महुआ लाहिरीला २५ जानेवारी २०२३ च्या दुपारी जेव्हां केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयामधून तिची आई प्रीतिकना गोस्वामी यांना पद्मश्री पारितोषिक जाहीर झाल्याचे फोनवरून कळविण्यात आले तेव्हां महुआला कोणीतरी गंमत करतंय असं वाटलं. त्यांनी तिची खात्री पटविल्यावर तिने अत्यानंदाने जेव्हां तिच्या आईला सांगितले त्यावेळी तिचाही आपल्या कानांवर विश्वास बसेना. गेली पन्नास वर्षे परिस्थितीशी झुंज देणाऱ्या प्रीतिकना गोस्वामी यांना आपल्या कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटले यात नवल ते काय ?
पश्चिम बंगाल येथील सोनारपूरमधील वॉर्ड ९ मधील रहिवासी प्रीतिकना अवघ्या १० वर्षांची असतांना तिच्या वडिलांचे निधन झाले. आई आणि पांच बहिणी यांची जबाबदारी पेलण्यासाठी तिने शिवणकाम सुरु केले. तिची मैत्रिण रमा, पितांबरी कंपनीचे शिवणकाम करीत असे. तिच्या सारखेच प्रीतिकना त्या कंपनीच्या शिवणकामाच्या ऑर्डर्स घेऊ लागली आणि घर सांभाळता सांभाळता तिने आपले शिक्षणही सुरू ठेवले. ती खूप हुशार होती आणि तिने कांथा आणि रफूच्या शिलाईपासून ते सलमा जरी, आरी-चुमकीचे काम आणि भरतकामापर्यंत सर्व शिवणकामाचे तंत्र आत्मसात केले. प्रीतिकनाचे १९७७ मध्ये लग्न झाले. लग्नानंतरही तिने आपले शिक्षण सुरू ठेवले, सिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तथापि, गर्भवती राहिल्यानंतर ती तिचे शिक्षण सुरू ठेवू शकली नाही. पण, शिवणकाम थांबले नाही.
शरणार्थी वस्तीत कुटुंबातील सतरा सदस्य स्वयंपाकघर आणि एक बाथरूम असलेल्या तीन खोल्यांच्या घरात रहात होते. १९८० मध्ये जेव्हा तिच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा प्रीतिकना बाळासाठी दूध घेऊ शकत नव्हती तर तिला तांदळाच्या रव्याची पेज देत असे. काही वर्षांनी, तिची दुसरी मुलगी जन्माला आली. तिच्या कुटुंबाचे आणि मुलांचे पोट भरण्यासाठी धडपडत असतांना, त्यानंतरही अडचणी संपल्या नाहीत. कायम हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत असतांना एक वेळ अशी आली की, तिची मुलगी तेरा वर्षाची झाली तेव्हां तिचे लग्न करून द्यावे ज्यामुळे घरातील एक खायचे तोंड कमी होईल, असा विचार तिच्या मनीं आला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सातत्याने काम करून ज्या नक्षी कंठा किंवा कांथामधील त्यांच्या अद्भूत कामासाठी त्यांना ओळख मिळाली आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या कंठा /कांथा प्रकाराबद्दल थोडे समजावून घेऊ या. कांथा या शब्दाची कोणतीही विशिष्ट व्युत्पत्ती नसली तरी, तो संस्कृत शब्द कोंथा पासून आला आहे असे मानले जाते, ज्याचा अर्थ चिंध्या आहे. भारतातून उगम पावलेल्या भरतकामाच्या सर्वात जुन्या प्रकारांपैकी एक, त्याची उत्पत्ती पूर्व-वैदिक काळापासून (इ.स.पू. १५०० पूर्वी) आढळते, जरी सर्वात जुनी लेखी नोंद ५०० वर्षांपूर्वीची आढळते. पाणिनीच्या “अष्टाध्यायी” या पुस्तकात त्याचा उल्लेख उबदार कपडे म्हणून करण्यात आला होता, अगदी कवी कृष्णदास कविराज यांनी त्यांच्या श्री श्री चैतन्य चरितामृत या ग्रंथात घरगुती कांठाचा उल्लेख केला आहे. त्यांनी त्यात लिहिले आहे की चैतन्यच्या आईने काही प्रवासी यात्रेकरूंद्वारे पुरीमधील तिच्या मुलाला घरगुती कांठा कसा पाठवला ते. हाच कांठा आज पुरीमधील गंभीर येथे प्रदर्शनात आहे. कांथा ही चिंध्यापासून पॅचवर्क कापड शिवण्याची शतकानुशतके जुनी परंपरा आहे, जिची उत्पत्ती सर्वात सामान्य लोकांपासून झाली आणि उपखंडातील बंगाली प्रदेशातील ग्रामीण महिलांच्या काटकसरीने विकसित झाली. बंगालच्या ग्रामीण खेड्यांमध्ये जन्मलेली ही कला १९ व्या शतकाच्या सुरुवातीला जवळजवळ नाहीशी झाली. प्रसिद्ध बंगाली कवी जसीमुद्दीन मोल्ला यांनी त्यांच्या १९२८ च्या पुस्तक “नक्षी कंठार नाथ”(Nakshi Kanthar Natth,) मध्ये “नक्षी कंठा” चा उल्लेख केला आहे. अशा प्रकारे याबद्दल प्रथमच सांगितले गेले. नक्षी हा भरतकाम किंवा डिझाइनसाठी एक व्यापक शब्द आहेआणि नंतर १९४० च्या दशकात प्रसिद्ध बंगाली कवी आणि नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या सुनेने या कलेचे पुनरुज्जीवन केले. १९४७ मध्ये भारताची फाळणी आणि त्यानंतर भारत आणि तत्कालीन पूर्व पाकिस्तान (आता बांगलादेश) यांच्यातील संघर्षादरम्यान कांथाचे पुनरुज्जीवन पुन्हा विस्कळीत झाले. अखेर, बांगलादेश मुक्तियुद्ध (१९७१) पासून, कांथाने एक अत्यंत मौल्यवान आणि मोठ्या प्रमाणात मागणी असलेला कला प्रकार म्हणून स्वतःचा पुनर्जन्म अनुभवला.
“कांथा” म्हणजे धावत्या टाकेची शैली तसेच तयार कापड दोन्ही. ही एक कला होती जी सर्व ग्रामीण वर्गातील महिलांनी आत्मसात केली होती. श्रीमंत जमीनदाराची पत्नी तिच्या फावल्या वेळेत स्वतःची विस्तृत भरतकाम केलेली रजई बनवित असे आणि श्रमजीवी शेतकऱ्याची पत्नी स्वतःची काटकसरीची कवच बनवित असे. दोघींच्या कलाकृतीत सौंदर्य आणि कौशल्य समान असे. ही परंपरागत कला आईकडून मुलीकडे हस्तांतरित होत असे.
कांथा शिवणे ही वापरलेल्या साड्या, धोतर आणि इतर वापरलेल्या घरगुती कापडांच्या पुनर्वापराची किमान ५०० वर्षे जुनी पद्धत मानली जाते जिथे जुने कपडे एकमेकांमध्ये रचले जातात आणि पातळ गादीचा थर बनवण्यासाठी हाताने शिवले जातात. गादीच्या कापडाला कलात्मक स्पर्श देण्यासाठी त्यांच्यावर अनेकदा प्राणी आणि फुलांच्या आकृतिबंधांनी किंवा ग्रामीण जीवनातील दृश्यांसह भरतकाम केले जाते. बंगाल, ओरिसा, आसाम आणि बांगला देशमध्ये लोकप्रिय, जपानी शशिको शैलीसारखी पारंपारिक शिलाई तंत्र बहु-रंगीत जॅकेट, रजाई इत्यादी तयार करण्यासाठी वापरली जाते. गेल्या काही वर्षांत फॅशन स्टेटमेंट म्हणून कांथा शैलीतील भरतकाम केलेल्या महिलांच्या साड्या आणि पुरुषांचे कपडे तयार करण्यासाठी या शैलीच्या प्रतिकृती बनविल्या जात आहेत.

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, १९८९ मध्ये एका बैठकीने प्रीतिकना गोस्वामी यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. डिसेंबर १९८९ मध्ये, भारती गुप्ता, जोधपूर पार्क इमारतीत राहणाऱ्या भारती गुप्ता यांनी प्रीतिकनाची ओळख रुबी पालचौधरींशी करून दिली. त्या शिल्पकार, पुनरुज्जीवनवादी आणि पश्चिम बंगालच्या हस्तकला परिषदेच्या सचिव होत्या. पालचौधरींनी त्यांना विचारले की, कलकत्ता (आत्ताचे कोलकाता) येथे येणाऱ्या नवीन कांथा शिलाई केंद्रात काम करण्यासाठी ती महिलांचा एक गट तयार करू शकते का ? पालचौधरी यांची अपेक्षा बांगलादेशात केल्या जाणाऱ्या “नक्षी कंठा” हे गुंतागुंतीचे कांथा काम या महिलांकडून करून घेण्याबाबत होती. प्रीतिकनाने यापूर्वी कधीही असे काम केले नव्हते, तरी त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. नक्षी कंठा स्वस्तिक, कमळ, चाक, सूर्य, चंद्र आणि जीवनाचे झाड यासह विविध संकल्पनेत उपलब्ध आहे. त्याच्या दहा वेगवेगळ्या डिझाइनमध्ये लॅप कंठा, सोजनी कंठा, अशोन कंठा, शवी कंठा, नक्षी थोले, दस्तरखान, गिलाल, अर्शिलोटा, बोर्टन ढाकणा आणि रुमाल कंठा आहेत.
तथापि, अशा प्रकारची २०० वर्षे जुनी भरतकामं फक्त संग्रहालयांमध्येच होती कारण त्यावेळी कोणतेही व्यावसायिक नव्हते. पालचौधरींनी प्रीतिकनाला नक्षी कंठाचा एक छोटासा नमुना दाखवला आणि त्यांना त्याची प्रतिकृती बनवण्यास सांगितले. त्या म्हणाल्या की जर प्रीतिकना नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले हे भरतकाम करू शकल्या तर ही कला पुनर्जीवित होऊ शकते.
प्रीतिकनाने दिलेला नमुना घरी आणला आणि त्याचा अभ्यास करून,त्यांनी तीन महिन्यांत तशीच कलाकृती बनविली. त्यानंतर त्यांनी पालचौधरींनी शिफारस केलेल्या महिलांचा एक गट तयार केला आणि त्यांना नक्षी कंठामध्ये प्रशिक्षण दिले.
याबद्दल सांगतांना त्या म्हणतात, सर्व पारंपारिक कापडांप्रमाणे, कंठा हा साहित्याची उपलब्धता, दैनंदिन गरजा, हवामान, भूगोल आणि आर्थिक घटक यासारख्या बाह्य घटकांनी प्रभावित होता. ऐतिहासिकदृष्ट्या, कापड उत्पादन हे सर्वात श्रम-केंद्रित उद्योगांपैकी एक होते आणि म्हणूनच, कापडांना खूप महत्त्व होते. अशाप्रकारे, चांगल्या प्रकारे वापरल्या जाणाऱ्या कापडापासून बनवलेल्या चिंध्याचे पुनर्वापर करणे हे जगभरातील कापडांच्या जीवनचक्रात एक नैसर्गिक पाऊल होते. हे पुनर्वापराचे काम घरोघरी केले जात असल्याने, जुन्या कापडांना नवीन जीवन देण्यासाठी, कापड तयार करणे, कापणे आणि शिवणे हे सहसा पारंपारिकपणे बंगाल आणि बांगलादेशातील महिलांवर अवलंबून असे. सुमारे पाच ते सात कापड एकत्र थरात घातले जात असत, बाहेरून हलक्या रंगाचे कापड असे जेणेकरून टाके आणि नमुना स्पष्टपणे दिसून येत असे. टाके संपूर्ण कापड झाकून टाकत असत जेणेकरून ताकद मिळेल.
ग्रामीण गावातील जवळजवळ प्रत्येक घरातील महिला कांथा/कांठा /कंठा तज्ञ असायच्या आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेला शांत वेळ – घर आणि मुलांची काळजी घेणे, गुरेढोरे सांभाळणे आणि पावसाळ्याच्या लांब दिवसांमध्ये – तुकडे शिवण्यात घालवतात. एक कांथा पूर्ण करण्यासाठी महिने किंवा वर्षे देखील लागू शकतात. शिवणे पिढ्यान्पिढ्या चालत असे, आजी, आई आणि मुलगी एकाच कांथावर काम करत असते.

बेडस्प्रेड, रजाई आणि पिशव्या बनवण्यासाठी टाकून दिलेल्या साड्या, धोतर, लुंगी किंवा तत्सम कपड्यांचा वापर करून कांठाचे आकृतिबंध दैनंदिन जीवनातून काढलेले आहेत आणि त्यात लोककथा, महाकाव्ये, पौराणिक व्यक्तिरेखा, प्राणी, मासे, वनस्पती आणि समारंभाच्या थीमचे प्रतिनिधित्व समाविष्ट आहे.
