शिवकाल आणि पेशवेकाळाचा अभ्यास करतांना, त्या काळातील ३५०-४०० वर्षांपूर्वीची स्त्री किती प्रगत होती, हे दिसून येते. परमेश्वरानेच तिला देवी, रणरागिणी, माता, पत्नी, भगिनीच्या रूपात शक्ती दिलेली आहे. तिने स्वतःची स्वतःच प्रगती केलेली आहे. ती उंबरठ्याच्या बाहेर गेली नसली तरी ती उत्तम संस्काराने परिपक्व झालेली दिसून येते.
शिवकाळातील महिलांचा अभ्यास करतांना शिवबांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई अतिशय प्रखर व्यक्तिमत्व असलेल्या, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रनिर्माण, स्वराज्य निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या माता, बुध्दिमान, वाकचातूर्य, खंबीरपणे पाठीशी उभी राहणार्या, सुनांना सांभाळणारी व मार्गदर्शन करणार्या खडतर धोक्याच्या प्रसंगी बुध्दिमत्तेच्या जोरावर काम करणाऱ्या मातोश्री जिजाबाई दिसून येतात.
श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींना मार्गदर्शन करणाऱ्या तसेच संभाजीराजे आणि येसूबाई यांना योग्य ते शिक्षण आणि संस्कार देणाऱ्या जिजामाता विसरता येणे शक्य नाही.
दुसरी स्त्री येसूबाई, संभाजी महाराजांची पत्नी या अतिशय शुर व संभाजींच्या बलिदानानंतर खंबीरपणे स्वराज्य सांभाळणाऱ्या राजाराम महाराज आणि ताराबाई यांना मार्गदर्शन करणाऱ्या, पण दुर्देवाने औरंगजेबाच्या छावणीत नजरकैदेत त्यांना रहावयास लागते.
तिसरी स्त्री म्हणजे महाराणी ताराबाई. या तर रणरागिणी म्हणूनच इतिहासात प्रसिध्द आहेत. श्री छत्रपतींनी आणि संभाजी, राजाराम महाराजांनी सांभाळलेले, उभे केलेले आणि शुन्यातून निर्माण केलेले स्वराज्य त्यांनी प्रखरपणे सन १७०० ते १७०७ पर्यंत सांभाळले.
औरंगजेब मराठी राज्य मिळविण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता. पण ताराबाईंच्या पराक्रमामुळे औरंगजेबने नमते घेतले. त्याला हे राज्य जिंकता आले नाही. तो महाराष्ट्रातच मृत्यु पावला.
अशीच एक स्त्री शहाजीराजांची पत्नी तुकाबाई यांचीही इतिहासात ओळख आहे.
या स्त्रियांना चांगलेच लिहता, वाचता येत होते. त्या मोडीही जाणत होत्या. या शिवकाळानंतर आपण पुढे आलो की, पेशव्यांच्या कारभाराला प्रारंभ होतो.
पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ पेशवे हे मुळचे श्रीवर्धन चे. त्यांची पत्नी राधाबाई, त्यांना दोन मुली एक भिऊबाई आणि दुसरी अनुबाई. पुत्र थोरले बाजीराव, त्यांच्या पत्नी काशीबाई आणि मस्तानी आणि दुसरे पुत्र चिमाजी अप्पा यांचा पराक्रमाची माहिती या ठिकाणी मिळते. थोरले बाजीरावांच्या मृत्युनंतर बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांची पत्नी गोपिकाबाई यांचा वयाच्या ५ व्या वर्षी वाई येथे थाटात विवाह झाला होता. पेशवे घराण्यातील अत्यंत मुत्सद्दी, चाणाक्ष अशी ही स्त्री होती. घरातील पाच लोकांचे मृत्यु त्यांना पहावयास लागले. पती नानासाहेब, पुत्र माधवराव, सुन रमाबाई आणि पुत्र नारायणरावाचा खुन आणि पानीपतात सदाशिवराव इ. त्यानंतर बाळाजी बाजीराव पेशवे यांच्यानंतर माधवराव पेशवे गादीवर आले. त्यांचा अल्पसा काळ क्षयाच्या दुखण्यात गेला. ते वयाच्या २७ व्या वर्षी गेले. पत्नी रमाबाई सती गेल्या. त्यांना पुत्र नसल्याने बंधु नारायणराव यांना पेशवेपद मिळाले आणि त्यांचाही पेशवेपदाचा अल्पकाळ होऊन शनिवार वाड्यात त्यांचा खुन झाला. पत्नी गंगूबाई या एक महिन्याच्या गरोदर होत्या. त्यांना नंतर पुत्र झाला. तो सवाई माधवराव पेशवा. तो फक्त चाळीस दिवसांचा असताना त्यांस गादीवर बसविले. गंगूबाईंचे आयुष्य अगदीच अल्प ठरले. लवकरच त्या मृत्यु पावल्या. सवाई माधवराव यांनी बावीस वर्षे राज्य केले.
पेशव्यांच्या स्त्रियांचा अभ्यास करतांना राधाबाई खुप हुषार, चाणाक्ष आपल्या पुत्राचे राज्य वाढावे यासाठी त्यांनी राजस्थानात जाऊन स्वतः तिर्थयात्रा केलेली आहे. त्यांच्या सानिध्यात काशीबाई, मस्तानी आणि गोपिकाबाई आहेत. मस्तानी सोडल्यास राधाबाईंनी राजकारणातील धैर्य दिले आहे. मस्तानी ही सवत म्हणून शनिवारवाड्यात आली तरी काशीबाई यांनी तिला बहिणीप्रमाणे सांभाळले आहे. आलेल्या या प्रसंगांला काशीबाई सामोऱ्या गेल्या आहेत. मस्तानी देखील शुर आहेत. तलवार, भाला चालविणे आणि नृत्यकलाही त्यांना अवगत होती.
पेशव्यांच्या घराण्यातील एक स्त्री म्हणजे आनंदीबाई, या रघुनाथराव यांच्या पत्नी आहेत. राजकारणात मुरब्बी नारायणरावांच्या खुनाचा बाबतीत त्यांचाही सहभाग होता असे इतिहासात म्हटले आहे. त्यांनी ध चा मा केला आणि मारावे म्हणून पेशवे नारायणरावांचा खुन झाला. असे इतिहासात बखरीमध्ये आहे पण तो मोडी कागद सापडला नाही. तरी देखील त्या धारच्या किल्ल्यात नजरकैदेत होत्या. रघुनाथरावांना पेशवेपद मिळावे हा त्यांचा हट्ट होता पण तो सफल झाला नाही. त्यांना धारच्या किल्ल्यात ठेवले असतांना समोर महेश्वर आहे. या ठिकाणी पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर कारभार चालवित आहे. त्यांना बाई भेटल्या आहेत.
पेशव्यांच्या सर्वच स्त्रिया या हुषार व मुत्सद्दी होत्या. आनंदीबाई दुर्देवी ठरल्या. त्यांना राजकारणाची चांगलीच जाण होती, त्या तेजस्वी आणि बाणेदार होत्या. त्यांनी प्राप्त परिस्थितीला धैर्याने तोंड दिले. पत्नीच्या कर्तव्याला स्मरून त्यांनी निष्ठेने पतीची सेवा केली. आनंदीबाईंमुळे रघुनाथरावांच्या जीवनाचे तारू अगदीच मोकाट न सुटता त्यांच्या आयुष्याला थोडे तरी नीट वळण लागले.
एका दृष्टीने श्रीमंत आनंदीबाई पेशवे या दुर्देवीच ठरल्या.
राधाबाईंनी भट घराण्याची, पेशवाईंची, वैभवशाली, कर्तृत्वसंपन्न कारकीर्द पाहिली.
चिमाजी अप्पांची दुसरी पत्नी अन्नपुर्णा बाई ह्या पेशव्यांच्या घराण्यात सती गेल्या. तसेच माधवरावांची पत्नी रमाबाई ह्याही थेऊर च्या गणपती मंदिरासमोर सती गेल्या. नानासाहेब पेशव्यांचा काळ हा वैभवशाली काळ होता. ह्या सर्व महिला शनिवारवाड्यात होत्या.
त्याचवेळी इ.स. १७२५ ते १७९५ या सत्तर वर्षाच्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य संपूर्ण भारतभर होते. परकियांनी सुध्दा अहिल्याबाईंचा गौरव केला आहे. एक साध्वी, शुध्द आणि गंगेच्या प्रवाहासारखे निर्मळ जीवन जगून माझा जन्म लोककल्याणासाठी झाला आहे, असे ठणकावून सांगणारी ही माता एक अद्वितीयच आहे. स्वतःच्या आयुष्यात दुःख आले पण ते त्यांनी उघडे केले नाही. भरभरून लोकांसाठी सेवा केली. आणि संसार म्हणजेच माझी जनता असे मनाशी ठरवून त्यांनी कार्य केले.

– लेखन : श्रीपाद नांदेडकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800