Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्यबाबासाहेब : काही कविता

बाबासाहेब : काही कविता

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा, जीवनाचा गौरव करणाऱ्या काही कविता पुढे देत आहे.
बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.
– संपादक

१). वंदन विश्वभीमाच्या चरणी ……
भीम माझा महामेरू प्रबोधनाचा,
त्राता पददलितांचा,
विसावा अवघ्या मानवजातीचा ;
सर्वहारा माणसाचा श्वास
मानवतेचा विश्वास
नवनिर्मितीचा ध्यास;
वंदन विश्वभीमाच्या चरणी…….

२). दिले तुम्ही महासंविधान –
स्वातंत्र्याला आकार दिला,
गाडले अमानुष जातीयतेला ,
मतपेटीतून फुलली रक्तहीन क्रांती ,
बसली भारत भूवर शांती ,
दिले तुम्ही महासंविधान
समतेच्या शिंपल्यात
नवयानाचा मोती !
– रचना : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.

३). सारथी बहुजनांचे
भीम सारथी बहुजनांचे,
अमूल्य कीर्तीस नाही माप.
दीनदुबळे गरिबांचेच,
असे भीमराव मायबाप.

शांतता समता बंधुभाव,
केला भिमरावांनी निर्माण .
उच्च ज्ञान धन कुबेराचे,
दिले भिमाने हे वरदान .

भीमराव सूर्य जन्मा आला,
तेजप्रकाश ज्योत घेऊन.
देशाची उंच वाढवून शान,
भिमांनी लिहिले संविधान.

जातीयवादासाठी भिमाने,
काळाशीच केले दोन हात.
धन्य माय माऊली रमाई,
दिली जीवनभर भिमाला साथ.

भीम ज्ञानसागर होऊनी,
कायद्याच्या अभ्यासक झाले.
विश्वरत्न डॉ. आंबेडकर,
महामानव जन्मास आले.
– रचना : सौ भारती वाघमारे. मंचर

४). महानायक
तूच महामानव।तूच महानायक।
तू असे क्रांतीसूर्य। बहिष्कृतांचा उद्धारक।

तू ज्ञानवंत मनोज्ञ। स्त्रियांचा मुक्तीदाता।
मानवतेचा कैवारी। कनिष्ठांचा ऊद्गाता।

भासली मनुस्मृती ।असमानतेची धुळवड।
करुनी तिचे दहन।भरली स्त्रीमुक्तीची कावड।

केली धडपड। क्षणभर नसे विराम
जागा करावया।हिंदुह्रदयीचा राम।

लढा समतेचा। लढा मानव्याचा
सत्याग्रह चवदार। हक्क पाण्याचा।

दुराग्रही इमारतीला। विचारांचा सुरुंग
धडधडलाआणि।फोडला धर्माचा तुरुंग।

काढली कवचे ।हिंदु धर्माची
स्वीकारला धम्म। जिथे चाड शूद्राची।

ओळख भीमाची। घटनेचा शिल्पकार
वंदन महामानवा। तूच समतेचा चित्रकार।।
– रचना: सौ.राधिका भांडारकर. पुणे

५) बाबा साहेब
बाबा साहेब बाबा साहेब कसं सोसं हुई तम्ही
घटना तुम्हीज लिखी नि तुमलेज नही हमी
कसा अन्याव अन्याव जीव बई जास मना
कसा करा हुई तुमी असा अन्याव सामना…

जात नही तिले लोक म्हनतसं बरं”जात”
कसं “परमनंट”तिन देखा उघडी गे खातं
अजूनबी जात नही अशी कशी से “लाव्हरी”
मनमनंमां पसरे अशी कशी से जहरी …

गंज वाटस वाईट काय करो तो उपाय
गरिबीना चटकाम्हा रमा मरी गयी माय
गंज काढात हाल नि तुम्ही शिकनात दूर
नही दिसना कोनले तिना आसूसना पूर …

करात उपकार तुम्ही बठ्ठ पचाडं ते ईख
भजी ऱ्हायना अजून याद करस हो देस
नही फिटाव तुमनं देसवरनं हो रीन
तुमना सारखा निपजी आते सांगा बरं कोन ?
– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक

६). अखेर तुलाच दैवत्व बहाल केलं
एक जमाव
एषोआरामाच्या गाडयातून
उंच पताका फडकावीत आला
आणि फुलांची उधळण करीत
‘अमर रहे’च्या घोषणांमध्ये
तुझ्या समोर मेणबत्त्या पेटवत निघून गेला.

दुसरा जथ्था
तुझेच नाव ओठात घेत
परिवर्तन एल्गाराच्या घोषणा देताना
मिळेल त्या प्रवाहाबरोबर वाहत गेला

तिसरा घोळका तर
तुझं मंदिर बांधण्याची भाषा बोलू लागला
तुझ्या नावाची घोषणा देताना
मी पण तेव्हा यातलाच होऊन गेलो होतो
पण अशावेळी तुझ्या पायावर माथा टेकवताना
तुझ्या भारदस्त बुटांनी
का लाथाडले नाहीस मला भरचौकात
तुला ‘देव’ बनवून टाकले म्हणून ?

तुला तर मान्यच नव्हतं
पूजाआर्चा करणं
धर्माचं पारंपरिक आचरण करणं
तरीही माझ्या घरात
बुद्धांसोबत तुला हारतुरे घालताना
अगरबत्ती, मेणबत्त्या पेटवून
तुला ओवाळूनही घेतलं.

तू नाकरलास ईश्वर
तू नाकारलास कुणालाही दैवत्व बहाल करणे
तू नाकारलीस व्यक्ती पूजा
तू माणसाला माणूस म्हणायला शिकवलं
आणि एखाद्याच्या अफाट गुणवत्तेच्या बुद्धीचा आदर बाळगायलाही

तरी तुला आम्ही
मखरात बसवलं
तुझ्याच प्रतिमेची पूजा करून
ईश्वराचीही उपासना केली
माफ कर,
खरंच माफ कर
जय भीम म्हणता म्हणता
अखेर तुलाच दैवत्व बहाल केलं!
– रचना : प्रकाश जाधव. विरार

७). भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त “शब्दांजली
महामानव भिमरायांना करू वंदन
लोकोद्धारासाठी त्यांनी वेचिले जीवन।।ध्रु।।

बुद्ध धर्म स्वीकारून आदर्श जीवन
चळवळीने करती जनजागरण
वंचितांना विश्वास राहे मिळे सन्मान।।1।।

संस्कृती सांभाळती आदरच राखून
द्रष्टे अन्याय्य रूढींचा बिमोड करून
सार्वभौम बंधुत्व जपण्या शिकवण।।2।।

भारताची लोकशाही केली बलवान
प्रसंगात”घटना” करी मार्गदर्शन
विश्वात भारतीय घटनेचा सन्मान।।3।।

गरिबांचे दुःख जाणती आसू पुसून
शिक्षणाची महती सर्वांना पटवून
अन्याया विरुद्ध करती भीम गर्जन।।4।।

लेखणी वाणी तेज असे सूर्या समान
मिळाले त्यांना मरणोत्तर भारतरत्न
त्यांचे विचार सदा प्रेरणा स्फूर्ती पूर्ण।।5।।
काव्य: अरुण गांगल कर्जत- रायगड

८). बदल
हा वसा नी हा कळवळा,
घेतो तो, माणूस हो वेगळा,
खचलेल्या, पिचलेल्यांसाठी,
त्याचा संघर्षही हो आगळा,

कित्येकदा तो सतत बोलला,
शिकण्याचा तो मंत्रही दिला,
मोठे सन्मानीत व्हा म्हटला,
अति सामान्यांसाठी झिजला,

कळण्यासाठी वर्षे सरली,
काहींनी शिकून सादही दिली,
कित्येकांची मने बदलली,
जगण्याचा आनंद दाटला,

हळूहळू ती पहाट झाली,
शिकून मुले शहाणी झाली,
समाधान ते वाटले भारी,
बघा बघा, नवा सूर गवसला,

सन्मानाने जगता येते,
आता हवे ते करता येते,
समाजासवे जगता येते,
क्रांती झाली, नूर बदलला..!!!
– रचना : हेमंत भिडे. जळगाव

९). विश्वरत्न
भारताचा पाया,माझा भिमराया
विश्वरत्न पिता, लोकशाही पाया |धृ|

समाज सुधारी,तो विचारवंत
संविधान रची, देश भाग्यवंत
प्रजाहितदक्ष,रमाईचा राया
विश्वरत्न पिता, लोकशाही पाया/१/

अर्थ तज्ञ झाले, महा शिल्पकार
महामानवाला, शत: नमस्कार
चंदना समान, झिजून दे माया
विश्वरत्न पिता, लोकशाही पाया/२/

कायदे पंडित, झाले किल्लेदार
जनतेला दिले, तळे चवदार
अस्पृश्य दीनांना, दिली छत्र छाया
विश्वरत्न पिता, लोकशाही पाया/३/

स्पर्शाचा परीस, अंधकार सरे
सोनिया समान, दीनांना उद्धारे
शिकवण व्यर्थ, जाय न सदया
विश्वरत्न पिता, लोकशाही पाया/४/

शांतीचा संदेश, देशोदेशी देती
भारताचे रत्न, नमे शारदेशी
प्रेरणा आपुली, जागृती कराया
विश्वरत्न पिता, लोकशाही पाया/५/
– रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?