Monday, September 1, 2025
Homeलेखबैलपोळा

बैलपोळा

आज बैलपोळा आहे. त्या निमित्ताने या सणाचे महत्व सांगणारा हा लेख. सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

“माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब, जाईजुई, मोगरा फुलवीतं..”

दुरून कुठून तरी कानावर हे गोड, अजरामर गाण्याचे मंजुळ स्वर आले आणि मन एकदम बालपणात गेलं. गावाकडील शेतातील विहिरीजवळ मोठ्ठया आंब्याच्या झाडाखाली सावलीत तासनतास बसून हिरव्यागार मळ्यात वाऱ्याच्या छोट्याशा झुळूकीच्या तालावर ती डोलणारी, नाचणारी नाजूक रंगीबेरंगी फुले, पाने पाहताना मन कसे हरखून जायचे ! बाजूलाच असलेल्या मोठ्ठ्या दगडी विहीरीवर असलेल्या भक्कम लाकडी रहाटावर लावलेल्या मजबूत दोराला बांधलेला मोट, त्याला जुंपलेला “सर्जाराजा” आठवला की इतके मस्त वाटते ! त्याने पाण्याने भरलेली मोट ओढतानाचा तो लयबद्ध आवाज अजूनही कानात घुमतोय. ती पाण्याने गच्च भरलेली मोट जेंव्हा पाटात भराभर रिकामी होते तेंव्हा मला जणु भगीरथाने स्वर्गातून भुलोकी आणलेल्या गंगेचा भास व्हायचा खळखळ आवाजामुळे. आता त्याजागी इंजिन बसवले पण ते चित्र मात्र अजूनही तसेंच जिवंत आहे अजून मनात.

खरे सांगू का, त्यावेळी सर्जाराजाचे कष्ट थोडेसे कमी झाले म्हणून मला खूप आनंद झाला होता. या शेतात येतानासुद्धा उंच्यापुऱ्या, पांढऱ्याशुभ्र जीवा आणि शिवाची खिल्लारी बैलांची जोडी सुंदर गाडीला जोडलेली असायची. त्यात बसून त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा खुळखुळ आवाज ऐकत ऐकत येताना खूप मज्जा यायची पण पाठीचा खुळखुळाही व्हायचा. आता त्यांची जागा जीप, गाड्यांनी घेतली. शेतातील कामातील बलरामाच्या नांगराची जागा ट्रॅक्टरने, अत्याधुनिक यंत्रांनी घेतली खरी, पण काळीभोर माती नांगरणारी ढवळ्या-पवळ्याची जोडी अजूनही मनात घर करून आहे.

बदलत्या काळानुसार आता रंगीत बैलगाड्या, बैल या गोष्टी बऱ्याच ठिकाणी विशेषतः गावाबाहेरील ढाबे, हॉटेल्स बाहेर रंगवून ठेवलेल्या दिसतात. पूर्वीपासूनच लग्नातील रुखवतात बैलगाड्यात सर्व धान्यांची छोटी छोटी पोती करून ती भरून लेकीला देण्याची प्रथा मात्र अजूनही बरेच ठिकाणी दिसते, ते पाहून मन सुखावते.

हल्ली मोठमोठ्या रिसॉर्ट्स मध्ये खास आकर्षण म्हणून, खेड्यातील आनंद मिळावा म्हणून भेटीस आलेल्या लोकांना या बैलगाडीतून चक्कर मारली जाते. त्यासाठी अजूनही बैलांना काम मिळते आहे याचा आनंद वाटतो. कारण कष्ट करणाऱ्याना आयते बसून खाणे ही खरंच शिक्षाच वाटते.

आपली भारतीय संस्कृती ही अनेक धार्मिक, सांस्कृतिक परंपरा जतन करत सणवार, उत्सव साजरा करण्यासाठी अवघ्या विश्वात प्रसिद्ध आहे. यात धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक उत्सवांसोबत सर्वांत महत्वाचे म्हणजे भावनांना विशेष महत्व देते. म्हणूनच निसर्ग, त्यातील असंख्य रूपांची म्हणजेच अगदी माती पासून त्यात उगवणाऱ्या धान्याचे, पशु पक्षी.. प्राणीमात्रांचेही महत्व ओळखून त्यांच्या विषयी आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही अनेक उत्सव तितक्याच श्रद्धेने धुमधडाक्यात, मनापासून साजरे करतात. जसे मातीपासून बनलेल्या सुगडांची संक्रांतीला पूजा करतात. कोणत्याही धार्मिक कार्याची सुरुवात कलश पूजनाने केली जाते. म्हणजेच त्यात मातीचा किंवा धातूचा घट, त्यात आंब्याची किंवा विड्याची पाने म्हणजेच निसर्गातीलच पानांची, त्यात घातलेल्या पाणी म्हणजेच जीवनाची पूजा केली जाते.

