दुर्मिळ ऐशी देई शांतता सदा मला हे स्थळ,
ऐकू न येई इथे जगाचा कर्कश कोलाहल,
व्याप जगाचा विसराया मी येई इथे सत्वर
अर्ध्या मिटल्या नयनी बघते स्वप्ने अति सुंदर !
शांतविले मी तप्त जीवाला इथे कितीदा तरी ;
कितीदा यावे तरी येथली अवीट ही माधुरी !
किती सुंदर ओळी ! ह्या ओळीत कवयित्री वर्णिते आहे एक स्थळ, जिथे गेल्यावर तिचा व्याकूळ जीव शांत होतो.
ह्या ओळी मी देखील अनुभवते मात्र ह्या ओळींमधला ‘इथे’ म्हणजे माझ्यासाठी असतो ह्याच कवयित्रीचा कविता काठ !
शांता शेळके…..काय म्हणून संबोधू ? ज्येष्ठ कवयित्री, लेखिका, पत्रकार, बाल साहित्यकार, गीतकार, संगीतकार….. व्यक्तिमत्त्वाच्या निर्मितीक्षम पैलूंची, दैवी गुणांची ही किती मोठी यादी !
शांताबाईंच्या प्रत्येक शब्दाने मला दुर्मिळ अशी शांतता दिली आहे. ‘कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू’ वाचतांना जगाचा कर्कश कोलाहल आपोआप मला ऐकू येईनासा होतो,’…..पोहोचते आहे जावून माझ्याच अंतरंगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मी चकित होते आहे, स्तिमित होते आहे, दुखावत आहे आणि सुखावतही.’ हे वाचतांना, जगाचा व्याप विसरून मी स्वतःच्याच शोधाची स्वप्ने बघण्याचाही प्रयत्न केला आहे. ‘कुठेतरी खचित खचित आहे सारे खास, कुठेतरी आहेस तूही नाही नुसता भास’ असं स्मरीत तप्त जीवाला शांतवण्याचा मी प्रयत्न केला आहे. ह्या सगळ्या आणि अश्या कित्येक ओळींमधले माधुर्य अवीट आहे. माझा ‘इथे ‘ म्हणजे थोर कवयित्री शांता शेळके यांचा ‘कविता काठ’ आहे.
‘कविता म्हणजे व्यक्तिगत अनुभूती असते ‘ असं सांगणाऱ्या शांताबाईंचा गीतकार म्हणून असलेला प्रवासही थक्क करणारा आहे. ‘तोच चंद्रमा नभात‘ लिहिणाऱ्या शांताबाई, ‘शारद सुंदर चंदेरी राती‘ लिहून किती वेगळे भावविश्व साकारतात. ‘जय शारदे वागेश्वरी‘ लिहिणाऱ्या शांताबाई, ‘रेशमाच्या रेघांनी, लाल काळया धाग्यांनी’ म्हणत लावणीस शालीन शृंगाराचा सुवर्ण स्पर्श करतात. ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ अशी सौंदर्यपूर्ण रचना करणाऱ्या शांताबाई, ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती‘ अशी वीर रसाची रचनाही करतात. चतुरस्र कवयित्री, गीतकार असणं ही एक दैवी देणगी आहे. ही देणगी शांता शेळके यांना लाभलेली होती.
माझ्या मनात अनेकदा कवितेचे पावित्र्य जतन करण्यासाठीची घालमेल चालू असते. स्फुरलेल्या शब्दांना धक्का लावणं, मग ते वृत्त रचनेसाठी असो अथवा छंद रचनेसाठी असो, मला फार कृत्रिम वाटतं. एखादा शब्द बदलून दुसरा तिथे योजायचा म्हणजे कृष्णाची बासरी काढून घेवून भगवान शंकराचे हाती देवून, “आता तू वाजवून दाखव बरं थोडी, बघू कसा आवाज येतो” असं म्हटल्या सारखा त्रास व्हायचा. माझ्या ह्या शंकेचं निरसन शांताबाईंनी फार सुंदर शब्दात केलं. ‘कवितेत एखादा शब्द बदलून अर्थाला जवळ जाणारा दुसरा शब्द योजला तर ती काही कारागिरी नसते, तो असतो एक जागरूक संस्कार !’
त्यामुळे क्वचित, आता आणि पुढेही, जर एखाद्या शब्दाला पर्यायी शब्द योजावा लागला तर मन कच खाणार नाही कारण अश्या जागरूक संस्काराने माझी कविता अधिक पवित्र होईल. अध्यात्मात म्हणे आपल्या प्रश्नांची उत्तरे संत चरित्रात मिळतात. हे त्यापेक्षा काय वेगळं आहे ?
शांताबाईंनी त्यांच्या काव्य प्रवासाची सुरुवात बालपणी ऐकलेल्या अभंग, ओव्यांमधून झाली असा उल्लेख केला आहे. माझ्या बालपणी मी दुर्दैवाने फार ओव्या ऐकल्या नाहीत. अभंगही थोड्या प्रमाणात ऐकले आहेत. मात्र अश्या दैवी प्रतिभेच्या कवयित्रीच्या कविता मात्र खूप वाचल्या आहेत आणि आजही वाचते आहे. त्यामुळे ज्या काही चार – सहा कविता मी लिहिल्या आहेत त्याची पाळमुळे सगळी ह्या थोरामोठ्यांच्या कवितांनी केलेल्या संस्कारांनी रुजवलेली आहेत.
शांताबाईंच्या कर्तृत्वाचं, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या अतिशय संवेदनशील स्त्री मनाचं वर्णन माझ्यासारख्या, काल कविता लिहायला लागलेलीनं करावं इतकी माझी पात्रता नाही.
परंतू शांताबाई, आपणच म्हटल्याप्रमाणे…
‘अपार प्रसववेदना सोसून
माझ्या मनातून जन्मलेल्या
या नव्या ‘ मी ‘ ला
प्राणपणाने जोपासायला हवे मला
अजुन हा तर नवजात गर्भगोळ
आहे कच्चा, हळवा, ओला’
ह्या कच्च्या, हळव्या गोळ्याला आकार घेण्यासाठी गरज आहे आपल्या आशीर्वादांची. आपल्याला माझा प्रणाम🙏🏻 माझी कविता ‘ कंठहार ‘ आपल्या चरणी अर्पण !
कंठहार
एक साधा सुती धागा
दोन टोका दोन मणी,
माप सुताचे ठरले
राही नक्षीची पेरणी
रत्ने, फुले, काचा, काटे
काय जमा तू न जाणी,
जे जे येईल ओंजळी
त्यास ओवी गात गाणी
सारे नको तेच रंग
मोती प्रत्येक वेगळा,
शोभा वाढवी अधिक
लावी जीवे त्यांसी लळा
जरा टोचतील काचा
जरा बोचतील काटे,
परी वेची जे त्यातून
अलगद कंठी दाटे
जरा जपून जपून
गाठी पाडू नको पण,
कष्ट होती सोडवाया
धागे होतातही क्षीण
फुले सुकतील पुढे
तरी माळी श्रद्धाभरे,
जरी ओघळती देती
गंध तनुस साजिरे
दोन पोवळी टोकाची
धागा भांडवल दिला,
नक्षी किती अनुपम
आहे ज्याची त्याची कला !
– लेखन : डॉ. गौरी जोशी- कंसारा, न्यू जर्सी,अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
शांता शेळके यांच्याविषयी आपला लेख भावला. कंठहार कविता पण खूपच छान आहे.
मनःपूर्वक आभार 🙏🏻
अमितजी, भावेजी, दिलीपजी,आपल्या दिलखुलास प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आपले शब्द भावले.
धन्यवाद..
मनःपूर्वक आभार 🙏🏻
गौरी मॅडम, शांता शेळके यांच्या गाण्यांवर आणि कवितांवर लिहिलेला लेख वाचला. शांता शेळके यांच्या कविता आणि गाणी मनाला तजेला देतात, प्रसन्नता देतात. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहायला शिकवतात. आपण अतिशय विनम्र भावनेने लेख लिहिला आहे…… धन्यवाद 🙏
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻
अप्रतिम सुंदर ,🙏🙏👌
मनःपूर्वक आभार 🙏🏻