(अष्टाक्षरी कविता)
किती सुंदर तळवे
माझ्या मनाचे मंदिर
माझी इवली पाऊले
त्यांना जगण्याचा धीर
नाही मळ तो पायाला
कष्ट केले त्याचे ठसे
भेगा पडल्यात जरी
तरी बाप माझा हसे
त्यास झालेली जखम
रोज झाकतो मातीने
अनवाणीच चालतो
किती निधड्या छातीने
शेतामध्ये बाप माझा
गातो तुक्याचा अभंग
नाही दैववादी झाला
सदा कष्टातच दंग
सान डोळ्यांनी पाहतो
स्वप्न भविष्याचे छान
बाबा बांधीन पंढरी
तुला विठ्ठलाचा मान
— रचना : यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे. बदलापूर, जि.ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
,👌👌👌👌 छान रचना