भारतीय संस्कृतीत अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यापैकीच आपल्या मातीतील प्राण्याशी निगडित एक सण म्हणजे बेंदूर. अन्नधान्य पिकवून आपले पोट भरून, सर्व गरजा भागवणाऱ्या या मुक्याप्राण्याचे आभार मानावे तितके कमीच ! शिवाय बैल हे शेतकऱ्यांच्या शेतीकामात एक अविभाज्य घटक आहेत. ते शेतीची नांगरट, पेरणी, कापणी अशा अनेक कामांमध्ये मदत करतात. त्यामुळे, बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या सणाचा मुख्य उद्देश आहे.

महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दिवशी साजरा केला जातो. मात्र, प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे पाहायला मिळते.

मनुष्य हा मुळातच भावनाप्रधान असल्यामुळे वर्षभर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी राबणाऱ्या बैलांना देवासामान समजून बेंदूर किंवा पोळा या सणाला विशेष महत्व दिले जाते. शहरात मातीचे किंवा लाकडी बैल बनवून त्यांची पूजा करतात. तर खेडेगावात त्यादिवशी बैलांना तेलाने मसाज करतात. नंतर छान आंघोळ घालून त्यांना रंगीबेरंगी रंगानी नटवतात. शिंगे रंगवतात. त्यांना फुलांचे हार, माळा, घुंगरू, नक्शीद झुल घालतात. त्या दिवशी त्यांना कामातून पूर्ण विश्रांती दिली जाते. कणकेचे उंडे, पुरणपोळी आणि अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवून प्रेमाने जेवायला घालतात. त्यांना वंदन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. नंतर त्यांची मिरवणुकीत काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. रांगोळ्या काढतात. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन केले जाते. त्यासाठी कुस्तीतील पैलवानांना जसे चांगला खुराक देऊन, त्यांना प्रशिक्षण देऊन, कसरती करवून कुस्तीसाठी तयार केले जाते अगदी तसेंच बैल या मानाच्या स्पर्धेसाठी तयार केले जातात. खूप प्रेक्षणीय आणि थरारक अशा या स्पर्धा असल्यामुळे लोक खूप आतुर असतात पाहण्यासाठी. गेल्या काही वर्षात या स्पर्धामध्ये बरेच अपघात,हानी होत असल्यामुळे बंदी आणली होती. त्यामुळे खूप लोक नाराज झाले होते. पण आता काही नियम घालून पुन्हा या स्पर्धाना परवानगी मिळाली असल्याने लोकांत उत्साह संचारला आहे.

प्रचंड ताकद, मेहनती अशी ही बैलांची ओळख ! आता मात्र ते नन्दिबैल म्हणुन लहान मोठ्या गावातुन नटुन सजुन गुबुगुबु करत, भविष्य सांगून लोकांचे मनोरंजन करताना दिसतात याची कधी खंतही वाटते, पण वाढती लोकसंख्या, त्यांच्या गरजा यांचा विचार करता आधुनिक तंत्रज्ञान ही आज काळाची गरज आहे ती ओळखून प्रगतीसाठी काही गोष्टी बदलाव्या लागतातच. त्यामुळे आजची नवीन पिढी ही शेती संपूर्णपणे आधुनिक साधने, बी बियाणे, सेंद्रिय रासायनिक खते, रोपे, कलमे, पाण्यासाठी स्प्रिंकलर्स, पाईप, मळणीयंत्रासारखी अनेक अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून कमीतकमी वेळात जास्तीतजास्त आणि दर्जेदार उत्पन्न निर्माण करत आहे आणि ते आता परदेशातसुद्धा निर्यात करत आहे. त्यादृष्टीने याची गरज आहेच.
तरीही बळीराजांच्या नवीन पिढ्या आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत असूनसुद्धा अजूनही त्याच श्रद्धेने आपल्या पूर्वजांना धनधान्य देणाऱ्या बैलांची आठवण जतन करते आहे याचे खरोखर कौतुक वाटते आणि अभिमानही वाटतो.

हा सण बैलांच्या कष्टाचा आणि योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे याचे अजूनही लोकांना स्मरण, भान आहे हीच भारतीय संस्कृतीची खरी जीत आहे. संस्कृतीचा हा वारसा असाच पुढील पिढीतही अखंडीत सुरु रहावा हिच सदिच्छा.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments