“पाचवे रूप : स्कंदमाता”
आज २६ सप्टेंबर ! नवरात्रीचा पाचवा दिवस ! जाणून घेऊ या देवीची महती.
नवरात्रातील देवींचे पहिले शैलपुत्री, दुसरे ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा या चारही देवींची माहिती आपण घेतली आहेच. आता देवीच्या पाचव्या रूपाने ओळखल्या जाणाऱ्या, ‘स्कंदमाता देवी’ ची माहिती करून घेऊ .स्कंदमाता ही पंचमीला पूजली जाणारी देवी, ही स्कंद (किंवा कार्तिकेय)ची आई आहे. ही स्कंदमाता देवी आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा तिचे मूल धोक्याचा सामना करते, ती एका भयंकर सिंहावर स्वार होत, चार हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवली आहे. याबाबतीत अशी कथा आहे की, तारकासूर नावाचा एक उन्मत्त राक्षस सर्वांना खूपच त्रास देत होता. त्याने उग्र तपश्चर्या करून ब्राह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. आणि अमर होण्याचा वर मागितला पण ब्रह्मदेवांनी सांगितले की जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू आहेच, तर दुसरा वर माग. त्याला वाटले की भोलेनाथ लग्नच करणार नाहीत, मग त्यांना पुत्र ही होणार नाहीच,म्हणून त्यांनी महादेवाच्या मुलाच्या हातून मृत्यू द्या असा वर मागितला. पुढे महादेवांनी पार्वतीशी लग्न केले आणि त्यांना कार्तिकेय हा पुत्र झाला. त्याने तारकासूराचा वध केला आणि साऱ्यांची त्याच्या जाचातून मुक्ती केली.

स्कंदमाता म्हणजेच पार्वती !
शास्त्रात नवरात्रीच्या पूजेच्या पाचव्या दिवसाचे खूप महत्त्व सांगितले आहे. देवी स्कंदमाते पूजा केल्याने अपत्यप्राप्ती होते.
स्कंदमातेचे रुप :
शास्त्रानुसार, स्कंदमाता देवी सिंहावर स्वार आहे. तिला चार हात आहेत. तिने एका हाताने बाल कार्तिकेयाला मांडीवर घेतले आहे. तर, दुसऱ्या हाताने भक्तांना आशिर्वाद देत आहे. इतर दोन्ही हातात कमळाचे फूल आहे. तिचा रंग गोरा आहे. स्कंदमाता देवीला पद्मासन देवी असेही म्हटले जाते.
स्कन्दमातेच्या आराधनेचे महत्त्व :
देवी आपल्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि त्यांचे दुःख दूर करते. अपत्यप्राप्ती देवीची पूजा करणे उत्तम मानले जाते. देवीच्या पूजेसाठी लाल फुले, पिवळे तांदूळ आणि एक नारळ लाल कपड्यात बांधून देवीची ओटी भरा. ज्यामुळे घरातील अनेक अडचणी दूर होतात. स्कंदमाता मोक्षाचा मार्ग दाखवते. तसेच तिची पूजा केल्याने भक्तांना ज्ञान प्राप्त होते. आईचे रुप हे प्रेम आणि वात्सल्य यांचे खरे प्रतीक आहे.
पूजाविधी :
शारदीय नवरात्रीच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी सकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. त्यानंतर देवीची पूजा करून तिच्या मूर्तीला पंचामृताने, शुद्धोदकाने अभिषेक करावा . स्कंदमाता आणि भगवान कार्तिकेय यांची नम्रतेने पूजा करावी. पूजेमध्ये कुंकू, तांदूळ, फुले, फळे इत्यादींचा समावेश करावा. देवीच्या समोर चंदन आणि तुपाचा दिवा लावा. यानंतर फुले अर्पण करून अन्नदान करावे. देवीची मनोभावे पूजा, आरती करावी आणि खालील मंत्राचा जप करावा. देवीसाठी पुढील मंत्र म्हणावा :
सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।
या देवी सर्वभूतेषु स्कंदमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
आवडता नैवेद्य :
स्कंदमाता देवीला केळी खूप आवडतात. म्हणून तिला केळीचा नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणानाही केळी अर्पण कराव्यात .असे केल्याने बुद्धीचा विकास होतो. देवीची आरती केल्यानंतर ५ कुमारीकांना केळीचा प्रसाद वाटवा, ज्यामुळे देवी स्कंदमाता खूप प्रसन्न होते आणि मुलांवर येणारे सर्व त्रास नष्ट होतात.
