कधीही न विसरता येणारा, महाराष्ट्रातील हाहाकार !!!!!
२२ जुलै २०२१, दुपारी चार वाजता, निसर्गाच्या कोपाने सारे कोकण जलमय झाले. महाप्रलय पुराने गावच्या- गावे, दरडी खाली खचले गेले, नि मृतांचा आक्रोश कानी पडला.
निसर्गाच्या कुशीत भोळ्याभाबड्या कोकणवासियांनी आपले संसार थाटले होते. निसर्गावर निस्सीम प्रेम करणारा शेतकरी, आज आक्रोश करताना दिसत आहे. कोकणवासीयाने डोंगर कपाऱ्यात आपली उपजीविकेची रचना उभारली होती, त्या निसर्गाने क्षणात कोकणवासीयांना गिळकृत करून टाकले आहे. जीवाला पिळवटून टाकणारी दृष्ये नजरेसमोर येताच, अश्रूंचा पूर डोळ्यात उभा राहिला.
महाड मधील तळये वाडीतील अवस्था मनाला सुन्न करून गेली. पूर्ण तळयेवाडी या निसर्गाच्या कोपात क्षणात जमिनीखाली गाडली गेली. दरडी मलबा एवढा होता की मदत कार्य करणाऱ्या टीम सुद्धा हतबल झाल्या होत्या. पावसाच्या पाण्याची पातळी कमी होताच, रत्नागिरीतील हेल्पिंग हँड जिद्दी माउंटेनईयर्स, देवरूख मधील राजू काकडे अकॅडमी, मालवण मधील दोनशे फूट समुद्राच्या पाण्याला भिडण्याची सवय असलेली तरुणांची फौज, वेलदुर मधला अंबाजी व त्याच्या कोळी तरुणांची टीम, खेड- गुहागर- चिपळूण मधील जीवाची बाजी लावणारे डिझास्टर मॅनेजमेंट मधील एक्सपर्ट तरुण या सर्वांनी घटनास्थळी मदतीस धाव घेतली.
तेथे साचलेला मलबा पाहूनच लक्षात येते होते की, ती दरड कोसळताच तळयेतील प्रत्येक ग्रामस्थ कसा दबला असेल ! मृतदेह मलब्यातून बाहेर काढले गेले, कळताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू व आक्रोश खूप काही सांगून जात होता. एका महिलेने तर, तिची मुलगी, जावई व एक वर्षाची नात गमावली होती. निपचीत पडलेले बाळ पाहून, त्या बापाने पुत्र विरहाने टाहो फोडला.
एका महिलेच्या सांगण्यातून कळले की, या गावात बऱ्याच स्त्रिया नवजात शिशुंना जन्म दिलेल्या होत्या. बोलत असलेली महिला पुढे म्हणाली, तिने स्वतःच्या आईवडिलांना आपल्या गावी घेऊन गेली होती. पण ती म्हणते, माझ्या स्वतःच्या परिवारातील कोणी नव्हते, पण माझ्या गावातील माणसे माझी होती. त्या सर्वांना मी गमावले आहे. असे म्हणत ती ओक्साबोक्शी रडली.
कोकणातील हृदयद्रावक घटना कोल्हापूर, सांगली पाटण तालुक्यातील आंबेघर, पुण्यातील माळव पूल, साताऱ्यातील मिरगाव याही ठिकाणी नाहक बळी गेले. बचाव कार्यासाठी NDRF च्या टीमने तत्काळ धाव घेतली.
निसर्गाच्या आपत्तीत शेतीचे अफाट नुकसान झाले आहे. मुक्या जनावरांना आपले जीव गमवावे लागले आहेत. पुराच्या ओघात अनेक गाड्या व एस.टी.(कोकण लालपऱ्या) वाहून गेल्या. बाजारपेठांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या मौल्यवान वस्तू मलब्यात गहाळ झाल्या आहेत. सर्वात मोठे नुकसान म्हणजे, संपूर्ण कुटुंबे गमावली आहेत.
निसर्गाच्या सौंदर्यावर प्रयोग करतो कोण ? पण त्याची शिक्षा निष्पाप कोकणवासियांना का ! कोकणवासीयांचा आक्रोश आज जगातल्या कानाकोपर्यात पोहोचला असेल. उद्वस्त झालेले त्यांचे संसार पुन्हा उभे राहतील, पण कुणाच्या तरी कर्माने बळी गेलेले ग्रामस्थ तेव्हा नसतील. कोकणवासी कुणासमोर हात पसरणारा नाही “मोडेन, पण वाकणार नाही !” या आत्म तळमळीचा कोकणवासी आहे. आज कोकणाला मदतीचा हात देण्याची वेळ आली आहे.
कोकणचे हरवलेले निसर्गसौंदर्य व त्यात वसलेला साधाभोळा कोकणवासी हताश झाला आहे. कोकणवासीयांचा देह संपला असेल पण त्यांचा आत्मा जिवंत आहे. मलब्या खाली दबलेले गाव पुन्हा दिसतील, निसर्गाचे हरवलेले सौंदर्य पुनश्च बहरेल, पण आज तुम्हा- आम्हा सर्वांच्या मदतीची गरज आहे.
निसर्ग आपत्ती केव्हाही येऊ शकते त्यासाठी जनजागृती व शासकीय जागृती ठेवून येणाऱ्या आपत्ती वर उपाय योजना आखून कृतीत आणणे, आजच्या घडीला खूप गरजेचे आहे.
दुर्दैवी ! निसर्ग आपत्तीत नाहक बळी गेले, त्या माझ्या कोकणवासिय बंधू-भगिनींस भावपूर्ण श्रद्धांजली !🙏

– लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ, 9869484800
कोकणात झालेली अतिवृष्टी आणि आलेला महापूर यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले. अपार वित्त हानी तसेच जीवितहानी झाली. कोकणाचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. चीड येणारी गोष्ट म्हणजे मदतकार्य करताना राजकारणी लोकांची लुडबुड, राजकारणी नेत्यांचे पाहणी दौरे व त्यातील राजकारण.
निसर्गाच्या पुढे कोणाचे काही चालत नाही. अतिवृष्टीमुळे मृत पावलेल्या सर्व अबाल वृध्द नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