पर्णक्षी आणि गाल्पोनाक्षी, हे दोन सुप्रसिद्ध कांथा प्रकार पूर्वी तयार केले जात होते. पर्णक्षीमध्ये कपडे तयार करण्यासाठी सुमारे आठ ते नऊ थरांच्या कापडाचा वापर केला जात होता, त्यामुळे विणकाम फारसे बारीक नसते आणि त्यात मजबूत बॉर्डर स्टिचिंग असते. गाल्पोनाक्षीमध्ये फक्त तीन थरांच्या कापडाचा वापर केला जातो; म्हणून, गुंतागुंतीची शिलाई दृश्यमान असते आणि एक लहरी प्रभाव देते. आधुनिक कांथासाठी अजूनही कापडाची टिकाऊपणा वाढवणारी पारंपारिक क्विल्टिंग प्रक्रिया वापरतात.
शारजाह येथील प्रीतिकना यांची मुलगी, फॅशन डिझायनर महुआ सांगतात की, “कांठाच्या उपयुक्ततेनुसार, कांठाचे नांव सतत बदलत राहिले. हिवाळ्यात वापरण्यासाठी ते ‘लेप कांठा’ आणि बेडस्प्रेड किंवा फ्लोअर स्प्रेड म्हणून “सुजनी कांठा” म्हणून ओळखले जाते. दुर्जनी कांठा ही चार कोपरे एकत्र करून बॅग किंवा थैली तयार करण्याचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द. बंगालमध्ये रात्री आरशावर झाकण ठेवण्याच्या कंठाला अर्शिलोत कंठा असे म्हटले जात असे. “आजही शिवण तीच आहे, जी आकर्षक आहे,”
प्रीतिकना सांगतात की, त्यांनी सहकार्याने काम केले आणि मार्केटिंगचे ज्ञान नसल्यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकल्या नाहीत. पण नंतर कौटुंबिक भरतकामाची परंपरा सुरू ठेवण्यासाठी महुआ लाहिरी यांनी नोकरी सोडली आणि दोन मैत्रिणींसह ब्रँड, हसनुहाना सुरू केला. महुआ कांथा भरतकामाने घरगुती कपडे बनवितात शिवाय ज्यांना तिच्या आईने प्रशिक्षण दिले आहे त्या सोनारपूरमधील महिलांना रोजगार देऊन, कांथा तयार करून घेतात आणि अमेरिका आणि युरोपमधील खरेदीदारांना ते पुरवितात.
तीन-स्तरीय कापडांमध्ये, वरच्या थरासाठी टसर किंवा रेशीम वापरले जाते. तीन स्तरांपैकी, वरच्या थरात मुख्यतः आकृतिबंध आढळतात. खालच्या दोन स्तरांसाठी मलमलचा वापर केला जातो. क्लिष्ट नक्षी कंठा भरतकामासाठी डोळे आणि हातांचे खूप चांगले समन्वय असणे आवश्यक आहे. काम सुरू करण्यापूर्वी, डिझाइनचा अभ्यास केला जातो. कापडात सुरकुत्या,वळ्या मुडपणे इ. टाळण्यासाठी, सरळ रेषांतील काम, किंवा समांतर काम अत्यंत महत्वाचे असते. कांथावर ‘फोर’ किंवा टाक्यांची संख्या अमर्याद आहे. क्रॉस-स्टिच, बॅकस्टिच, केन स्टिच, हेरिंगबोन स्टिच, सॅटिन स्टिच, लांब आणि लहान स्टिच आणि रनिंग स्टिच हे काही सामान्य टाके आहेत. कांथामध्ये ‘टागा’ किंवा बॉर्डरचे विविध प्रकार आहेत. ते म्हणजे बेकी पार ((wavy or bent border), बिचे पार (विंचू) इ. साऱ्याचा अभ्यास करून, अपार कष्ट करून प्रीतिकना यांनी ही कला खऱ्या अर्थाने पुनर्जीवित केली. दरम्यान, पश्चिम बंगालच्या क्राफ्ट्स कौन्सिलने १९९० मध्ये कमलादेवी कंठा सेंटरची स्थापना केली. पालचौधरी यांनी निधी मंजूर केला, ज्या काही महिन्यांसाठी बेडस्प्रेडसाठी ऑर्डर घेण्यासाठी अमेरिकेला गेल्या.जेव्हां पालचौधरी अमेरिकेहून परतल्या, तेव्हा महिलांनी बनवलेले भरतकामाचे कांथा पाहून त्यांना आश्चर्य तर वाटलेच पण आनंदही झाला आणि प्रीतिकनाचे खूप कौतुक वाटले. लवकरच, नवीन केंद्रात नक्षी कंठा भरतकामासह बेडशीट्सचे उत्पादन सुरू झाले.
प्रीतिकना सांगतात की प्रत्येक कांठाची जागा अद्वितीय आहे कारण ती सर्व समुदायांच्या घरात बनवली जात होती. “आतापर्यंत, आम्ही सुमारे २०० कंठांची डिझाईन्स पुनरुज्जीवित केली आहेत. आमच्या क्रोशे किटमध्ये अँकर थ्रेड येतो, जो हाताला काचत नाही आणि पोनी सुया, शक्यतो ९ ते १२ आकारात. फेलिकेट वर्कसाठी, आम्हाला १२ नंबरची सुई वापरतो. आकारानुसार शिवणकामाचा वेळ सहा महिने ते अडीच वर्षे लागतो”. प्रीतिकाना म्हणतात की, या गुंतागुंतीला सर्वाधिक वेळ लागतो.

आधुनिक वापरात, कांठा म्हणजे सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या टाकेच्या प्रकाराचा संदर्भ असतो. सर्वात जुनी आणि सर्वात मूलभूत कांठा टाकी ही एक साधी, सरळ, चालणारी टाकी आहे, जी आपल्या कांथा साडीच्या स्कार्फवर वापरल्या जाणाऱ्या प्रकारासारखी आहे.
महो म्हणते की, तिच्या आईने नक्षी कंठ कलाकृती आणि त्याच्या शिलाईच्या पद्धतीचे पुनरुज्जीवन आणि पुनर्निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक कलाकृती विक्रीयोग्य बनवण्यात येते. ग्राहकांच्या आवडीनुसार वापरलेले रंग पेस्टल असतात, त्यात आकर्षक रंग संगती असून सामान्यतः पिवळा, हिरवा, निळा आणि काळा या रंगांना प्राधान्य दिले जाते.
पश्चिम बंगालची कन्या प्रीतिकाना आता परदेशात त्यांच्या हस्तकलेची विक्री करतात. त्या महिलांना मोफत शिवणकाम शिकवितात. कमलादेवी कंठा सेंटरचे नाव आता लोकांच्या ओठांवर आहे. या प्रतिष्ठित कांथा केंद्रात बनवलेल्या नक्षी कांथा वस्तूंचा अभ्यास केवळ राज्याच्या विविध भागातच नाही तर परदेशातही केला जातो. प्रीतिकनाने परदेशातही ही कला शिकवली आहे. १९९० मध्ये, पश्चिम बंगाल क्राफ्ट कौन्सिलकडून नक्षी कंठा कामाची ऑर्डर आली. तिथूनच यशाची, कलेच्या प्रसिद्धीची घोडदौड सुरु झाली. काम इतके चांगले होते की पुढील वर्षीच नक्षी कंठा काम शिकवण्यासाठी एक विभाग उघडण्याचा ठराव मंजूर झाला ज्याची जबाबदारी प्रीतिकना यांना देण्यात आली.
पश्चिम बंगाल क्राफ्ट्स कौन्सिलद्वारे कांथांचा बहुतेक युरोपियन आणि अमेरिकन बाजारपेठेत व्यापार केला जातो. किंमत भरतकामावर अवलंबून, असून ती ५००० ते २.५ लाख रुपयांपर्यंत असते. २००१ मध्ये, त्यांना त्यांच्या कामासाठी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यापूर्वी त्यांचे काका पंडित निखिल घोष यांना संगीत श्रेणीत पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.
प्रीतिकना यांची नातही या पारंपरिक कलेचे आवडीने प्रशिक्षण घेत आहे, जेणेकरून पुढची तिसरी पिढीही ही कला जपणार हे निश्चित. हा प्रवाह असाच पुढे जाणार यात संशय नाही.

वयाच्या दहाव्या वर्षापासून गरीबीशी परिस्थितीशी झुंज देत आधी माहेर आणि नंतर सासरचे घर उभारणाऱ्या प्रीतिकना यांना जेव्हां प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी त्या भारावून गेल्या आणि उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, “देवाने आम्हाला आशीर्वाद दिला आहे आणि मला माहीत आहे की तो माझे काम अधिक प्रभावी पद्धतीने जागतिक स्तरावर नेऊ इच्छितो. ही केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्यासोबत काम करणाऱ्या शेकडो महिलांसाठी एक ओळख आहे. हा पुरस्कार अनेक महिलांना कलेच्या जगात उतरण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यांचा शोध घेण्यासाठी प्रेरणा देईल.”
अखंड ५० वर्षांच्या अपरिमित कष्टानंतर अत्यंत उच्च पुरस्कार मिळाल्यानंतरही इतक्या नम्र राहिलेल्या प्रीतिकना यांना मानाचा मुजरा !

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर.
(स्रोत : आंतरजाल)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800