कोण लावतं शिस्त अवघी
कोण करणार असतं शिक्षा
अद्भुत आकार देतंय कोण
कोणाची घेतली असेल दीक्षा
तुझं माझं नसतंच कधीही
यांच्या निखळ फुलोऱ्यात
कळी असता मुकी भासती
फुलताच दिसती तोऱ्यात
कितीक सुंदर रंगछटेतून
देठावरती बसती डोलत
मनमोहक राजबिंडे येती
परागकणांचा झेंडा मिरवत
क्षणभंगुरतेची जाणीव नसते
आज उद्या ची नसते हो भ्रांत
रवी किरणांनी आशिष देता
रंगवतात फुलोऱ्याचा प्रांत
माध्यांनाला प्रौढत्वाची शैली
अंगिकारतात फुले दिमाखात
अन्हिक आटोपून सांजेला
ज्येष्ठत्वाची शाल पांघरतात
दिले, घेतले, अनुभवले हे
स्वानंदी जीवन जास्वंदाचे
ताठ बांधा नतमस्तकतेने
झालेत पांथस्थ निर्माल्याचे
— रचना : सौ.प्रज्ञा कुलकर्णी. वसमत
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800