Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यनिसर्ग कवी

निसर्ग कवी

निसर्ग कवी ना.धो.महानोर यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन …

रानातला कवी
रानात विलीन झाला

प्रत्येकाच्या मनावर
हिरवं रान गोंदून गेला

निघून गेला अनंतात
तरी राहील कायमचा ह्रुदयात

त्याच्या प्रिय पावसाचे थेंब
उतरून आले आज डोळ्यात

रिकाम्या हाताने नाही गेला
समाजभान निसर्गभान देऊन गेला

रानातल्या कवितांचा बहर
कधीच नाही ओसरला

अस्सल मातीतली अस्सल कविता
रानभर पेरून गेला

कोटी कोटी मराठी मनात
हिरवी अक्षरे कोरून गेला

महानोरांची कविता
हिरवं रान झाली

त्या कवितेतलं अमृत पिऊन
रसिक मने तृप्त झाली

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
हिरव्या बोलीचा शब्द व्हावे

नाधोंची कविता वाचता वाचता
रानाचाच एक भाग व्हावे

या निसर्ग कवीच्या जाण्याने
मातीचे चैतन्यगान निमाले

जांभुळ पिकल्या सारख्या
असंख्य गाण्यांनी मनात घर केले

नभ उतरू आलं
चिंब थरथर ओलं

मी रात टाकली मी कात टाकली
प्रत्येक गाणं आठवून मन भरून आलं

हिरव्या बोलीचे शब्द
आज मुके झाले

पळसखेडचे रान
अश्रूंनी चिंब भिजले

निसर्गाचे चेतनातत्व आज म्लान झाले
अवघ्या रानाने अश्रू ढाळले
माथ्यावरच्या अन् भवतालच्या
खुल्या निसर्गाला पोरकेपण आले

भुईशी जडलेले
महानोरांचे आतड्याचे नाते

अश्रूंच्या सरी झेलत
गीत आज दुःखाचे गाते

रानावर जीवापाड प्रेम करत
शब्दांचे मोती ओवले

ओंजळीत पडलेल्या संवेदनशीलतेचे
सोने या निसर्ग कवीने केले

महानोरांच्या प्रत्येक कवितेला
निसर्ग उत्कटपणे बिलगून आला

बघता बघता तरलतेने
निळ्या सावळ्या मेघांची धून झाला

शब्द आणि निसर्गाचे बेमालूम
साकारले त्यांनी अद्वैत

आचंद्रसूर्य गात राहील वसुंधरा
महानोरांचे निसर्ग गीत

महानोर आणि निसर्ग
काढताच येणार नाही वेगळा

अहोरात्र गात होता
रानातल्या कविता त्यांचा गोड गळा

शब्दवेल्हाळ बोलीतून झिरपायची
तालमय नादमय गेयता

नाधोंच्या हिरव्या बोलीने
धन्य झाली महाराष्ट्राची भूमाता

सदैव जपत राहू
या निसर्ग कवीचे निसर्ग भान

स्त्रीच्या मनातील खोल वेदना
अचूक पकडते त्यांचे समाजभान

अक्षय आनंदाचा ठेवा आहेत
महानोरांची सर्व गाणी

त्यांचे समाजभान निसर्गभान
रुजत राहो प्रत्येकाच्या मनी

ढग गरजत राहतील
पर्जन्यधारा बरसत राहतील

पण त्यावर कविता करायला
आता महानोर नसतील

अश्रूभरल्या नयनांनी अर्पितो
श्रद्धांजलीची पुष्पमाला

नामदेव धोंडो महानोर या
काळ्या आईच्या लेकराला

राजेंद्र वाणी

— रचना : राजेंद्र वाणी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. ना.धों.महानोर या निसर्गकवीला सादर अभिवादन .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा