8 ऑक्टोबर रोजी मोखाडा येथे प्रभात यात्रेचे नियोजन पूर्ण झाले होते. उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता. परंतु आदल्या दिवशी आश्रम शाळेकडून कळविण्यात आले की आपल्याला नियोजित कार्यक्रम रद्द करावा लागेल. कारणही तसेच होते, आश्रम शाळेत बारावी सायन्स मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर प्रेम प्रकरणातून झालेल्या हल्ल्यात तिने आपला जीव गमावला व हल्ला करणाऱ्यानेही स्वतःआत्महत्या केली होती. हे सर्व आमच्यासाठी धक्कादायक होते.
प्रभात यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्वांनी प्रभात यात्रा स्थगित करून झालेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद देण्याचा मनोदय व्यक्त केला. आपण काय करू शकतो..? अशा अनुषंगाने चर्चा सुरू झाली. ज्या शाळेतील विद्यार्थिनीची भर दिवसा आपल्या समक्ष हत्या होते त्या शाळेतील विद्यार्थ्यां व शिक्षक यांची मानसिक स्थिती काय असेल ? या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी व असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी त्यांच्याशी मानसोपचार तज्ज्ञांच्या कडून संवाद साधला जावा असा विचार पुढे आला. या विचाराला मूर्त स्वरूप प्राप्त झाले रेमेन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त मानसोपचार तज्ञ डॉ.भरत वाटवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धा फाउंडेशनच्या डॉ. स्वराली कोंडविलकर व ठाणे मेंटल हॉस्पिटलच्या सेवानिवृत्त मानसोपचार तज्ञ डॉ.अंजली पाटील (सुरज हॉस्पिटल, सानपाडा) यांनी मोखाडा येथे दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी प्रत्यक्ष भेट देऊन संवाद साधला.
या संवाद भेटीचा श्रीगणेशा देवबांध येथील गणेश मंदिरातून करताना आदिवासी जीवन पद्धती, विवाह संस्कृती या विषयाशी निगडित माहिती वनवासी कल्याण आश्रमाचे साठे काका यांच्या भेटीद्वारे प्राप्त झाली.
प्रवासादरम्यान ठरलेल्या योजनेप्रमाणे स्वागत समारंभ न ठेवता सरळ चहापानाच्या वेळेला सर्व अध्यापकांना एकत्रित करून संवाद साधत विद्यार्थ्यांच्या सवयी, राहणीमान, मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर आठवी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन वर्ग आयोजित करून संवाद साधण्यात आला.

जेवणाच्या वेळी आदिवासी समाजातील तरुण नेतृत्व प्रदीप वारघडे व इतर सहकाऱ्यांशी संवाद साधत घडलेल्या प्रकाराबाबत समाजमनाचा कानोसा घेण्यात आला. मधल्या सुट्टीनंतर हत्या झालेल्या मुलीच्या निकट मित्र-मैत्रिणींसह संवाद साधण्यात त्यांना मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. मानसोपचार तज्ञांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
समारोपाच्या कार्यक्रमात तज्ञांना आलेले अनुभव कथन करत काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी प्रकल्प प्रमुख प्राचार्य डॉ.भोर सर, मुख्याध्यापक शेळके सर, शिक्षक लोंढे सर व जगदाळे सर, अधीक्षक पोळ सर उपस्थित होते.
नवरात्री मध्ये झालेल्या या संवाद दौऱ्याची सांगता मोखाड्याची ग्रामदेवता आई जगदंबा मातेच्या दर्शनाने करण्यात आली. या संवाद भेटीतून प्राप्त निष्कर्ष तज्ञांच्या मार्फत संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी व सरकारी यंत्रणा यांच्यापर्यंत पोहोचवून अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याबद्दल अहवाल सादर करण्याचा मनोदय आहे. एकंदरीत प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या बदल निश्चित घडेल मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती हा आशावाद प्रकट झाला.

— लेखन : डॉ.प्रशांत थोरात. नेत्ररोगतज्ञ
प्रभात ट्रस्ट, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
आनंददायी उपक्रम आहे.
खूप छान उपक्रम .
प्रभात यात्रा स्थगित न करता प्रत्यक्ष झालेल्या घटनेला सामोरे जात त्यातून विधायक कार्यक्रम करणं ही अत्यंत स्तुत्य बाबा आहे. डॉ प्रशांत यांचं अभिनंदन करावं तितकं थोडंच.