लघुकथा
नेत्रहिन व्यक्तीच्या आयुष्यावर विचार करायला लावणारी आणि त्यांचे दुःख, यातना यांची जाणीव करून देणारी सत्यघटनेवर आधारित, अशी ही अंतर्मुख करणारी भावस्पर्शी कथा….
नाशिकवरून आईला भेटून मी श्रीरामपूला निघालो होतो. गाडीत एवढी गर्दी नव्हती पण अंतरा अंतराने प्रवासी मात्र बसलेले होते. मीही दोन सीट सोडून वाहकाच्या समोरील सीट वर बसलो. लहानपणापासून खिडकीतली जागा माझ्या आवडीची !!!
निवांतपणे बसून येणारा गार वारा आणि पळणारी दृश्य बघून मनाला शांति मिळायची. आपण आणि आपलं मन मग त्या गतिमान दृश्याबरोबर खूप दूर जायचं. जेव्हा आपण आपल्या मनासोबत असतो तेव्हा खरं तर कोणाची गरज भासत नाही. आपलं मनच आपल सोबती असतं. कित्येक चांगल्या वाईट विचारांचं वादळ मनात उठलेल असतं आणि त्या सर्व विचारांना आपणच साक्षीदार असतो.
आपण जर स्वतः मध्ये बघितलं तर आपल्याला बाहेर काही शोधायची गरजच भासत नाही. आपणच आपले वकील आणि आपणच स्वतः गुन्हेगार !!!
या प्रवासात एस टी केव्हा संगमनेर जवळ आली ते समजलंच नाही. मधेच मला एक डुलकी पण लागून गेली होती. गाडी बऱ्याच ठिकाणी थांबायची आणि काही प्रवाश्यांची चढ उतर होई.
संगमनेर आता थोड्या अंतरावर राहील होतं. ढोलेवाडीचा थांबा आला आणि वाहकाने नेहमीप्रमाणे सिंगल बेल मारली. चालकाने गाडीचा वेग कमी करून गाडी हळूच थांब्याजवळ उभी करून ब्रेक मारले.
वाहकाने एका हाताने दरवाजा उघडून “चला, लवकर बसा” हे नेहमीच्या सवयीप्रमाणे वाक्य उच्चारले. सात ते आठ लोक असतील, सर्व जवळील खेड्यागावातील होते.
बारदान्याच्या पिशव्या घेतलेल्या जुन्या नऊवारी साडीतील बायका, पांढरं धोतर घातलेली माणसे गाडीत बसण्यासाठी दरवाजाकडे सरसावली. सर्वजण आलेले बघून वाहकाने दरवाजा बंद केला आणि डबल बेल दिली.
सगळे जण गाडीत बसण्यासाठी सोयीस्कर जागा शोधत होते. माझ्या अगदी उजव्या बाजूला मोठे तीन सीटचे बाकडे मोकळेच होते. पाठीमागून एक चाळीशीतील गृहस्थ हातात काठी घेऊन येतांना दिसला. मी जास्त लक्ष दिले नाही, बसमध्ये कित्येक प्रवासी उतरतात आणि चढत असतात. जवळ येऊन त्याने माझ्या समोरच्या मोठ्या सीटचा आधार घेतला आणि त्याच्या मुलांना आत बसायला सांगितलं. त्याची तीन मुलं सिट वर आत बसली. साधारण दोन वर्षाचे अंतर त्या तिघांमध्ये असेल, एक साधारण आठ वर्षाचा, दुसरा दहा तर तिसरा बारा वर्षाचा बहुदा असावा. त्यांचे वडील बाहेरच्या बाजूने आधार घेऊन शेजारी बसले.
डोक्यावर मळकट पांढरी टोपी आणि मळालेला शर्ट, पायजमा, पांढऱ्या दाढीची खुंटे वाढलेली, वयाची फक्त चाळीशी ओलांडलेली असेल पण चेहऱ्यावर वार्धक्य खूप दिसत होतं. माझ सहज लक्ष त्या तीन मुलांकडे गेले आणि माझा विश्वासच बसेना…
ती तीनही मुलं अंध होती…..!!!
मी अचबींतच झालो. वडिलांसहीत ती तीनही मुले शून्य नजरेनी बघून माझे डोळे पाणावले. क्षणभर मी निःशब्ध झालो होतो. मी आतल्या आत आवंढा गिळला. ते दृश्य बघून मला अगदी गहिवरून आलं. आधार काय असतो, हे दिसत नसतांना सुद्धा ते एकमेकांना आधार देऊन धरून बसले होते.
त्यांना काय विचारावे हेच मला कळेना. प्रारब्ध म्हणजे हेच का ? असा प्रश्न मीच मला विचारला. पुण्यांची कमाई आयुष्यात नक्की मिळते असे म्हणतात. मग यांची कमाई हीच होती का ? एखाद्याच्या आयुष्यात एवढंही दुःख येऊ नये की त्याची जगण्याची उमेदच नष्ट व्हावी…
मला खरोखर राहवत नव्हतं. त्यांच्याशी काय बोलावे हेच कळेना. “बाबा, ही तीनही मुले बघू शकत नाही का” ?
मी न राहून विचारले…. तसं माझ्या प्रश्नात काही वेगळ नव्हतं पण आपुलकी पोटी केलेली ती चौकशी होती. “होरे रे बाबा.. जन्मापासून तिघेही आंधळी आहेत. त्यांचं आणि माझं नशीबच फुटकं रे भाऊ. काय करणार”? बाबा उद्गारले .
मला खूप वाईट वाटले. मला माझ्या नशीबवान असण्याची जाणीव करून देणारे ते वाक्य होते. डोळे नसतांना हे जग पाहणे हा किती विरोधाभास होता, बुद्धीला हे पटतच नव्हतं. “बाबा, म्हणजे असं नेमक कसं घडलं ? माझ्या मनात प्रश्ननांचे वादळ उठले. बाबा सांगू लागले, “आम्ही दोघे नवरा बायको जन्मत:च आंधळी आहोत. आमचे लग्न झाले आणि वाटलं होतं वंशाचा दिवा असावा जो आमच्या जीवनात प्रकाश आणेल पण अजूनही आम्ही अंधारातच आहोत. आम्हीच यांच्या अंधःकाराला जबाबदार आहोत रे, दुसरे कोणी नाही.”
“आमचं पहिल्या पासून एकत्र कुटुंब !! त्यामुळे थोडी फार घरातील इतर नातेवाईकांची मदत मिळते. नाही तर आमचं जगणे अवघड झालं असतं. पहिल्या मुलाच्या अंधपणाने आम्ही खरंच खूप घाबरलो. वाटलं होत दुसरं आणि तिसरं मुलं तरी जग बघेल. पण त्यांच्याही आयुष्यात बघ ना काय लिहून ठेवलंय.” बाबा, या गोष्टी आपल्या हातात नसतात. परमेश्वराच्या हातात सर्व काही असतं. जे नशिबात असतं ते मिळते. मी त्यांच्याकडे बघून त्यांचं सांत्वन करत बोललो. त्यांच्या चेहऱ्यावर काळजीने भरलेला भाव मला जाणवत होता.
एवढ्यात वाहक जवळ आला “बोला, कुठं जायचं बाबा ?
तिकीट विचारतांनाच त्याच्याही लक्षात त्यांचे अंधत्वाचे स्वरूप आले. “भाऊ बाभळेश्वरला जायचं.” “किती तिकीट आहे “? वाहकाने विचारले. एका हाताने त्यांनी खिशातील नोट वर धरली. मनुष्य विकलांग जरी असला तरी स्वाभिमानी असला पाहिजे म्हणजे समाजात किंमत राहते व आदरही मिळतो.
“आम्ही चौघ आहोत साहेब…”. मुलांच्या वडिलांनी सांगितले. “बाबा मुलांना दिसत नाही वाटतं” वाहकाची नजर मुलांकडे गेली. “हो साहेब, आंधळी आहेत तिघेपण.” “बाबा, राहू द्या पैसे तुमच्याकडे.. मी काढतो सगळ्यांची तिकिटं” असं म्हणत त्यांनी पैसे परत दिले.
माणुसकी जिवंत असली की दुसऱ्याचं दुःख समजते. माणुसकी संपलेली असली की मनुष्य मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खायला सुद्धा कमी करत नाही.
या एवढ्या वेळात माझ्या मनात विचारानीं अगदी थैमान घातले होते. समुद्रात उंच लाटा उठाव्या आणि किनाऱ्यावर आदळाव्या तशी विचारांची शृंखला स्वस्थ बसू देईना. मी मलाच हात लावून तपासू लागलो.
परमेश्वराने दिलेले डोळे मला पहिले आठवले, संपूर्ण तंदुरुस्त शरीर मला दिले होते. कोणतही व्यंग माझ्याजवळ नव्हतं. निरोगी माणसाला आपल्या जवळ किती अनमोल गोष्टी परमेश्वराने दिल्या आहेत हे कधी दिसत नाही पण सर्व असून सुद्धा जे जवळ नाही त्या साठी मात्र तो रडत असतो हे अगदी खरं आहे.
आज त्यांना फक्त डोळे असावे एवढीच त्यांची इच्छा होती. सगळ्या गोष्टी एकदम मिळाल्या की त्याची जाणीव आणि महत्वही राहत नाही हे सत्य आहे. एवढ्यात कधी बाभळेश्वर चा स्टॉप आला मला कळलंच नाही.
“चला, बाभळेश्वर कोणी आहे का ? वाहकाने सिंगल बेल मारली. माझ्या समोर बसलेल्या चौघांची एकच घाई उडाली. त्यांचा तो रस्ता शोधण्याची धडपड पाहून खूप वाईट वाटले, जीवनाच्या प्रत्येक वाटेवर त्यांना अशी धडपड करायची होती.
माझा हात नकळत माझ्या पाकिटाकडे गेला. पाकिटातून पन्नास रुपयांची नोट काढून बाबांच्या हातावर ठेवली.
त्यांनी ती नोट स्पर्श होताच अलगद मूठ उघडून हातात घेतली. मला खूप बरे वाटले. त्यांनी तीच मूठ माझ्या डोक्यावर ठेवत, “कल्याण होईल तुझे ” असा अंतकरणा पासून आशीर्वाद दिला. असे निरपेक्ष आणि प्रामाणिक माणसाकडून मिळालेले आशिर्वाद खरे ठरतात असे म्हणतात.
मला तो आशीर्वाद आणि डोक्यावर ठेवलेला हात आजही आठवतो, पण एक सत्य आहे पुन्हा कधी कोणती गोष्ट कमी पडली नाही आणि आयुष्यात खरोखर कल्याण होतं गेले. दिलेले आशिर्वाद कामी येतात फक्त ते अंतकरणा पासून दिलेले हवेत..
माझं बघून, मग चालकाला पण दया आली. त्याचाही हात चामड्याच्या पिशवीत गेला आणि उतरणाऱ्या शेवटच्या मुलाच्या हातात दहा रुपयाची नोट ठेवत त्यांना खाली उतरू दिले आणि दरवाजा बंद करून डबल बेल मारली.
मी त्यांना नजरेआड होईपर्यंत पाहत होतो, एका रांगेत चौघेजण काठीला धरून रस्ता उतरले आणि नजरेआड गेले. एक छोटासा काही तासांचा हा प्रवासातील व्यक्ती अनुभव होता पण खूप काही जीवनाबद्दल शिकवून गेला, सांगून गेला.
आज कित्येक वर्षांनी पुन्हा तो प्रसंग आठवला की पहिला प्रश्न पडतो काय परिस्थिती असेल त्या चौघांची ?
कोठे असतील ते आता ? जीवन जगत असतील की जग बघत असतील ? कोणी डोळे दान केले असतील का त्यांना ?

– लेखन : प्रकाश फासाटे. मोरोक्को (नॉर्थ आफ्रिका)
– संपादन: देवेंद्र भुजबळ 9869484800

अतिसंवेदनशील कथा आहे. खुप काही सांगून जाते ही कथा. धन्यवाद.
प्रकाश ने विचार करायला लावणारा अनुभव शब्दबद्ध केला आहे. काल दिवसभर ती गोष्ट डोक्यात घर करून बसली होती . त्या कुटुंबाचा विचार डोक्यातून जात न्हवता. अत्यंत बेचैन होतो. शेवटी मनाची समजूत घातली की कदाचित ही गोष्ट सत्यघटनेवर आधारित नसावी. म्हणून मग शेवटी प्रकाशलाच विचारले की गोष्ट खरी आहे की काल्पनिक. उत्तर अपेक्षित होतेच की गोष्ट खरी आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्याने तेच उत्तर दिले.
डोक्याला झिनझीण्या आणणारे लिहिले आहेस प्रकाश तू. वाचताना अक्षरशः आपण त्या गोष्टी चा एक भाग कधी होऊन जातो तेच कळत नाही.
आपण सर्वच कधीना कधी आशा प्रसंगाचे एक मूक साक्षिदार असतो पण तो प्रसंग स्वतःला अलिप्त ठेवून लिखाणाच्या कोंडनातून मांडणे खूप अवघड असते. प्रकाश ने ते शिवधनुष्य लीलया पेलले आहे.
🙏🙏🙏🙏🙏
khup dhanyvad shailesh
Thank you for reading.
हृदयस्पर्शी कथा. संपूर्ण कुटुंब अंध असणं ह्या पेक्षा मोठं दुर्दैव नाही.श्रीयुत फासाटे तुम्ही
तुमच्या लेखाद्वारे, नेत्रदानाची किती गरज आहे
ह्याची जाणीव करून दिलीत.
aplya pratikiryebaddal khup abhar…
खरं आहे.
dhanyvad sir
खूपच हृदयस्पर्शी कथा
dhnayvad sir.
खुप छान….