Thursday, February 6, 2025
Homeकलामनोरंजनाची दुनिया

मनोरंजनाची दुनिया

एकटेपणा हा मनुष्याचा फार मोठा शत्रू आहे. त्यामुळे मनुष्य खचून जातो, निराश होतो व नकारात्मक विचार करत बसतो. मनावरील ताण तणाव अधिकच वाढतो. पण आज ह्या एकटेपणाच्या राक्षसाला आपण मनोरंजनामुळे काबूत ठेवू शकतो. महिलांचा वेळ घरातील कामात जातो. त्यामुळे एकटेपणा त्यांच्या वाटेला फारसा येत नाही. पुरुषांना घरात बसायची सवय नसते. मात्र आज तशी वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे रेडिओ, टीव्ही व मोबाईल त्यांचे नवीन मित्र झाले आहेत. अनेकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत गाणी ऐकायला फार आवडतात. त्यामुळे एकटे वाटत नाही. संगीतामुळे मनाला आनंद मिळतो व आपण जे संगीत ऐकतो त्या विश्वात रमून जातो. एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडी नुसार संगीत ऐकते. काही गाणी, काही शब्द असे असतात की ते मनाला भावून जातात. ती गाणी सतत ऐकली तरी समाधान होत नाही, इतकी ती जवळची वाटतात. जणू त्या गाण्याला जोडलेल्या काही आठवणी असतात. अनेकांना व्यक्त होता येत नाही अथवा शब्दात सांगता येत नाही. अशा वेळी आपल्याला आवडणारी गाणी जेव्हा आपण प्रियजनांना पाठवतो तेव्हा दोघांनाही आनंद मिळतो व आपल्या भावना पोहचवण्याचे काम हे संगीत करते. मग तो दूर राहणार आपला मुलगा/मुलगी असो अथवा आपल्या घरातील व्यक्ती किंवा मित्र /मैत्रिणी असो. मोबाईलमुळे तर सर्व जग जवळ आले आहे. आपल्याला ज्या गायकाची गाणी आवडतात ते कधीही व कोठेही ऐकायला मिळतात. ही आधुनिक उपकरणाची किमयाच.

पूर्वी एखादे आवडीचे गाणे ऐकायचे असेल तर ते रेडिओ अथवा टीव्ही वर लागले तरच त्यांचा आनंद घेता येत असे. मात्र आज सर्व बटनांचा खेळ आहे. मोबाईल मुळे हे सर्व सहज शक्य झाले आहे.आज हे निर्जीव उपकरण आपल्याला सजीव करत आहे. आपला एकटेपणा दूर करत आहे. घरात अनेक जेष्ठ मंडळी टीव्ही व रेडिओ ऐकतात. त्या टीव्ही वरील मालिका, त्यातील कलाकार आज त्यांना आपलेसे वाटतात. त्यांचे मन रमते व वेळ ही चांगला जातो. बऱ्याच महिलांना काम करत रेडिओ ऐकायला खूप आवडते. त्यामुळे काम ही होते व एकटेपणा जाणवत नाही. आजकाल अनेक महिला युट्युब वर आवडीची गाणी लावून काम करतात. त्यामुळे अनेक तास काम करून देखील थकवा जाणवत नाही. पहाटे भक्ती गीत, भजन ऐकल्यामुळे वातावरण प्रसन्न वाटते. नंतर आपल्याला आवडीच्या गायकाची गाणी मनाला उभारी देतात. त्यात किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले ते अगदी नवोदित गायकांची गाणी मोबाईलवर ऐकण्याची मज्जा काही वेगळी असते.

आज घरबसल्या आपण टीव्हीच्या माध्यमातून अनेक चित्रपटांचाही आनंद घेत असतो. आवडीच्या मालिका पहात असतो. ह्या कलाकारांनी सर्वांच्या मनावर राज्य केले आहे व अतिशय मोलाचे काम करत आहे. अशा ह्या समस्त कलाकारांना सलाम. त्यांच्यामुळे एक उत्साह निर्माण होतो व मनावरील ताण तणाव नाहीसा होतो. विचार करा जर आपल्या जीवनात मनोरंजन नसते तर हे जीवन किती भकास झाले असते.नाही का ? काही गाणी तर ऐकता क्षणी नाचावे वाटते. ती तर त्या गाण्याची किमया असते. मनुष्य स्वतःला थांबवू शकत नाही. अशावेळी नाचून मनावरील ताण कमी होतो. मित्रमैत्रिणी एकत्र आल्यावर नाचायची मजा काही वेगळी असते. मग तो भांगडा असो, कोळी गीत असो अथवा सैराट सारखी गाणी असो. काही देशभक्ती पर गीतं, पोवाडे ऐकल्यावर रक्त सळसळते. अभिमान वाटतो भारतीय असल्याचा. काही शांत गाणी मनावर राज करतात. त्याचा अर्थ एवढा सुंदर असतो की ती सतत ऐकावी वाटतात. काही गाणी आपल्या हृदयाशी जोडलेली असतात. जणू ती आपल्यासाठी तयार केली असावीत असे वाटते. त्या प्रसंगाला ती गाणी आपल्या फार जवळची वाटतात. गाण्याच्या भेंड्या खेळण्यात तर वेळ कसा जातो हे समजत नाही. संगीतात अशी जादू आहे की ते कोणाचेही मन जिंकू शकते.

ह्या संगीतामुळे नात्याची वीण अजून बळकट होते. ह्या सर्व निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक कलाकार व पडद्या मागून काम करणाऱ्या अनेक व्यक्ती ह्यांच्यामुळे आपले आयुष्य अधिक सुखकर व आनंदी झाले आहे. जीवनात मनोरंजनाचे महत्व आज पुन्हा एकदा नव्याने पटले व त्याची साक्षात प्रचिती आपण घेत आहोत. ही सर्व मंडळी लाख मोलाचे काम करत आहेत. त्यांच्या कष्टाला व प्रामाणिक प्रयत्नांना सलाम.

लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी