अभंग ते मुक्तकाव्य लिहिणारे मराठी साहित्यातील भावकवी अशी ख्याती असलेले बाळकृष्ण भगवंत बोरकर तथा बाकीबाब यांचा आज, ८ जुलै रोजी स्मृतीदिन. त्या निमित्त गोव्यातील प्रख्यात गझलकार, पत्रकार आणि समीक्षक श्री प्रकाश क्षीरसागर यांनी त्यांना वाहिलेली शब्द सुमनांजली….
बाळकृष्ण भगवंत बोरकर तथा बाकीबाब म्हणजे मराठी साहित्याचे भूषण. माझ्या गोव्याच्या भूमीत ही कविता असो किंवा त्यांची स्वतःच्या घराविषयीची कविता असो. हिरवळ आणिक पाणी तेथे मजला सुचती गाणी असे म्हणणारे बाकीबाब. लहानपणापासून कवितेचे षौकिन. जीवनाच्या सर्व अंगांचा परिपूर्णपणे आस्वाद घेणारे बा. भ. बोरकर निसर्गात इतके रमून गेले होते की हा निसर्ग त्यांच्या कवितांतून रसरसून आणि समरसून आला आहे.
बा. भ. बोरकर हे प्रेमरसायनातही तितकेच बुडून गेलेले तरल हृदयाचे कवी होते. त्यांच्या नसानसांत कवीता होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बालवयात त्यांच्या अंगी काव्यगुण ओतप्रोत भरलेले होते. त्यांच्या घरात रोज संध्याकाळी आरती होत असे. आरतीनंतर अभंगांचे गायन केले जाई. रोज आळीपाळीने एकेक सदस्य अभंग म्हणत.
एकदा बाकीबाबवर अभंग म्हणण्याची पाळी होती. त्यांनी पहाटे उठून एक अभंगरचना स्वतःच केली. अभंगरचनेच्या खाली बाकी म्हणे असे लिहिले. तुका म्हणे, नामा म्हणे अशी नाममुद्रा संत आपल्या अभंगाच्या शेवटी लिहीत. तशी आपल्या नावाची बाकी म्हणे ही नाममुद्रा त्यांनी उमटवली. त्यांना घरात बाकी असे टोपणनावाने हाक मारीत.
बाकीने स्वतः रचना केल्याचे शपथेवर सांगितले तरी कुणाचा त्यावर विश्वास बसला नाही. त्यांच्या आजीने तर ही संतांच्या अभंगाची चोरी आहे, ते पाप आहे. दुसऱ्याचे अभंग आपल्या नावावर खपवू नयेत, असे बाकीबाबना आजीने सांगितले. आणि अशी अभंगरचना आयुष्यात करणार नाही, अशी शपथ घ्यायला लावली.
परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते. निसर्गाची वेदना आणि सुखाची भावना त्यांच्या कडून कवितेतून नियतीला लिहून घ्यायची होती. अशा प्रकारे नियतीने एका कवीचा जन्म घडवून आणला. नियती केव्हा काय घडवील आणि बिघडवील याचा काही नेम सांगता येत नाही. आयुष्यभर लेखन न करण्याचा निश्चय केलेले बाकीबाब मोठे कवी झाले हे सर्वज्ञात आहे. मराठी कवितेत त्यांचं नाव अजरामर झाले आहे.

त्याकाळात रविकिरण मंडळ आणि भा. रा. तांबे, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज असे गेय कवी फॉर्मात होते. या मांदियाळीतील कवींचा त्या काळी नव्याने लेखन करणारे ग. दि. माडगुळकर, शांताबाई शेळके, कृ. ब. निकुंब यांच्यावर प्रभाव पडणे शक्य होते. बा. भ. बोरकर यांचे दैवत म्हणजे भा. रा. तांबे. तांब्यांच्या कवितांचा बाकीबाबवर सुरुवातीच्या काळात खूप प्रभाव होता.
बाकीबाबंच्या कवितांत वैविध्य होते. त्यांनी वृत्तांत कविता लिहिल्या बहुतेक कविता गेय आहेत.
निसर्गकवितांप्रमाणे त्यांच्या प्रेमकविताही खूप गाजल्या. त्यांच्या आध्यात्मिक कवितांनी रसिकमनावर मोहिनी घातली होती.
बोरकरांनी काही हिंदी कविताही लिहिल्या. मुंबई, पणजी आकाशवाणीवर ते काम करीत असताना त्यांनी अनेक गोमंतकीय गायकांना संधी दिली.
निळे निळे पाखरू सकाळच्या गं पारा हे गीत कोंकणीत आणि नंतर मराठीमध्येही गाजलेय. त्यांची आणखी एक दोन भाषांतील गीत म्हणजे त्या दिसा वडाकडेन (पांयजणां) हे गीत खूप लोकप्रिय झाले.
जितेंद्र अभिषेकी यांनी खूप आर्ततेने त्यांची गीते गायली. नंतर अजित कडकडे यांनीदेखील या गीतांना अजरामर केले. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी अशी भक्तिपर किंवा आध्यात्मिक गीतांनीदेखील रसिक मनाला मोहिनी घातली होती.
‘तू गेल्यावर’ ही त्यांची कविता खूप वेगळ्या धर्तीची आहे. आपली पत्नी चार दिवस माहेरी गेली तर सगळ्या घराची जी अवस्था होते, घरातील सर्व मानवी आणि मुकी प्राणी किती दीनवाणी होतात, एवढेच काय दारातील व अंगणातील झाडे देखील गृहिणीच्या विरहाने किती सुकली आहेत, याचे वर्णन त्यांनी इतके समरसून केले आहे, की प्रत्येक वाचकाला ती आपलीच भावना वाटते.
बाकीबाब बोरकर आपल्या मूळ गावाचे नावही खूपच महान मानतात. राम मनोहर लोहियांच्या भाषणाने प्रेरित होऊन आणि कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने मंगळवार हे गीत क्रांतिसाठी लोकांना पेटविण्याच्या हेतूने त्यांनी लिहिले. सरकारी नोकरीवर लाथ मारून ते स्वातंत्र्यलढ्यात उतरले. त्यांनी आपल्या कुटुंबांचीही पर्वा केली नाही. ते कवी असूनही स्वातंत्र्यसेनानी झाले.
त्यांची अनेक रूपे आहेत. जी वाचकांना अपरिचित आहेत. एवढे असूनही ते एक कुटुंबवत्सल असे गृहस्थ होते. त्यांनी खऱ्या अर्थाने गृहस्थाश्रम सांभाळला. अशा या थोर गोमंतक पुत्रास विनम्र अभिवादन.
– लेखन : प्रकाश रामचंद्र क्षीरसागर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.