आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात जवळजवळ सर्वांचीच वाचनाची व लिखाणाची आवड कमी होत चालली आहे असे बोलल्या जाते. विशेषत: किशोरवयीन मुलामुलींच्या बाबतीत तर अशी तक्रार सर्वच पालक करताना दिसतात. ही एक चिंतेची बाब आहे हे नाकारून चालणार नाही.
सभोवताली अशी परिस्थिती असताना अमेरिकेत जन्मलेली आणि तिथेच आठवीत शिकत असलेली मराठी मुलगी अन्वी अपूर्व चिंचवडकर या परिस्थितीला सुखद अपवाद आहे. अमेरिकेत जुलै -ऑगस्ट या महिन्यात शाळेला सुट्टी असताना वाचनाची व लिखाणाची आवड असलेले अन्वीचे आजोबा; आपल्या बदलापूर येथील सुहास पटवर्धन अमेरिकेत गेले असताना त्यांना तेथील वाचनालयातून बौद्धिक खाद्य म्हणून पुस्तके आणून दिली जायची. ते प्रत्येक पुस्तक अन्वी कडून वाचून घेत आणि तीही आजोबांना आवडीने पुस्तक वाचून दाखवित असे हे विशेष.

अशातच अन्वीच्या वाचनात Classical English Metaphor हे पुस्तक आले. इंग्रजी साहित्यिकांनी अलंकारिक उपयोग केलेली लक्षवेधक वाक्ये व उतारे याचे संकलन त्या पुस्तकात होते. ते पुस्तक वाचल्याने आपण जी पुस्तके वाचतोय त्यातील आवडलेली आणि लक्षात राहतील अशी वाक्ये व उतारे यांचे संकलन करून एखादे पुस्तक होऊ शकेल आणि त्याचा लाभ इतर वाचकांनाही होईल असा विचार अन्वीच्या मनात आला. पण नुसता विचार करूनच न थांबता तिने आईवडिलांच्या आणि आजोबांच्या मार्गदर्शनाने Life of Pi, Shakespeare, The Canyon’s Edge, Classical English Metaphor, One True Sentence : Ernest Hemingway, A Short History of Nearly Everything आणि Great Souls या सात पुस्तकातील सर्वानाच वाचायला आवडतील अशी लक्षवेधक माहिती व अलंकारिक वाक्ये यांचे संकलन करून “Like & Share” हे सार्थ शीर्षक असलेले एकशे दहा पानी इंग्रजी पुस्तक तयार केले.
Classical English Metaphor हे पुस्तक सूक्ष्मपणे वाचून त्यातील निवडक वाक्ये अन्वीने Like & Share या पुस्तकात समाविष्ट केल्याबद्दल पुस्तकाचे लेखक वॉर्ड फारन्सवर्थ यांनी अन्वीचे कौतुक केले आहे.

इंग्रजीचे गाढे अभ्यासक व लेखक असलेले आजोबा यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. तर आई वडिलांकडून प्रोत्साहन मिळाल्याचे अन्वीने पुस्तकाच्या ऋणनिर्देशात नमूद केले आहे. या पुस्तकाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून सध्या खाजगी वितरणासाठी तयार केलेले हे पुस्तक एखाद्या नामवंत प्रकाशकाकडून छापून घेण्याची अन्वीची इच्छा आहे.

अन्वीला वाचन आणि लिखाणाव्यतिरिक्त नृत्याची, गायनाची, अभिनयाची व वक्तृत्व कलेची देखील आवड आहे आणि हो, ती एक उत्तम चित्रकार देखील आहे.

अन्वीचे आजोबा सुहास पटवर्धन यांनी मुंबई विद्यापीठातून १९७६ साली म्हणजेच तब्बल पन्नास वर्षापूर्वी इंग्रजी साहित्यात एम. ए ची पदवी संपादन केली असून त्यांची ‘Learn to Enjoy English’ व ‘I Said I’ ही दोन इंग्रजी पुस्तके आणि ‘वाचा सौख्यभरे’ हे मराठी पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
— टीम एनएसटी. ☎️ +91 9869484800
