चालेल जरी धरीला अबोला
चालेल जरी केला काणाडोळा
चालेल जरी दुरावा केला
लांबून पाहत राही, मला विरह नको ग बाई !
भले जरी मजला हाणीले
डोळ्यांत पाणी हे आणीले
तरी तुम्हांस अपुले मानीले
तुम्हीच सर्वकाही, मला विरह नको ग बाई !
छंद मला तुमचाच लागे
मन धावते तुमच्याच मागे
गत जन्मीचे जुळले धागे
कुठली ही पुण्याई, मला विरह नको ग बाई !
कुणी म्हणे, ही पागल झाली
कुणी म्हणे, कामातून गेली
कुणी म्हणे, ही करणी केली
तगमग जीवाची होई, मला विरह नको ग बाई !
अरे माझ्या देवा ! माझ्या ईश्वरा !
दासीचे म्हणणे ऐका जरा
पायी तुमच्या द्यावा आसरा
दुसरे मागणे नाही, मला विरह नको ग बाई !
— रचना : डाॅ. श्रीनिवास आठल्ये. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800