१. पर्जन्य
ऐका हो, सुटले पर्जन्याचे अस्त्र
धुमधडाड् धुम हो,
समृध्दीचा नाद, समृध्दीचा नाद, समृध्दीचा नाद // ऐका हो
टप् टप् अगणित मोती ती सांडती
लखलखती चमकती रत्नहार ते वरती
त्या दिव्य प्रकाशे वसुंधरा दिपली की
या उठा पहा हो वरुणाची बरसात, वरुणाची बरसात // ऐका हो
अबलखी वारु ते वायूचे जुंपुनी
मानाची चवरी वारिवाह वारिती
नभमंडळ सारे छत्रचामरासम की
या, पूजन करूं या वरुणस्वारीचे आज, वरुणस्वारीचे आज // ऐका हो
सुस्नात होऊनि शालू नेसली धरती
हातात कांकणे, पैंजण पदी रुणझुणती
पाचूच्या शेवी पुष्पे बहुरंगी ती
ते जलौघ प्रक्षाळिती वरुणाचे हो पाद, वरुणाचे हो पाद// ऐका हो
प्रेमाने करण्या स्वागत या राजाचे
लावू या रोपटे सार्थ भक्तिभावाचे
पाचूच्या बेटी गुंफू मौक्तिकसर ते
या मंगलक्षेत्री होई कृपाळू सदैव, होई कृपाळू सदैव // ऐका हो
– रचना : स्वाती दामले.
२. कायम सोबत करते
आई वसुंधरा सुंदर तुझी काया
सगळ्यांना भुरळ घालते तुझी माया
हिरवे गार जंगल
जीव जंतू करतात मंगल
काळी आई बोलविते
आणि वर्षा राणी बरसते
हिरवळ दाटे चोहिकडे
सुंदर फुले सगळी कडे
थंड थंड हवा
शुद्ध हवा आपल्यासाठी
उंच उंच डोंगर
दिसतात विशालकाय
झुळुझुळू नदी वाहते
सतत मंजुळ गाणी म्हणत
जीवनात असेच काही घडते
सतत आपल्याला शिकवत असते
हीच माय वसुंधरेची
कायम सोबत करते
कायम सोबत करते.
– रचना : खिल्लव सतीश
३. पर्जन्य काळ्या मेघा
(अभंग)
अरे काळ्या मेघा। तू निष्ठूर होतो ।
किती बरसतो । शहरात
आता तिकडे जा। शेतात बरस
मातीत रे हस। आनंदाने
पायपीट चाले। कोसभर बाया
जलास भराया । अनवाणी
पाऊस पडता। तो लगबगीने
पेरील बियाणे । बळीराजा
फुलेल कष्टाने । सावताचा मळा
घास मुलाबाळा ! सुखातला
बीज अंकुरेल । बळीच्या घामाने
किमया जोमाने । पिकातली
आम्हावर तुझी । मेघा कर माया
बळीवर दया । नेहमीच
— रचना : प्रा अनिसा सिकंदर
४. मला घालतो उखाणा…
आला श्रावण श्रावण मला घालतो उखाणा
ओला चिंब होतो आणि मला हासतो दिवाणा
आला श्रावण श्रावण
निथळतो अंगोपांगी मोहरते माझी काया
हिरवेच त्याचे छत्र हिरवीच त्याची छाया
प्राजक्ताचे घडे स्नान डोलवितो बघा माना
आला श्रावण श्रावण
वेली वेलींवर फुले सुगंधित त्याची माया
वृक्षा बहर उद्याना
फुला फळांना द्यावया
तनू मोहरते माझी सजणा हो या ना या ना
आला श्रावण श्रावण
सजणाची प्रीत माझ्या नसानसात खेळते
मोगऱ्याचा गंध तिला हृदयात दर्वळते
येणार तो कधी असा अगांतुक हो पाहुणा
आला श्रावण श्रावण
मिठी त्याची सैल होता दंवबिंदू सांडतात
मोती दाणे टपोरे ते मातीलाच मिळतात
अशी प्रीत जीवघेणी नको मारूस तू ताना
आला श्रावण श्रावण
मला घालतो उखाणा
– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
५. डाव नवा
(वृत्त पादाकुलक)
मोती गुंफित सर ती आली
आठवण सखी तुझीच झाली…
ओलेती तू जवळी ये ना
रोमरोमात भिनून जा ना..
सांगितले ते गुज प्रेमाचे
कानी गाणे मग थेंबांचे…
श्वासात तुझ्या गंध दरवळे
सरीत फुलती कोंब कोवळे..
भिजु चल जाऊ धारात मजा
आठवण तुझी कशी करु वजा..
अजुन मन कसे हिरवे ताजे
धार ओघळे रेणुत वाजे..
स्पर्श रेशमी सडा सांडतो
पाऊस नवा डाव मांडतो
– रचना : राधिका भांडारकर. पुणे
- — संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869454800
छान रचना.