Wednesday, December 3, 2025
Homeसाहित्यपुस्तकांवर बोलू काही

पुस्तकांवर बोलू काही

एखाद्या कला दालनात प्रवेश केला की नकळत आपले डोळे सर्वत्र फिरू लागतात. अनेक सुंदर सुंदर चित्रांनी कला दालन वैभव संपन्न झालेलं असतं आणि मग आपण त्या चित्रासमोर उभे राहून त्यातला गूढार्थ, भावार्थ ,सौंदर्य आणि कलाकारांचं अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि मग एक जाणीव होते, ती म्हणजे कलाकारांनी त्यात आपला प्राण ओतलाय. म्हणून त्या चित्राची सुंदरता इतकी वैभव पूर्ण झाली.

असंच काहीसं खूप मनापासून  जाणवलं  ते  म्हणजे “पुस्तकांवर  बोलू काही “ह्या  अतिशय आगळयावेगळया पुस्तकाचा  मागोवा  घेतांना. कथा,कादंबरी, ललित लेख संग्रह, कविता संग्रह, चरित्र असं कोणत्याही प्रकारात  न मोडणारं,पण तरिही  ह्या सर्व  साहित्य  प्रकाराचा मागोवा  घेणारं हे पुस्तक  निश्चितच खूप  वेगळं आहे. वाचकांनी तोलून धरलेलं आणि संकलन करत्या आणि आम्हा सर्व वाचकांना प्रेरित करून एक अनुपम कलाकृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रेडिओ विश्वास इथे कार्यरत असणाऱ्या मेघना साने यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. अथक प्रयत्न आणि जिद्द यांनी माणूस नेहमीच एक उंची गाठू शकतो पण त्यासाठी त्याला अनेकांची साथ हवी असते आणि ती जर मिळाली तर तो आपले उद्दिष्ट निश्चितच गाठू शकतो.

उद्वेली प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मुखपृष्ठासहित अंतरंगात ही अतिशय सुंदरतेने सजलेलं आहे. सुरेख अक्षर बांधणी आणि प्रत्येक लेखकाच्या मुखपृष्ठानी सजलेलं असं एक वैविध्यपूर्ण पुस्तक “पुस्तकांवर बोलू काही”. अनेक अभ्यासू वाचकांनी अनेक दिग्गज लेखकांच्या कलाकृतींवर केलेलं समीक्षणात्मक विवेचन ही या पुस्तकाची मूळ रूपरेषा. अनेक वाचकांनी आवडलेल्या पुस्तकाचा अभ्यास करून त्याचे परीक्षण करून लिहिलेलं एक अभ्यासपूर्ण विवेचन. हे करताना अनेक साहित्य प्रकार यात हाताळले गेले आहेत. कथा, कादंबरी, लेख, कविता ,चरित्र असे साहित्याचे विविध प्रकार आणि त्यांचं गुणात्मक विवेचन. यासाठी अनेक वाचकांनी निवडलेले आपले आवडते लेखक , त्यांच्या आवडत्या कलाकृती अशा जवळपास ऐंशी लेखांचे हे एक वाचनीय आणि अभ्यासनीय पुस्तक झाले आहे.

वाचन हा माणसाचा एक आवडता छंद. करमणूक करणारा, ज्ञान देणारा, इतिहासात नेणारा, सामाजिक घडामोडींच्या अनुषंगाने लिहिल्या गेलेल्या अनेक अभ्यासात्मक तर कधी निखळ मनोरंजन तर कधी भावभावनांच्या विळख्यात आपल्याला गुंतवून ठेवणारे एक सुंदर पुस्तक वाचले.

मनुष्याला आयुष्यात आनंद देणाऱ्या गोष्टींमधला वाचन हाही एक आनंद देणारा छंद. या आनंद देणाऱ्या छंदाचाच एक उपक्रम म्हणून केलेला उपयोग मेघना साने यांना एक नवीन कल्पना सुचवून गेला. रेडिओ विश्वास वर मला आवडलेले पुस्तक यावरचा ऑडिओ ,त्याचे संकलन आणि त्या संकलनातून पुस्तक रुपाने घडलेला एक अनोखा प्रवास अतिशय सुंदर आणि मनोहारी असाच आहे.

या पुस्तकाच्या अंतरंगात डोकावताना एक जाणवतं, वि.स.खांडेकर  यांच्या ययाती पासून व्यंकटेश माडगूळकरांच्या गावाकडच्या गोष्टी, शिवाजी सावंत यांचं युगंधर , मृत्युंजय, विश्राम बेडेकर यांचं रणांगण, गिरिजा कीर यांचं कणकण क्षणक्षण तर माई सावरकरांचं आत्मचरित्र. जयवंत दळवी यांची महानंदा , शुभांगी भडभडे यांचं अद्वैताचे उपनिषद, दीपशिखा कालिदास, विजया वाड, व पु काळे ,आशा बगे कितीतरी नावं , कितीतरी नावाजलेले लेखक तर आजच्या पिढीचे नेतृत्व करणारे सदानंद देशमुख, अशोक समेळ, अनिल बर्वे, वीणा गवाणकर, सुबोध भावे, शिरीष पै यासारखे वाचकांच्या अंतरंगात डोकावणारी आणि त्यांच्या हृदयात आपलं स्थान निश्चित करणारे हे लेखक, त्यांची ग्रंथसंपदा आणि त्यावर वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया या सर्वांचं एक सुंदर संकलन म्हणजेच “पुस्तकांवर बोलू काही” या पुस्तकाची निर्मिती होय.

