नदी, नाले, पर्वत, अंबर सुंदर सजली सृष्टी
सुंदरता पाहून तयांची सहजीच खीळली दृष्टी ||धृ||
शुभ्र प्रपात शिकवून जाती अविरत कार्य करावे
नदी नाल्यांसम जीवनी या एकरूप रहावे
क्षण आनंदाचे वेच मानवा नकोस होऊ कष्टी
सुंदरता पाहून तयांची सहजीच खीळली दृष्टी ||धृ||
विशाल ह्रदयबांधणी या अंबरासम व्हावी
प्रेम, माया, क्षमेची त्यातून पखरण द्यावी
रानोमळी भटकून खावी कैऱ्या, बोरे काष्टी
सुंदरता पाहून तयांची सहजीच खीळली दृष्टी ||धृ||
व्यस्त क्षणातील वेळ थोडा निसर्गाची भटकंती
पुस्तक आणि निसर्ग हेच मित्र आयुष्याच्या अंती
पंचतत्वांनी सुकर केली जीवनी आनंदाची वृष्टी
सुंदरता पाहून तयांची सहजीच खीळली दृष्टी ||धृ||
– रचना : प्रीति भिसे, बेंगलोर, कर्नाटक