Tuesday, March 10, 2026
Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

“कला-साहित्य भूषण :  यशस्वीतांची वास्तव ओळख”
    
श्री. देवेंद्र भुजबळ, निवृत्त  माहिती संचालक महाराष्ट्र शासन यांनी लिहिलेले ‘कला-साहित्य भूषण’ हे पुस्तक वाचण्याचे भाग्य लाभले.‌ प्रतिकूल परिस्थितीतही ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ याप्रमाणे  सतत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा, त्यांच्या कार्याचा सर्वदूर परिचय व्हावा या सकारात्मक वृत्तीने तीस व्यक्तिंचा परिचय करून देण्याचे अविस्मरणीय काम श्री भुजबळ सर यांनी ‘कला-साहित्य भूषण’ पुस्तकाच्या माध्यमातून केले समाजासमोर आहे. देवेंद्र भुजबळ यांना हा एक ध्यास जडला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण त्यांनी लिहिलेली *“भावलेली व्यक्तिमत्त्वे; गगनभरारी; प्रेरणेचे प्रवासी; अभिमानाची लेणी; समाजभूषण; आम्ही अधिकारी झालो; माध्यमभूषण”* ही पुस्तके त्यांच्या लेखनाची साक्ष देतात.
   
मनोगत लिहिताना एक प्रश्न भुजबळ सरांनी स्वतःलाच विचारला आहे, ‘मी का लिहितो, माझ्या लेखनाचा वाचकांना, समाजाला काय उपयोग आहे, मुळात काही उपयोग आहे का ?’ लेखक या प्रश्नांची स्वतःच उत्तर देताना म्हणतात, ‘प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ज्यांनी यश मिळविले,‌ आणि स्वतःला मिळालेल्या यशावर समाधान न मानता, ज्या व्यक्ती इतरांना यशस्वी करण्यासाठी झटत आहेत, त्यांच्या यश कथा, जीवनकथा आपल्या लेखणीद्वारे समाजासमोर आणणे होय.’ किती प्रामाणिक आणि सच्चा संदेश आहे हा!

भुजबळ सरांना हा ध्यास असण्यामागे दुसरीही एक इच्छा नक्कीच असणार, कारण आपण बघतो की, समाजात, हल्ली छोट्याछोट्या कारणांमुळे, थोड्याशा अपयशामुळे खचून जाणे, नैराश्य येणे ह्या गोष्टी वाढत चालल्या आहे. त्यामुळे अशा प्रेरणादायी जीवन कथांमुळे अनेक निराश व्यक्तिंना ऊर्जा मिळू शकते, ‌आत्मविश्वास परत येऊन ते इप्सित साध्य करण्यासाठी नव्या जोमाने प्रयत्न करू शकतात.
    
गझलम्राट सुरेश भट यांनी लावलेल्या गझलेच्या बीजाचे वटवृक्षात रुपांतर करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा असलेले अमरावतीचे ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे यांच्या एकूण प्रवासाला भुजबळ यांनी शब्दसाजांनी फुलवले आहे. सुरेश भट यांनी पांचाळे यांना ‘गज़लनवाज’ देऊन सन्मानित केले आहे. गत् पन्नासहून अधिक वर्षे गझलेच्या प्रांगणात मुशाफिरी करणाऱ्या भीमराव यांच्यासाठी हा फार मोठा पुरस्कार आहे. महाराष्ट्रासह देशविदेशातील रसिकांना पांचाळे यांनी मंत्रमुग्ध केले आहे.
     
जयंत ओक यांचा प्रवास त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे असाच आहे. दूरदर्शनवर काम करणे म्हणजे अभिमानास्पद! परंतु ओक यांनी  सतरा वर्षे नोकरी करून ती सोडून ‘गप्पागोष्टी’ हा स्वतंत्र एकपात्री प्रयोग सुरू केला. अल्पावधीत त्यांच्या धाडसाने यशश्री खेचून आणली. हा प्रयोग भारतासोबत अनेक देशांमध्ये प्रचंड यशस्वी झाला. म्हणतात ना, ‘कोशिश करनेवाले की हार नहीं होती हे ओक यांनी सिद्ध करून दाखवले अर्थात त्यांनी किती कष्ट घेतले हे त्यांनाच माहीत!
‘खबरदार जर टाच मारुनी, जाल पुढे चिंधड्या उडवीन, राई राई एवढ्या…’ ह्या वीररसाच्या, स्फूर्तिदायी अशा ओळी आहेत. हे गीत न ऐकलेला माणूस शोधूनही सापडणार नाही. हे गीत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. परंतु काही व्यक्ती अशा असतात ज्या रुळलेल्या वाटेवरून न जाता स्वतःची वेगळी वाट निर्माण करतात. असाच एक छंदिष्ट  कलावंत म्हणजे प्रा. विसुभाऊ बापट! या वीररसयुक्त गीताला एका शाळेत शृंगार रसाकडे वळविल्याचे पाहून बापट यांनी ही कविता योग्य आणि मूळ रसात पोहोचावी म्हणून ‘ओंकार काव्य दर्शन’ शीर्षाखाली शालेय कार्यक्रम सुरू केला. गौरवास्पद बाब म्हणजे या कार्यक्रमाचे साडेबारा हजार कार्यक्रम सादर झाले आहेत हे लेखक आपुलकीने लिहितात. सोबतच विसुभाऊंचा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
  
‘आपल्या समाजात, घरात चित्रपट पाहणारा माणूस म्हणजे वाया गेलेला माणूस समजला जातो. वृत्तपत्रात चित्रपट समीक्षण लिहिणाऱ्यासही कमी लेखले जाते…’ असे विधान करणारे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समीक्षक, लेखक, भारतासह इतर देशात चित्रपट महोत्सवात ज्युरी म्हणून ओळखले जाणाऱ्या अशोक राणे यांनी समाजाला चित्रपट पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली. राणे यांची साहित्य क्षेत्रातही फार मोठी कामगिरी आहे. त्यांच्या जीवनातील अनेकानेक प्रसंगांचे वर्णन देवेंद्रजी यांनी छान रेखाटले आहे.
   
आकाश, निसर्ग, क्षितिज या गोष्टी मानवाच्या औत्सुक्याचा आहेत. दूरदर्शनच्या निर्मात्या मीना गोखले यांनी एक सुंदर संदेश दिला आहे, ‘आकाश खूप मोठं आहे. तुम्ही भरारी घ्याल तितकी त्याची निळाई खोल आहे.’ मीना गोखले यांच्या कार्याची ओळख, महत्त्व भुजबळ सरांनी मोठ्या आत्मियतेने व्यक्त केले आहे. मीनाताईंचा दुसरा एक स्वानुभवयुक्त संदेश आहे, ‘निर्मिती करताना ही जी ‘मी’ आहे तिचा काय फायदा झाला ? तर माझा ‘मी पणा’ कमी झाला…’
   
केवळ नाव प्रतिभा आहे असे नाही तर लेखनही ‘प्रतिभासंपन्न’ असणाऱ्या लेखिका म्हणजे प्रतिभा सराफ! भौतिकशास्त्राचे अध्यापन करताना तेरा पुस्तके प्रकाशित करणे ही सोपी गोष्ट नाही. पती अर्ध्यावर  संसार  सोडून  गेल्यावर  त्यांनी पुस्तकाची मैत्री केली. पतीच्या आठवणी जागृत करताना त्यांनी कथा, गझल, कादंबरी असे साहित्य प्रसवले. साहित्य त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग असे बनले ते त्यांच्या शब्दांत…
लिहित नाही तेव्हा तेव्हा वाचत असते.
वाचत नाही तेव्हा तेव्हा लिहीत असते.
दुःख अवतीभोवती असणाऱ्यांचा वरील ओळी आत्मविश्वास जागविणाऱ्या ठरतात.
  
गायिका, प्राध्यापिका, लेखिका, चित्रपट संगीत शोधक सोबत राजा हरिश्चंद्र अशा चित्रपटांसाठी योगदान देणाऱ्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. मृदुला दाढे! त्यांचा जीवनप्रवास लेखक भुजबळ यांनी सहजतेने उलगडला आहे.
 
लावणी न ऐकलेला मराठी माणूस विरळाच! लावणी हे तमाशातील लोकप्रिय असे अंग! भुजबळ सरांनी ह्या लोकप्रिय क्षेत्रातील रेश्मा मुसळे परितेकर या उच्चशिक्षित लावणी कलाकाराची छान माहिती समोर ठेवली आहे. विशेष म्हणजे रेश्माताई हा व्यवसाय सांभाळताना ‘मराठी लावणी’ या विषयावर पी.एचडी. करीत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे. त्यांनी प्रस्तुत केलेले बोल सद्य परिस्थितीत महत्त्वाचे आहे, ‘सध्या लावणीला जे चित्रपट, रिॲलिटी शोज चे वळण प्राप्त झाले आहे, त्यामुळे खरी लावणी लोप पावत चालली असून लावणी जिवंत ठेवण्यासाठी आपली वैचारिकता वाढविण्याची आवश्यकता आहे.’
  
सिंगापूर येथे वास्तव्यास असलेल्या मोहना कारखानीस यांनी तिथे मराठी साहित्याची सेवा सुरू ठेवली आहे. त्यांचे साहित्य सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळ प्रकाशित करीत असलेल्या ‘ऋतुगंध’ या द्विमासिकासोबत अनेक डिजिटल पोर्टल, दिवाळी अंक, विशेषांक, वर्तमानपत्र पुरवणी इत्यादी ठिकाणी सातत्याने प्रकाशित होत असते. सोबतच परदेशात राहणाऱ्या मुलांना मराठी संस्कृतीचे शिक्षण, मराठीची गोडी लावण्यासाठी कार्यरत आहेत. आपल्या देशातील जातपात, उच्चनीच, गरीब श्रीमंत इत्यादी भेद लवकर नष्ट व्हावेत हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ‘चांगले ते स्वीकारावे, वाईट ते सोडून द्यावे आणि सतत कार्यमग्न रहावे.’ ही त्यांची विचारसरणी अनुकरणीय आहे.
     
शाहीर वैराळकर, गायिका विजयालक्ष्मी मणेरीकर, परदेशस्थ चित्रकार शिल्पा तगलपल्लेवार, गझल गायक सुरेश दंडे,‌ चित्रकार माधवी पाटील, चित्रकार विजयराज बोधनकर,  लेखक डॉ.आलोक जत्राटकर,‌ नाट्यकर्मी डॉ. श्याम शिंदे, लेखिका  उषा रामवाणी, चित्रकार प्रतिभा रावळ,‌ साहित्यिक-संशोधक धर्मपाल कांबळे, कलाकार कुटुंब रझाक-वृशाली आणि रायमा, चित्रकार रमेश औंधकर, दूरदर्शन  निर्माते रविराज गंधे या मान्यवरांचा प्रवासही लेखक देवेंद्र भुजबळ यांनी अत्यंत आपलेपणाने नि शब्दसाजांनी साकारला आहे.
   
अमेरिकेत वास्तव्य असणाऱ्या कवयित्री डॉ. गौरी जोशी  कंसारा यांचा  कवितेचे रसग्रहण हा आवडता साहित्य प्रकार! कवी बा.भ. बोरकरांच्या काव्याबद्दल त्या लिहितात,’बोरकर यांची ‘लावण्य रेखा’ ही कविता कर्मयोगाचे श्रीकृष्णाने सांगितलेले तत्त्वज्ञान अतिशय सौंदर्यपूर्ण शब्दांत समजावणारी अशी मला वाटते.’
   
जगप्रसिद्ध चार्ली चॅप्लिन या कलाकाराची भारतीय प्रतिकृती म्हणजे वरप्रभ शिरगावकर ! चॅप्लिनसारखी हुबेहुब वेशभूषा, केशभूषा करून महाराष्ट्रभर मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या शिरगावकर यांच्या कार्याची योग्य शब्दांमध्ये लेखकाने दखल घेतली आहे.
  
भारूड ह्या लोककलेचा प्रसार नि प्रचार करणारा लोकप्रिय कलाकार म्हणजे हमीद सय्यद ! कविता, देशभक्तीपर गाणी, अभंग, गौळणी, लोकगीते, कथा, कीर्तने ऐकण्याची आवड सय्यद यांना लहानपणापासूनच होती. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात आपली कला सादर केली. नंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.‌ महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्यांनी कला सादर केली आहे.
    
काही नावे हीच त्या व्यक्तिची ओळख असते. अन्य विशेषणे, कौतुक याची फारशी आवश्यकता नसते. सुप्रभात, आरसा, हसवाहसवी, हास्यपंचमी, हास्यरंग, खळखळाट,‌ विडंबन गीते, इत्यादी कार्यक्रमांसोबत विनोद, किस्से, विडंबने सादर करून घराघरात पोहोचलेली व्यक्ती म्हणजे बंडा जोशी! अशा चौफेर व्यक्तिमत्त्वाची ओळख भुजबळ सरांनी अत्यंत आत्मीयतेने करून दिली आहे.
    
चित्रेकलेच्या प्रांतात ‘वारली’ हा प्रकार स्वतःचे आगळेवेगळे स्थान टिकवून आहे. या क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव म्हणजे मधूकर वाडू ! ह्या वैशिष्ट्य प्रकारासोबत वाडू लेखन क्षेत्रातही अग्रेसर आहेत. वारली प्रकारातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन श्री देवेंद्रजी यांनी त्यांचा योग्य सन्मान केला आहे.

जाता-जाता… अस्मादिकाच्या कार्याचा उत्तम आढावा भुजबळ सरांनी घेतल्यामुळे आगामी कार्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
     
कला-साहित्य भूषण ह्या न्यूज स्टोरी टुडे प्रकाशन, नवी मुंबई  ह्यांनी  प्रकाशित केलेल्या पुस्तकातील सर्वच मान्यवरांचा प्रवास भुषणावह, अलौकिक, वाचनीय नि अनुकरणीय, प्रेरणादायी आहे.

नागेश शेवाळकर.

— परीक्षण : नागेश शेवाळकर, पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments