड्यात सुपारी, लवङ्ग बांधलेली पर्चुंडी तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे ठेवा. जेव्हा तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी निघाल किंवा न्यायालयाशी संबंधित कोणतेही काम तेव्हा हे बंडल जवळ ठेवा. या उपायामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि शत्रूची प्रत्येक चाल अपयशी ठरण्यास मदत होत, भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली, अशी आख्यायिका आहे. या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होते असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होतं, असं शास्त्रात सांगितलं आहे.
चंद्रघंटा देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला मनोभावे नमस्कार करून पुढील मंत्र म्हणावा….
*चंद्रघंटा देवीचा मंत्र :*
पिण्डकोपास्त्रकेर्युता ।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता ॥
या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम: ।।”
यावर्षी तिसऱ्या दिवशी ग्रह आणि नक्षत्राच्या रचनेनुसार या दिवशी निळा रंग शुभ दर्शवला आहे. त्यामुळे यादिवशी सर्वजण निळ्या रंगाची वस्त्रे, साड्या देखील परिधान करु शकतो.
क्रमशः

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800