चित्रकाव्य
निष्पर्ण झाड अपुले एकाकी तळ्याकाठी
थांबती न कोणी येथे ना छाया ना घरट्यासाठी
निष्पर्ण अवस्था झाली जवळचे सर्व देताना
जीवन त्याला कळले पाण्यात पाहताना
तो शांत जलाशय आहे सोबतीस फक्त आता
ध्यानस्थ ऋषी सम तो जैसा आत्मानंदी होता
प्रतीबिंबासी पाहताना आठवली पक्षांशी नाती
सोडून गेले जरी सगळे ती घट्ट राहीली माती
येईल चैत्र मास अन् पालवी ही मग फुटेल
त्या जगनियंत्याची कारागिरी ती कळेल
आशा अन् निराशेचे हे मेघ जातील लवलाही
आशेचा एकच किरण देतो उमेद जगण्यालाही
आकाश अन् धरतीचे ते नाते आपल्यासाठी
किती महत्वपूर्ण आहे सांगे निष्पर्ण तळ्याकाठी

— रचना : सौ अर्चना मायदेव. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
मस्त…च