“विवेक मेहेत्रे” “वैशाली  मेहेत्रे” ह्या  “उद्वेली प्रकाशनाच्या”  साहित्यिक दाम्पत्याने मेघना साने यांच्या या सुंदर कल्पनेला खतपाणी दिलं आणि एक अनुपम कलाकृती निर्माण झाली. जवळपास  ८० पुस्तकांवर चाळीस वाचकांनी केलेलं हे पुस्तकाचं यथार्थ अवलोकन. आपल्या मनाला भावलेल्या या पुस्तकाचा आस्वाद घेताना त्यातलं सौंदर्य , त्यातली भाषा, भावनिक आंदोलन आणि एक समीक्षणात्मक अभ्यासच आहे .
या पुस्तकाचा आस्वाद घेताना आणखी एक जाणवतं ते म्हणजे लेखक जितके दिग्गज आहेत, मोठे आहेत तसेच आस्वादक म्हणून असणारेही बहुतांश लेखक आहेत. सुंदर साहित्य निर्मिती करणारे आणि साहित्यावर भरभरून प्रेम करणारे असेच आहेत. त्यामुळे निर्मित झालेली कलाकृती ही उद्बोधक ,आगळीवेगळी आणि साहित्याच्या अंतरंगात डोकावणारी एक स्मरणीय अशी कलाकृती आहे.

“अल्का अग्निहोत्री”च्या, “श्रीनिवास  कुलकर्णी” लिखित, “सोन्याचा  पिंपळ” या पुस्तकाच्या आस्वादाने पुस्तकाचा प्रारंभ व  डाॅ. सुधीर  मोंडकर ह्यांनी  “डाॅ सदा कराडे लिखित  “भाषांतर” या पुस्तकाच्या आस्वादाने पुस्तकाचा  शेवट होतो. २८०पानाच्या या पुस्तकात विजया पंडित राव, भारती मेहता ,मोहना कारखानीस, गिरीश ताम्हणे, प्राध्यापक मानसी जोशी ,दीपक कांबळे ,अमृता संभूस, शुभांगी पानसंबळ कितीतरी आस्वादक लेखक मंडळी आहेत. या सगळ्यांची नावे सुद्धा पूर्णत्वाने लिहिल्या जाऊ शकत नाही .पण सगळ्यांचा मिळालेला उत्तम सहभाग ही पुस्तकासाठी आनंदाची पर्वणी आहे.
आनंद देणाऱ्या या साहित्याच्या यात्रेत आम्ही सर्व सहभागी होऊ शकलो ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं एम. ए  व एम. फिल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अलीबाबाची गुहा आहे .इथे मिळणारी रत्न अनमोल आहेत. आवडते लेखक, आवडते पुस्तक आणि पुस्तकांचा एक खजिना या पुस्तक रूपाने तुमच्या समोर उघडलाय. तेव्हा हे पुस्तक त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल.

कौतुक या गोष्टीचे आहे की हे कोणा एका लेखकाचं पुस्तक नाही तर अनेक लेखक, त्यांचं साहित्य यात चपखलपणे  सामावलेले आहे. अनेक वाचकांच्या सुंदर ,भावपूर्ण आणि गुणात्मक विवेचनानी  ते परिपूर्ण आहे. खूप वेगवेगळे प्रकार आहेतच पण पण खूप वेगवेगळे विषयही यात अंतर्भूत आहेत. सगळ्यांचा परामर्श घेण्यासाठी वाचकांनी या पुस्तकाचा आस्वाद घ्यायला हवा तेव्हाच या पुस्तकाच्या निर्मितीचे प्रयोजन साध्य होईल.

लेखन – शुभांगी गान.
संपादक – देवेंद्र भुजबळ- 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. कोणत्याही कामाचा उद्देश चांगला असला की ते काम उत्कृष्ट होतेच . म्हणूनच हे पुस्तक आकर्षक आणि मनोरंजक झाले आहे. अभिनंदन मेघना ताई साने आणि सर्व लेखक मंडळींचे 🙏

  2. पुस्तकांवर बोलू काही.. या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाचं परिक्षणही तितकंच सुंदर .. पुस्तकाबद्दल उत्सुकता वाढवणारं आहे . सुरेख लिहिलं आहे .. शुभांगीताई अभिनंदन !

  3. वा खूप छान…परीक्षण लिहिलं की पुस्तकं वाचण्याची उत्कंठा वागते..👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments