स्वतः परमेश्वर पृथ्वी वर अवतरला आणि सर्व भक्तांना म्हणाला, “बसा, आता थोडे शांत माझ्याजवळ. मला तुमच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे, काही सांगायचे आहे, थोडा संवाद साधायचा आहे. गेली अनेक वर्षे तुम्ही केवळ पळत होता. तुमच्याकडे कधीच वेळ नव्हता. तुम्ही तुमच्याच विश्वात रमला होता. सतत कामात होता. म्हणून मीच ही सक्तीची विश्रांती दिली तुम्हाला. थोडे विचार करण्यासाठी. सांगा बरं, एवढे वर्ष तुम्ही काय केले? याचे प्रामाणिक उत्तर द्या. निदान स्वतःला तरी. विचार करा, तुम्ही सतत माझ्याकडे येऊन मला त्रास देत होता म्हणून मी ही थोडी विश्रांती घेतली. तुमची एक इच्छा पूर्ण होत नाही तो पर्यंत दुसरी तयार असे. तुमच्या मागण्यांना अंत नाही. तुमच्या अपेक्षा तरी किती? किती द्यायचे रे तुम्हाला? जरा ही समाधान नाही. तुम्ही कधीही संतुष्ट व सुखी झाला नाहीत. भरपूर पैसे, घरदार, गाडी, बंगला जे हवे आहे ते दिलं तरी आज तुम्हाला घरात बसवत नाही? तुमचे सर्व लाड पुरवले तरी तुम्ही असे रडके? दुःखात तुम्हाला माझी आठवण येते. पण कधी आला का न मागता न अपेक्षा करता माझ्या दारात फक्त नमस्कार करायला? असे ही लोक आहेत , जे म्हणतात सुखी व आनंदी ठेव सगळ्याना. ते माझे प्रिय भक्त जे स्वतःसाठी न मागता केवळ सर्वांसाठी प्रार्थना करतात. त्यामुळे माझे स्थान त्यांच्या हृदयात आहे व त्यांना कधीही काहीही कमी पडत नाही, कारण ते आहे त्यात समाधानी असतात.
खरे सांगू का तुम्हाला मी सर्वात मोठी गोष्ट दिली होती त्याचे महत्व तुम्हाला आज पटले. ते म्हणजे तुमचे स्वातंत्र्य. कुठे ही जाण्याचे, कुणालाही, कधीही भेटण्याचे. पण तुमच्याकडे वेळ नव्हता. तुम्ही सतत कामात. मात्र आज तुम्हाला हे सर्व पटले आहे की, आपल्याला लाभलेल्या स्वातंत्र्यात तर खरे सुख व आनंद आहे. आपल्याकडून ज्यावेळी जी गोष्ट हिरावून घेतली जाते ना तेव्हाच तिचे महत्व पटते. हो ना? त्यामुळे स्मरणात ठेवा आठवणी त्या वीर जवानांच्या, त्या सैनिकांच्या, त्या देश भक्तांच्या ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. बलिदान केले. अनेक सैनिक आज ही आपले कर्तव्य चोख निभावत आहे. त्यांचे बलिदान कदापिही विसरू नका. त्याची परतफेड आपण सात जन्म घेतले तरी फेडू शकत नाही. किती मोलाचे आहे हे स्वातंत्र्य कळले ना?
इतके दिवस घरातील जेष्ठ व्यक्ती प्रेमाने व तुमच्या काळजीपोटी सांगत होती की आरोग्याची काळजी घ्या, व्यायाम करा, सकस व सात्विक आहार घ्या. पण नाही. सतत तो बाहेरचा बर्गर, पिझ्झा हवा असतो ना तुम्हाला. कुठून येणार तरी ती प्रतिकार शक्ती ? जरा ही चालायला नको असते. तुम्हाला सतत ती गाडी पाहिजे. अरे तुमचे पूर्वज एवढे धष्ट पुष्ट होते ते व्यायाम व चालण्यामुळे ना? त्यावेळी कुठे होते हे जिमचे कौतुक? तुम्हीच तुमच्या शरीराचे फार लाड करता. जरा देखील त्रास नको. सगळं कसे घर बसल्या पाहिजे असते. योगाचे फायदे गेली अनेक वर्षांपासून सांगत होतो. मात्र आज हे पटले आहे की योगा केल्याने आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम रहाते.
त्या मोबाईलचे तर व्यसन लागले आहे तुम्हाला. त्यामुळे रात्री उशिरा झोपायचे व सकाळी उशिरा उठायचे. म्हणजे तुमचे वागणे सर्व निसर्गाच्या विरुद्ध. मग कोठे व कधी मिळणार ते कोवळे ऊन? आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे हे तुझ्या आज लक्षात येत आहे. इतके दिवस सांगत होतो ना, नातेवाईकांच्या, शेजाऱ्यांच्या, मित्र मैत्रिणींच्या संपर्कात रहा. कारण आज ह्या कोरोनाच्या वेळेत हीच जोडलेली व जपलेली नाती आली तुमच्या मदतीला धावून. किती आधार असतो एकमेकांशी बोलून. लांब राहून देखील विचारपूस करून केवढा मोठा आधार मिळतो हे पैश्याने नाही विकत मिळत ना? ह्यासाठी एकमेकांना वेळ द्यावा लागतो.
विचार करा, एवढ्या वर्षांत स्वतःहून किती जणांच्या संपर्कात राहिला? वेळ नाही हे कारण नेहमीचे. आज जेव्हा हे सर्व तुमच्याकडून हिरावून घेतले, तुम्हाला लांब ठेवले तेव्हा कुठे तुम्हाला ह्या लोकांची जाणीव झाली. तुमच्या जीवलगांमधील दुरावा निर्माण केल्यामुळे आता ओढ लागली आहे त्यांना भेटण्याची. त्यांच्याशी निवांत गप्पा गोष्टी करण्याची. त्यांना कडकडून मिठी मारण्याची. त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्याची. अरे हीच तर खरी श्रीमंती आहे. तुमची जपलेली जोडलेली नाती. राग रुसवे सगळे सोडून द्या. त्यांचे काही चुकले असेल तर मोठया मनाने माफ करा. कारण तुम्हाला ही माहीत नाही की ती तुमची भेट कदाचित शेवटची असू शकते. त्यामुळे आपल्या प्रियजनाची भेट ही अविस्मरणीय झाली पाहिजे, आपल्या आठवणीत राहिली पाहिजे. ह्या दुरावलेल्या व्यक्तींना आता भेटल्यावर क्षणात दुःख पळून जाईल. तो प्रेमळ स्पर्श, तो आपलेपणा आता तुम्हाला नव्याने जाणवेल. त्यांचं असणं, त्यांची साथ, त्यांची सोबत, त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी लाख मोलाचे आहे ह्याची प्रचिती येईल. हाच तर खरा आनंद आहे आपल्या जगण्याचा.
मनुष्याची खरी श्रीमंती ही त्याच्या पैश्यांमुळे नव्हे तर ह्या नात्यांमुळे कळते. निसर्गाने तुम्हाला नेहमी भरभरून दिले, पण तुम्ही काय केले? वणवे लावले, जाईल तेथे कचरा केला, विनाश केला. झाडे तोडली. पण हा निसर्ग तुम्हाला प्राणवायू देत होता विसरला का तुम्ही? तुम्ही माझ्या निर्मितीत ढवळाढवळ केली. मला खूप त्रास दिला. पृथ्वीवरील ओझे काही निसर्ग प्रेमींनी दूर केल्यावर मला मोकळा श्वास घेता आला. आज कळले ना श्वासाचे महत्त्व जेव्हा आपल्या जीवलगांना श्वास घेताना त्रास होतो तेव्हा किती यातना होतात ना त्यांना? अरे असेच होते मला जेव्हा तुम्ही वणवे लावता. मला जिवंतपणी जाळता. निसर्गाचा मान ठेवा. कारण आपण जे दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळत असते हा निसर्गाचा नियम आहे ना तसा.
तुम्ही किती तरी वर्ष ह्या आमदार, खासदारांच्या मागे मागे फिरत होता. घरातल्यांना ही वेळ दिला नाही. सतत त्यांचा उदो उदो करत होता .अरे सांगा बरं आज तुम्ही ह्या कोरोना रुपी संकटाचा गेले वर्षांपासून सामना करत आहात तर हे आले का रे तुमच्या मदतीला? विचारले का तुम्हाला काय हवे नको ते? केली का काही मदत? काही असतील मंडळी ज्यांनी साथ दिली त्यांचे मनापासून धन्यवाद. पण बाकीचे तर नुसते राजकारण करण्यात व्यस्त होते . फक्त भाषण देण्यात हुशार. काढले का काही स्वतःच्या खिशातले? तुमच्या जीवाची किती पर्वा आहे हे कळले ना? त्यामुळे ह्यातून धडा घ्या. मतदान करताना योग्य व्यक्तीलाच निवडून आणा जी तुमच्या वेळेला धावून येईल. ह्या बऱ्याच मंडळींना फक्त सत्ता हवी आहे. ह्यांना राजकारण माहीत आहे समाजकारण नव्हे. आता तरी डोळे उघडा व योग्य निर्णय घ्या.
ह्या संकटात तुम्हाला साथ देणारे हे सामान्यच होते. ही आपली माणसं, काही दानशूर व्यक्ती व सामाजिक संघटना तुम्हाला मदत करत आहेत. त्यांना कायम लक्षात ठेव. कदापिही विसरू नको. आज मी देव्हाऱ्यात नाही तर ह्या डॉक्टरांमध्ये, स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये, पोलिसांमध्ये व प्रत्येक चांगल्या कामामध्ये माझे अस्तित्व आहे. जी मनुष्य धर्म निभावत आहे व आपले कर्तव्य चोख पाडत आहे, आज मी त्यांच्यात आहे. त्यांचे आत्मबळ वाढवत आहे त्यांना मानसिक आधार देत आहे. स्वतःपुरते जगायचे सोडून द्या. जरा दुसऱ्यांच्या विचार करा. एकमेकांना सहकार्य करा .मी तर तुमच्यातच आहे हे कायम लक्षात ठेवा. आज पटले ना तुमचा खरा आनंद हे तुमचे मनुष्य रुपी शरीर आहे. ह्याचा मान राखा.
जात पात, भांडण तंटे, उच्च नीच, श्रीमंत गरीब, हे भेदभाव कदापिही करू नका. ही तर माझी निर्मिती आहे. तुम्ही सर्व खेळीमेळीने रहा. हीच माझी एकमेव इच्छा आहे. कारण माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हीच तर माझी शिकवण आहे व ह्या मानवरुपी निर्मितीचा खरा उद्देश आहे. माणुसकी जपणे हाच एकमेव धर्म आहे. कारण जाताना आपण काहीही घेऊन जाणार नाही. केवळ ह्या आठवणी त्या शेवटच्या श्वासा पर्यंत तुमची सोबत करणार आहे. आता तरी जागे व्हा. हे सर्व लवकरच संपणार आहे. हे सांगण्यासाठी ही सक्तीची विश्रांती तुम्हाला लाभली आहे. पुन्हा चूका करू नका. हे जीवन खूप सुंदर आहे. त्याचा आदर करा. आनंद घ्या. इतरांना ही द्या. ह्या सर्वातून तुम्ही लवकरच बाहेर पडणार आहात. त्या मुक्त पक्षासारखे उंच भरारी घेणार आहात. मनातील भीती काढून टाका. सर्व पहिल्यासारखे होणार आहे. परत तुम्ही स्वातंत्र्य साजरे कराल आपल्या माणसासोबत पुन्हा नव्याने. तथास्तु !”.
लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.