नको होऊस निराश सखये
थोडा धीर धर….
पानगळ झाली तरीही पुन्हा
येतोच ना ग बहर…!!!
इवले कोवळे बीज सखे सांग
लगेच कोठे रुजते…??
कवच धरेचे भेदल्याविन का ते धरेवरी अवतरते…??
चिमुकल्या बीजा देखील सखये
संघर्ष करावाच लागतो…
वृक्ष मोठा जाहल्याविन का
फळांनी लगडतो …??
जरी नभी दाटले काळे मेघ…
कोसळतील जलधारा…
पुन्हा होईल आभाळ निरभ्र..
बहरेल आसमंत सारा…
विहरतील पक्षी आनंदाने
स्वच्छंदे निळ्या गगनात…
उजळून जातील दाही दिशा
सुख बरसेल मनामनात…||
सावरुनि सखये नैराश्याला
कर तू मनातूनि तडीपार…
स्मित विलसू दे चेहऱ्यावरती
पुन्हा तुझ्या एकवार…
आशेच्या कुंचल्याने सखये रंगव
नव्या उद्याचे नवचित्र…
लेऊन सुखाचे वस्त्र भरजरी…
उगवेल नवी पहाट… ||
– रचना : सायली कुलकर्णी. वडोदरा, गुजरात.
चांगली कविता सायली🌷 प्रतिभा सराफ