स्कंदमातेचे मनोभावे पुजन केल्यामुळे मातृत्व तर प्राप्त होतेच, शिवाय सर्व मनोकामना पूर्ण होऊन मोक्षप्राप्तीही होते म्हणूनच या स्कंदमातेची श्रद्धेने, मनोभावे पूजन करावे.
2025 च्या ग्रहांच्या स्थितीनुसार यादिवशी हिरवा रंग शुभ आहे. त्यामुळे सर्वांनी हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान केल्यास दिवस शुभ, आनंदात जाईल.
“सहावे रूप:कात्यायनी देवी”
नवरात्रीतील देवीच्या सहाव्या रूपाची म्हणजेच ‘कात्यायनी देवी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या रूपाची माहिती जाणून घेऊ.
आश्विन शुद्ध षष्ठीचे दुर्गामातेचे सहावे रूप कात्यायनी या नावाने प्रसिध्द आहे. कत महर्षीचा पुत्र कात्य याच्याच गोत्रात महर्षि कात्यायन झाले. हे भगवती पराम्बेचे निष्ठावंत उपासक होते. यांच्याच कठोर तपस्येने देवीने यांच्या पोटी कन्यारूपाने जन्म घेतला म्हणून हिचे नाव कात्यायनी असे पडले. नवरात्रीतील शुक्लसप्तमी, अष्टमी, नवमीला कात्यायन ऋषींनी हिचे पूजन केल्यावर दशमीला हिने महिषासुर राक्षसाचा वध केला आणि तिचे नाव झाले महिषासुरमर्दिनी ! सोन्या सारखा हिचा वर्ण चकचकीत असून भव्य दिव्य असे तिचे स्वरूप आहे. ही कात्यायनी देवी चतुर्भुजा असून उजवा वरचा हात अभय-मुद्रा आहे. खालचा वरमुद्रा आहे. डाव्या खालच्या हातात खड्ग, वरच्या हातात कमळ आहे हीचे वाहन सिंह आहे. त्यामुळे ती सिंहावर बसलेली आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ति हिच्या उपासनेमुळे भाविकाला होते जेव्हा तिन्ही लोकांमध्ये महिषासुराचे अत्याचार वाढले होते तेव्हा कात्यायन ऋषींनी तपस्या केल्यावर ब्रह्मा, विष्णु व महेश याचे अंश घेऊन कन्येच्या रूपात माता दुर्गा प्रकट झाली. तिलाच कात्यायन ऋषींनी मुलगी मानले, त्यामुळे तिचे नाव देवी कात्यायनी पडले. तिला युद्धाची देवी मानली जाते. देवी कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला चार हात आहेत. तिच्या एका हातात तलवार आणि एका हातात कमळ आहे. तर इतर दोन हात वरदमुद्रात आहेत. तिच्या गळ्यात पांढऱ्या फुलांच्या माळा घातलेल्या आहेत.

कात्यायनी ही अमोघ फलदायिनी आहे. हिचे स्वरुप अतिशय भव्यदिव्य आहे. कांती सोन्यासारखी तेजस्वी आहे.उजव्या हातावर स्वास्तिक आहे. असेही म्हणतात की, कृष्णाला मिळवण्यासाठी वृंदावनातील गोपींनी हिची पूजा कालिंदी नदीच्या तटावर केली होती. म्हणूनच तिला वृंदावनाची देवी म्हणतात. हिच्या पूजनाने मनःशांती प्राप्त होते, मन स्थिर होते ते ‘आज्ञाचक्रात’ स्थिर होते. योगसाधनेत याला खूप महत्व आहे.
कात्यायनी देवीची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.सर्व अडथळे,विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी शेणाची गौरी जाळून त्यावर लवंग आणि कापूर ठेवून जाळावा. यानंतर देवीला मध अर्पण करून आरती करावी. असे केल्याने जीवनात येणारे अडथळे दूर होतात आणि देवीच्या आशीर्वादाने माणसाची आकर्षण शक्ती खूप वाढते.
माता कात्यायनी देवीची उपासना केल्यानं मनाची शक्ती मजबूत होते आणि व्यक्ती इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो. अविवाहितांना देवीची पूजा केल्याने चांगला जीवनसाथी मिळतो. देवीला पूजेत शुद्ध मध अर्पण करावा. यानंतर देवीचा मंत्र पूर्ण भक्तिभावाने पठण करा. तुमच्या मनात असलेली इच्छा पुन्हा सांगून देवीचा आशीर्वाद घ्या. अविवाहित लोक किंवा ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत त्यांनी कात्यायनी मातेची विधिवत पूजा करावी. यासाठी मातेच्या मंदिरात श्रृंगार आणि पूजेशी संबंधित वस्तू दान कराव्या.
तिला पिवळ्या आणि लाल रंगाच्या वस्तू प्रिय आहेत. म्हणून लाल, पिवळ्या गुलाबाची किंवा झेंडूची फुले वहावीत, त्यांची सजावट करावी.
देवी कात्यायनीला पिवळ्या रंगाची मिठाई, मध, अत्यंत प्रिय आहे, म्हणून तिला बेसन लाडू, मध, गुळ घातलेला भात किंवा खीर यांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर तिला गोड पान विडाही आवडतो त्यामुळे तो पण खाण्यास द्यावा.आणि मातेची प्रार्थना करावी त्यानंतर कात्यायनी देवीला प्रसन्न करण्यासाठी पुढील मंत्राचे पठण करावे.
“चन्द्रहासोज्ज्वल-करा शार्दूल- वर-वाहना ।
कात्यायनी शुभं दद्याद् देवी दानव-घातिनी”
यामुळे ती प्रसन्न होऊन सौंदर्य, बुद्धी, यश, कीर्ती, सुख,शांती प्रदान करते. असे केल्याने विवाहाचे योग निर्माण होतात. आजचा शुभ रंग राखाडी असल्यामुळे या रंगाची वस्त्रे परिधान करावीत त्यामुळे योग्य फलप्राप्ती होते असे मानतात.
सातवे रूप : कालरात्री देवी
दुर्गादेवीचे नवरात्रीतील सातवे रूप ‘कालरात्री देवी’ या नावाने पुजले जाते.या नवरात्राला शारदीय नवरात्री असेही म्हटले जाते. नवरात्रीच्या सातव्या दिवशी महासप्तमी येते. या दिवशी दुर्गा देवीची सातवी शक्ती देवी कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे.
कालरात्री माता दुष्टांचा नाश करण्यासाठी ओळखली जाते, म्हणून तिचे नाव ‘कालरात्री’ आहे. तसेच ही देवी आपल्या भक्तांना नेहमी शुभ फल प्रदान करते.म्हणूनच तिला शुभंकारी असेही म्हणतात. कालरात्री देवी म्हणजे दुर्गा देवीचे सातवे रूप ! ही तीन डोळ्यांची देवी आहे. कालरात्रीची मातेची उपासना भय आणि रोग नष्ट करते. यासोबतच भूतबाधा, अकाली मृत्यू, रोग, शोक इत्यादी सर्व प्रकारच्या समस्याही दूर होतात. जेंव्हा जेंव्हा पृथ्वीवर भयंकर संकट येते, तेंव्हा तेंव्हा देवांना अवतार घेऊन त्या संकटांचा नायनाट करण्यासाठी पृथ्वीवर यावेच लागते .शुंभ, निशुंभ आणि रक्तबीजचा नावाचे दैत्य भयंकर उन्मत्त होऊन पृथ्वीवर थैमान घालायला लागले होते. सामान्य प्रजा तर सोडाच पण अगदी ऋषी, मुनी, देवांनाही जेरीस आणले होते त्यांनी. म्हणून त्यांचा वध करण्यासाठी माता दुर्गेला कालरात्रीचे रूप धारण करावे लागले होते, असे सांगितले जाते. तिचे वाहन गर्दभ असून कालरात्री देवीचे शरीर रात्रीच्या अंधारासारखे गडद काळे आहे. तिच्या श्वासातून अग्नी निघतो. गळ्यात विद्युत चमक असलेली माला आहे. काळेभोर केस मोठे आणि विखुरलेले आहेत. कालरात्री देवीचे तीन डोळे ब्रह्मांडाइतके मोठे आणि गोलाकार आहेत, ज्यातून विजेसारखे किरण बाहेर पडतात. मातेला चार हात आहेत, एका हातात खडग म्हणजे तलवार, दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र, तिसरा हात अभय मुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा आहे. मातेचे हे भय उत्पन्न करणारे रूप पापांचा नाश करण्यासाठीच आहे. ती तिच्या तीन मोठ्यामोठ्या डोळ्यांद्वारे ती सर्व सृष्टीकडे पाहते. भक्तांना अभय देते तर दुष्ट शक्ती, दुष्टांचा नायनाट करते असे मानले जाते .

देवी भागवत पुराणानुसार, कालरात्रि देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही. अकाल मृत्यूचे भय राहत नाही. मनोकामना पूर्णत्वास जातात. तसेच भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पुराणातील काही उल्लेखांनुसार, कालरात्रि देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले गेले आहे. त्यामुळे तंत्र-मंत्राचे साधक कालरात्रि देवीचे विशेष पूजन करतात. ही पूजा मध्यरात्री केली जाते. कालरात्रि देवी भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात. म्हणूनच कालरात्रि देवीला शुभंकरी असेही म्हटले जाते. शारदीय नवरात्राप्रमाणे चैत्र नवरात्रातही देवीचे पूजन केले जाते. मात्र, दुर्गा देवीचे शुभाशिर्वाद आणि विशेष कृपादृष्टी लाभण्यासाठी अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रात करण्यात येणारे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रुपांचे पूजन केले जाते. देवीच्या प्रत्येक स्वरुपाचे महत्त्व, मान्यता अगदी विशेष आणि वेगळ्या आहेत.
भागवत पुराण, दुर्गा सप्तशती यांमध्ये देवीच्या या स्वरुपांविषयी माहिती देण्यात आली आहे .कालरात्री देवीची उत्पत्ती कालीमातेपासुन झाली आहे असे समजले जाते. देवी भागवत पुराणानुसार, कालरात्री देवीने युद्धात चंड मुंडाचे केस धरून धडापासून डोके वेगळे केले. देवीने चंड मुंडाचे मस्तक आणले आणि देवी कौशिकीला म्हणाली, मी चंड मुंड नावाच्या या दोन प्राण्यांची मुंडके कापून तुझ्या चरणी ठेवली आहेत. आता तूच शुंभ आणि निशुंभाला युद्धात मार देवीने प्रसन्न होऊन कालरात्रीला सांगितले की, आजपासून चंड मुंडचा वध केल्यामुळे भक्त तुला चामुंडा देवी या नावानेही हाक मारतील, म्हणून कालरात्रीला चामुंडा देवी असेही म्हणतात.
पूजेचे महत्त्व आणि फळ :
नवरात्रीतील सप्तमीची रात्र ही सिद्धींची रात्र असते. या दिवशी देवीची पूजा केल्याने रोगांचा नाश होतो आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो. अशा स्थितीत ग्रहांचे अडथळे आणि भय दूर करणाऱ्या देवीची नवरात्रीच्या सातव्या दिवशी पूजा करावी.
पूजा विधी :
शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. नंतर देवी मातेसमोर तुपाचा दिवा लावावा. देवीला लाल फुले आवडतात. म्हणून तिला लाल रंगाची फुले वहावीत. सजावट करावी, दिव्यांची, फुलान्ची आरास करावी.कालरात्रीच्या पूजेमध्ये मिठाई, पाच सुकेमेवे, पाच प्रकारची फळे, अखंड, धूप, सुगंध, फुले आणि गुळाचा नैवेद्य इत्यादी अर्पण केले जातात. या दिवशी गुळाला विशेष महत्त्व दिले जाते. कालरात्रीला गूळ किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ आवडतात म्हणून तिला त्याचाच नैवेद्य दाखवावा.
पूजा संपल्यानंतर देवीच्या मंत्रांचा उच्चार करून आरती करावी. तसेच दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशती पाठ करावा.
कालरात्री देवीला प्रसन्न करण्यासाठी पुढील मंत्र म्हणावा.
“ऊं ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै ऊं कालरात्रि दैव्ये नम :
ॐ कालरात्र्यै नम:”
असे मनोभावे पूजन ,प्रार्थना करावी. आजचा शुभ रंग नारंगी, केशरी असल्याने त्या रंगाची वस्त्रे परिधान केल्यास अधिक लाभदायक असते.
शुभंभवतु !
क्रमशः

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800