सत्संगाची जादू
नदीच्या किनारी वसलेले हे गाव. निसर्गाचे वरदान लाभलेले हे गाव. अतिशय सुंदर.पण या गावात सतत भांडण, मारा मारी, खून, चोरी, अत्याचार त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक भीतीने फिरकत ही नसत.
आणि अचानक वर्षभराने हे गाव आदर्श गाव म्हणून सन्मानित केले गेले. कसा हा चमत्कार झाला असेल.? अनेक प्रश्न ? कुतूहल….. विचारपूस केल्यावर कळाले की हा सर्व सत्संगाचा प्रभाव आहे.
वर्षांपूर्वी एक महाराज या गावात रहायला आले. सर्व परिस्थिती लक्षात आल्यावर आपण काही तरी केले पाहिजे, असे त्यांना दृढपणे वाटले. हे गाव सुधारण्याचा त्यांनी देवीच्या मंदिरात संकल्प केला व लागले कामाला.
सुरवातीला अनेक हाल सहन करावे लागले. अनेकांनी खूप त्रास दिला अवहेलना केली, अपमानित केलं, छळ केले, मारले देखील. पण अतिशय शांत, संयमी स्वभाव असल्याने त्यांनी सर्व सहन केले. ते हारले नाही. घाबरले देखील नाही. कारण नितांत श्रद्धा होती परमेश्वरावर की एक दिवस हे नक्की बदलेल.
गावात देवीचे भव्य दिव्य मंदिर होते. सर्व गावकऱ्यांची या ग्रामदेवतांवर नितांत श्रद्धा व भक्ती. वृद्धपकाळाने त्या मंदिरातील पुजारी मरण पावला होता. त्यामुळे आता ही जबाबदारी कोणावर सोपवावी हा मोठा प्रश्न पडला. सर्वांच्या सहमतीने मंदिराची देखभाल व पूजा अर्चा करण्याचे जबाबदारी या महाराजांना देऊन पहावे असे ठरले, कारण अनेक महिन्यांपासून ते महाराज मंदिराची देखभाल करण्यात पुजाऱ्यांना मदत करत होतेच.
या संधीने महाराजांना जणू परमेश्वराने दिशा दाखवली आणि महाराजांनी या संधीचे सोने केले. नियमितपणे पूजा अर्चा, देव धर्म, आरती, पोथी – पारायण व जोडीला सर्व परिसर ते स्वच्छ ठेवत होते त्यामुळे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रसन्न वाटत असे.
हळू हळू रोज गोष्टीच्या रूपाने महाराज सत्संग करू लागले. सुरवातीला जेमतेम तीन चार जण असायचे. मात्र त्यांनी धीर सोडला नाही. चाराचे दहा लोक झाले. असे करता करता देवाचा गाभारा लोकांच्या गर्दीने भरून गेला.
महाराज संतांचे महत्व, त्यांचे मोलाचे कार्य, देव देवतांच्या गोष्टी सांगू लागले. धारधार आवातील गोष्टी, भक्ती गीत, भजन – कीर्तन, अभंग जणू भक्तीचा सागर जेथे रोज सर्व गावकरी आनंद घेत होते.
असे वाटे की स्वयं सरस्वतीचे वात्सव्य महाराजांना लाभले आहे एक अद्भुत चुंबकीय शक्ती आता तर आजूबाजूच्या गावातील लोक पण सत्संगाचा आनंद घेत होते.
गावातील दूषित वातावरण पूर्णपणे बदलून गेले. अध्यात्माचे महत्व एक सकारात्मक ऊर्जा त्यामुळे गावकऱ्यांच्या स्वभावात परिवर्तन झाले.
महाराजांचा संदेश लोकांना जगण्याचा बळ देत होता. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. महाराज्यांच्या बोलण्याचा लोकांच्या मनावर परिणाम होऊ लागला.
श्रीरामाच्या गोष्टी, भागवत गीता, देवी देवतांचे महत्व हे सर्व अशा पद्धतीने सांगत होते की लोक मंत्रमुग्ध होऊ आवर्जून रोज ऐकायला येत होते. लोकांना त्यांच्या सत्संगाची गोडी व ओढ लागली होते.
सर्व गावकऱ्यांना महाराजांचे महत्व, त्यांची हुशारी, प्रामाणिकपणा याचा जणू बोध झाला होता. त्यांना गावात आदराचे स्थान मिळाले. ज्या गावकऱ्यांनी त्यांना खूप त्रास दिला होता त्यांनी पाय धरून माफी मागितली.
गावात आता अतिशय सकारात्मक परिवर्तन झाले होते. लोक खेळीमेळीचे राहू लागले एकमेकांना सहकार्य करत असे. मारा मारी , खून, चोरी सर्व वाईट कृत्ये आता हद्दपार झाली होती. गावात अतिशय प्रसन्न वातावरण झाले होते. एकमेकांचा आदर व प्रेम करत होते मनुष्यातील माणुसकी जपत होते.
गाव आधीपेक्षा स्वच्छ व सुंदर झाले होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत विचारांचे परिवर्तन झाले होते. हा चमत्कार घडवणारे केवळ महाराज होते याची जाणीव व प्रचित्ती गावकऱ्यांना अनेक वेळा आली होती.
एका भक्ताने प्रेमाने विचारले, “महाराज देव तर दिसत नाही मात्र त्या शक्तीची नेहमी जाणीव होते. प्रचिती देखील येते. मात्र परमेश्वराचे अस्तित्व नक्की कोठे आहे….? त्यांची कृपा आपल्या कुटुंबावर असावी यासाठी काय करावे ? त्या परमेश्वराचे अस्तित्व नक्की कोठे व कशात आहे ?”
महाराज म्हणाले, आज मी तुम्हाला कोणतीही कथा सांगणार नाही. तर आज आपण जाणून घेऊ परमेश्वराचे अस्तित्व…….
परमेश्वराची अदृश्य शक्ती आपल्या मना मनात आहे. आपल्या हृदयात आहे.या पवित्र गाभाऱ्यात आहे. आपल्या आईवडिलांमध्ये आहे. आपल्या कामातील प्रमाणिकपणात आहे. डॉक्टरांसाठी रुग्णांची सेवा करण्यात देव आहे. शिक्षकांसाठी ज्ञान दानात आहे. त्या भावी पिढीला घडवण्यात आहे.संसारी लोकांसाठी आपले कर्तव्य व जबाबदारी निभावण्यात देव आहे. राजकीय नेत्यांसाठी लोक सेवेत देव आहे. सैनिकांसाठी देशसेवेत आहे. व्यपाऱ्यांसाठी ग्राहक हा देव असतो.प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामात देव शोधला पाहिजे.प्रत्येक व्यक्तीसाठी त्या परमेश्वराचे रूप वेगळे आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव वेगळी आहे. तो प्रत्येक वेळी आपल्याला पाहत आहे हे आपण कायम कक्षात ठेवून आपले काम, आपले कर्म केले पाहिजे. आयुष्यात अनेक अडचणी येतात ज्यावेळी कोणाचीही साथ नसते.
जीव नकोसा होता. मन अतिशय हतबल होते. त्या वेळी अनपेक्षित कोणी तरी मदत करते. एक आशेची ज्योत निर्माण होते तेव्हा तो मनुष्याच्या रूपातील परमेश्वर वाटतो. भक्ती व श्रद्धा पाहिजे. जात पात, श्रीमंत – गरीब, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता जो मनापासून सेवा करतो आपले कर्तव्य चोख निभावतो तेथे देवाचे अस्तित्व आहे. परमेश्वर कणा कानात आहे. आपल्या मनात आहे. या मूर्तीत आहे. बाहेर पायरीवर बसलेल्या त्या माणसात देखील आहे. तुमच्या आमच्यात आहे आपल्या आजूबाजूने सगळीकडे तो आहे. तुम्ही अनेक व्रत केले. खूप पोथ्या पारायण केले. मात्र बाहेर लोकांना कठोर शब्दाने दुखावले, फसवले, चोरी केली, अत्याचार केले, घरातील लोकांना उपाशी ठेवले तर हे सर्व कार्य शून्य आहे. तुम्हाला वाटत असेल की परमेश्वराची कृपा आपल्या कुटुंबावर असावी आपले आयुष्य सुखी समाधानी असावे तर प्रथम आपली वृत्ती चांगली असावी. कोणाचे भले नाही केले तरी चालेल मात्र चुकूनही कोणाचे अहित करू नये. कट कारस्थाने रचू नये. कोणालाही फसवू नये. चांगुलपणाचा, भोळेपणाचा फायदा घेऊ नये. लुबाडू नये. घरातील स्त्रीचा सन्मान करावा. सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागावे. हा मनुष्य देह प्राप्त झाला त्याचा नक्की काय उद्देश आहे याचे उत्तर शोधले पाहिजे.
नेहमी स्वतःला नशीबवान समजावे की परमेश्वराने आपल्याला देणाऱ्यां मध्ये ठेवले आहे त्यासाठी त्याचे आभार मानावे. देव धर्म, दान धर्म करताना कधीही मोठेपणा अथवा दिखाऊपणा करू नये. कारण दान करताना या हाताचे त्या हातालाही कळता कामा नये. गोर गरिबांना, गरजूंना मदत करण्यात देवाचे अस्तित्व आहे. हा निसर्ग देवाची किमया आहे. अनमोल देणं आहे.तो जपण्यात देवाचे अस्तित्व आहे.थोडक्यात सर्व चांगल्या गोष्टीत देव आहे याची जाणीव ठेवून ते देवपण जपले पाहिजे.
आज महाराजांचा हेतू पूर्ण झाला होता. सर्वांना भरून आले होते. महाराजांचे शब्द हृदयाला स्पर्श करत होते.सर्व गाभाऱ्यातील भक्त मंडळी भावनिक झाले होते. अश्रूंना बांध फुटला होता .आज महाराजांनी एक मोलाची शिकवण दिली होती, जी आजन्म जपण्याची सर्वांनी देवीला साक्षी मानून शपथ घेतली. अध्यात्माच्या अदृश्य शक्तीची जाणीव झाली होती. केवळ एका व्यक्तीमुळे गावात परिवर्तन झाले होते. हे सोपे नव्हते ते एक आव्हान होते.
जेव्हा आपण कोणतेही चांगले काम करतो तेव्हा अनेक अडचणी येतात. मात्र अथक प्रयत्न, चिकाटी, जिद्द व ते काम पवित्र असेल, ज्यामध्ये समाजाचे हित असेल तर त्या कामाला परमेश्वराचे आशीर्वाद लाभते. आज भक्तांना महाराजांच्या रुपात परमेश्वराची जाणीव झाली होती. पण त्यांना माहीत नव्हते की महाराज उद्यापासून दिसणार नाही कारण त्यांचे या गावातील कार्य संपले होते. ते दुसऱ्या दिवशी पहाटेच दुसऱ्या गावाकडे निघाले होते……

— लेखन : रश्मी हेडे. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
सत्संगाची जादू अनोखी.