न्युज स्टोरी टुडे ने मला माझ्यातील ‘ मी ‘ ची नव्याने ओळख करून दिली. कौटुंबिक जबाबदारी आणि क्लास म्हणजे ‘ बे एके बे ‘ हेच माझे विश्व. त्यात नावीन्य म्हणजे भिशी, मैत्रिणींच्या सोबत एखादी ट्रिप नवरात्रीतील काही कार्यक्रम, या पलीकडे फारसे काही नव्हतं आणि अचानक न्यूज स्टोरी या कुटुंबात प्रवेश झाला. खूप आपुलकी व आपलेपणा मिळाला… अदृश्य कला गुणांना वाव मिळाला. अनेक अनपेक्षित गोष्टी व अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घेता आला.
मी तशी थोडी फार लिहीत होते, म्हणजे महिन्याला जेमतेम एखादा लेख. पण भुजबळ सरांना सारखे गुरू लाभले व त्यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे माझे एका लेखिकेत कधी व कसे परिवर्तन झाले हे माझे मला देखील कळले नाही.
कोरोनाच्या बिकट काळात जेव्हा सर्व जग थांबले होते तेव्हा माझ्या आयुष्याला नव्यावे सुरवात झाली आणि मी दोन वर्षात २०० लेख लिहिले गेले. माझ्या प्रत्येक लेखाचे भुजबळ सरांनी संपादन केले. न्युज स्टोरी टुडे या पोर्टल मुळे आम्हाला हक्काचे व्यासपीठ मिळाले. थांबलेल्या माझ्या आयुष्याला वेग मिळाला. माझे सर्व लेख तसेच काही कविता प्रथम न्युज स्टोरी टुडे या पोर्टल वर प्रकाशित झाले व पुढे अनेक वृत्तपत्रात तसेच मासिकात, दिवाळी अंकात देखील प्रकाशित झाल्या. यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला. मी देखील लिहू शकते याची जाणीव झाली.
माझ्या लेखनावर मिळालेल्या लोकांच्या प्रतिक्रियांमुळे एक सकारात्मक ऊर्जा मिळाली. एक आठवण नक्कीच सांगू इच्छिते .”जीवन सुंदर आहे” हा लेख वाचून जेव्हा लोकांनी आवर्जून फोन करून सांगितले की, “तुमचा लेख वाचल्यावर आमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला व विचारात परिवर्तन झाले, आम्ही आता आत्महत्येचा विचार करणार नाही व परमेश्वराच्या मनुष्य निर्मितीचा आदर करून पुन्हा आमच्या जीवनाची लढाई लढणार नक्कीच जिंकणार” तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले व लेखणीत किती ताकद असती त्याची प्रचिती मिळाली.
एका लेखकाला याहून दुसरा मोठा आनंद काय असू शकतो ? जेव्हा त्याच्या कलेचा आदर होतो. हा आनंद व समाधान मी शब्दात देखील सांगू शकत नाही हे शक्य झाले केवळ न्युज स्टोरी टुडे मुळे. माझे आयुष्य खऱ्या अर्थाने सुखी झाले. स्वप्नात देखील विचार केला नव्हता त्या गोष्टी सत्यात उतरू लागल्या. हे सर्व नवीन होत असताना भक्कम साथ होती भुजबळ सरांची व अलका ताईंची.
न्युज स्टोरी टुडे या पोर्टल ने थोड्याच अवधीत यशाचे शिखर गाठले व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले ही एक अभिमानास्पद कामगिरी आहे, ज्याचे आम्ही कुटुंबीय साक्षीदार आहोत. जे बी रोवले होते देवश्रीने त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. नव्याने पालवी फुटली व आज ते बहरून आले आहे.
न्युज स्टोरी टुडे मुळे माझ्या लेखणीचे रूपांतर पुस्तकात झाले आणि याच पोर्टल ने प्रकाशित केले याहून मोठी गोष्ट दुसरी नाही माझ्यासाठी.हे आत्मिक समाधान व आनंद माझ्या मनावर सोनेरी अक्षराने कोरले गेले आहे.
सर्वगुणसंपन्न संपादक देवेंद्र भुजबळ सर व उत्साही प्रकाशिका अलकाताई हे समीकरण, ही जोडी म्हणजे जादू आहे आणि ही जादूची कांडी फिरली की अशक्य ही शक्य करण्याचे सामर्थ्य असते.
न्युज स्टोरी टुडे ची साथ होती म्हणून माझी एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकली. त्यामुळे या कुटुंबाची मी आयुष्यभर ऋणी आहे. बोलता बोलता ही चार वर्षे कशी गेली, हे कळालेच नाही. पोर्टलला अनेक पुरस्कार मिळाले. अशीच प्रसिद्धी व प्रेम पुढे ही न्युज स्टोरी टुडे ला लाभो हीच सदिच्छा.
— लेखन : रश्मी हेडे. सातारा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800