Tuesday, September 17, 2024
Homeबातम्यानवी मुंबई : सायबर फसवणुक कशी टाळाल ?

नवी मुंबई : सायबर फसवणुक कशी टाळाल ?

२१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत गेल्या वर्षात पारंपरिक पद्धतिच्या चोरीच्या गुन्ह्यात १० कोटी पर्यंत रक्कम चोरीला गेली आहे. ऑनलाईन बँक फ्रॉड मध्ये ३०० ते ५०० कोटीं रुपयांपर्यंत फसवणूक झालेली आहे. नवी मुंबईत दर दिवशी एक कोटींची फसवणूक होत होती. तर आता या रकमेत कैक पटीने वाढ झाली आहे अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेच पोलीस अधिकारी डॉ विशाल माने यांनी दिली.
ते साहित्य, संस्कृती मंडळ आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जागरूक नवी मुंबईकर अभियानात मार्गदर्शन करताना बोलत होते.

सायबर गुन्ह्यात भारत जगात पहिल्या नंबर वर आहेत. आपण डिजिटल तंत्रज्ञान व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे.अन्यथा सायबर फसवणुकीत उच्चभ्रू नागरिक कसे फसतात, हे सांगताना डॉ माने म्हणाले की, आपण एका क्षेत्रात तज्ज्ञ आहोत म्हणजे आपल्याला सर्व क्षेत्रातील सर्व काही कळते, असे अनेक जणांना वाटते.यामुळे अशी तज्ज्ञ मंडळी इतर क्षेत्रातील आणि विशेषत: आजच्या नव्या डिजिटल युगातील नव्या गोष्टी शिकू इच्छित नाही. या त्यांच्या अज्ञानामुळेच ते लाखो, करोडो रुपयांनी मोबाईल द्वारे सहज फसवले जातात. गरज नसताना, केवळ ऐपत आहे म्हणून लोकं भारी भारी मोबाईल विकत तर घेतात पण त्यातील सर्व फीचर्स जसे की प्रायवसी फीचर्स, सिक्युरिटी फीचर्स समजून घेण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळे असे लोक सायबर चोरांच्या फसवणुकीला सहज बळी पडतात.

डॉ विशाल माने

सायबर फसवणुकीपासून सावध राहावे यासाठी नागरिकांनी पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात असे आवाहन डॉ माने यांनी केले.

१. अनोळखी कॉल घेऊ नयेत.
२. सोशल मीडिया वर डोळे झाकून विश्वास ठेवू नये.
३. वेळ प्रसंगी प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची तयारी ठेवावी. विशेषत: पैसे न भरल्यास आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असे मेसेज आल्यास.
४. कोणतेही प्रलोभन, भीती याला बळी पडू नये.
५. आपल्या बँकेचे डिटेल्स कुणाला सांगू नये.
६. अनोळखी ॲप डाऊन लोड करू नये.
७. तंत्रज्ञान स्नेही बनले पाहिजे. त्यामुळे फसवणूक टळू शकते.
८. छोट्या रकमांचे व्यवहार मोबाईल बँकिंग वरून करण्यास हरकत नाही पण मोठ्या रकमेचे व्यवहार बँकेतच जाऊन करावेत.
९. मोबाईल बँकिंग करताना काय खबरदारी घ्यावी हे आपल्या बँकेकडून आग्रहपूर्वक समजून घ्यावे.
१०. हनी ट्रॅप ला बळी पडू नये. पडल्यास पोलिसांची मदत घेण्यात संकोच मानू नये. अन्यथा अशा काही प्रकरणांतील व्यक्तींनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून आले आहे.

११. अनोळखी व्यक्तींनी केलेल्या मैत्रीची विनंती स्वीकारू नये.
१२. मुलांना भारी मोबाईल घेऊन देण्यापेक्षा फक्त कॉलिंग करता येईल, असाच मोबाईल घेऊन द्यावा.
१३. मुलांना फक्त उच्च शिक्षित करायचे नाही तर सू संस्कृत करण्याची जास्त गरज आहे.
१४. आपले लोकेशन घरच्यांना सांगावे.
१५. आई वडिलांनी मुलामुलींना सावध केले पाहिजे.त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यांना गुड टच, बॅड टच हे शिकविले पाहिजे. असा स्पर्श कुणी केला तर त्यांना ओरडायला शिकविले पाहिजे. अशी कृती कुणी केल्यास मुलांनी घरच्यांना त्वरित सांगितले पाहिजे.
१६. एखाद्या पोलिस ठाण्यात तुमची तक्रार नोंदवून घेतली नाही तर त्यांच्या वरील अधिकारी, कोर्ट यांची सुध्दा आपल्याला माहिती हवी. तुम्हाला कायद्याची माहिती आहे, हे त्या पोलीस अधिकाऱ्यास कळाले की तो तुमच्या तक्रारीची निश्चितच दखल घेईल.
१७. मुली, महिलांनी पर्स मध्ये स्प्रे ठेवला पाहिजे.
१८. गुन्ह्यात सुध्दा सुवर्ण तास महत्वाचा आहे.
१९. आपल्या भागातील पोलीस स्टेशन, कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्याशी ओळख करून घ्यावी. त्यांचे मोबाईल क्रमांक आपल्याकडे असले पाहिजेत.
२०. अमली पदार्थ: पूर्वी तिशीत असलेले तरुण अमली पदार्थांच्या आहारी जायचे. आता बालके सुध्दा आहारी जात आहेत. दुर्दैवाने मुली सुध्दा यात मागे नाहीत.

२१. अमली पदार्थ कसे वाईट आहेत, हे मुलामुलींच्या मनावर बिंबवले पाहिजे.
२२. जिथे अशा पार्ट्या असतात तिथे मुलामुलींनी जाणे चूक आहे.
२३. मुला मुलींनी चुकीचा सहवास पूर्णपणे टाळावा. अन्यथा शाळा, कॉलेजच्या प्राध्यापकांचे मुलं मुली सुध्दा अमली पदार्थांना बळी पडल्याचे दिसून आले आहे.
२४. अमली पदार्थांच्या बाबतीत कायद्यात १ ते २० वर्षांची सजा आहे. त्यामुळे यात तरुण फसल्यास त्यांचे सर्व आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.
२५. अमली पदार्थांच्या बाबतीत कायदे कठोर आहेत. पोलीसही कारवाई करीत असतात पण ते पुरेसे नाही.त्यासाठी नागरिकांनी दक्ष राहिले पाहिजे.
२६. आपत्कालीन परिस्थितीत पूर्वीचा १०० नंबर बदलला असून तो आता ११२ झाला आहे याची नोंद घ्यावी.
२७. नवी मुंबई पोलिसांचा हेल्प लाईन क्रमांक 8828112112 असा आहे. तो लक्षात राहू द्यावा.
२८. मोबाईल हरवल्यास, संचार ॲप निर्माण करण्यात आले आहे, त्याची मदत घेण्यात यावी.

केवळ मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर न करता राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा कसा उपयोग करू शकतो त्याचा विचार करून आपण तसा वापर केला पाहिजे, असे आवाहन ही डॉ विशाल माने यांनी शेवटी केलें.

डॉ विशाल माने यांनी अतिशय तळमळीने केलेल्या मार्गदर्शनामुळे उपस्थित सर्व जण भारावून गेले.

प्रारंभी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत करून विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले. तर सचिव सौ अमरजा चव्हाण यांनी डॉ विशाल माने यांचा परिचय करून दिला.

शेवटी न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी मोजक्याच शब्दात डॉ विशाल माने यांचे आभार मानून त्यांना स्वलिखीत “आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक भेट दिले.

या कार्यक्रमास साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खूप छान माहितीपूर्ण लेख आहे. एका अतिशय उत्तम कार्यक्रमाचा अतिशय सुंदर आढावा घेऊन आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments