“महामारीतील मृत्यूभयावर डॉ फ्रँकल यांची लोगोथेरपी लाभदायक !”
प्रा.डॉ.अजित मगदूम.
सध्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण वयातील व्यक्तीही मृत्यूमुखी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर समाजात मृत्यूचे भय वाढत आहे. या मृत्यूभयावर डॉ. फ्रँकल यांची लोगोथेरपी लाभदायक ठरेल असा विश्वास विचावंत प्रा.डॉ. अजित मगदूम यांनी नुकताच व्यक्त केला. “जीवनाच्या अर्थाचा शोध” या विषयावर आँनलाईन प्रणाली द्वारे बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले. रोटरी क्लब आँफ नवी मुंबई गरिमा यांनी हे व्याख्यान सत्र आयोजित केले होते.
दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या छळछावणीतील अनन्वित छळाला सामोरे जाणाऱ्या डॉ व्हिक्टर फ्रँकल यांच्या ‘अर्थाच्या शोधात’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा संदर्भ घेत डॉ मगदूम यांनी मांडणी केली.
ते पुढे म्हणाले, छळछावणीतील यातना, अनिश्चितता, नैराश्य व मृत्यूची टांगती तलवार यावर लेखकाने मांडलेली लोगोथेरपी ही आजच्या कोविड महामारीने झाकोळलेल्या काळात जाणून घेणे महत्वाचे ठरेल.
जे दुर्बल, काम करण्यास असमर्थ अशांना विद्युत भट्टीत ढकलून त्यांची क्षणार्धात राख करणं हे मानवजातीला लांच्छनास्पद असून यात विशेषतः वृद्ध, मुले, महिला यांचाच अधिक समावेश होता. एकीकडे माणसांची कत्तल होत असताना जे धडधाकट आहेत त्यांना पावाच्या एका तुकड्यावर, अपार शारीरिक कष्टाला जुंपून, कडाक्याच्या थंडीत अपुऱ्या वस्त्रावर झोपायला लावून त्यांना शारीरिक व मानसिक दृष्टया सोलून काढण्यात येत होतं. मृत्युचे भय, त्यांच्यात सतत येणारे आत्महत्येचे विचार हे आजच्या कोविड महामारीच्या काळात होत असणारे हाल व मृत्युभयाशी साधर्म्य सांगणारे आहे.
पुस्तकाच्या उत्तरार्धात डॉ फ्रँकल यांनी जी लोगोथेरपी सांगितली आहे ती आजच्या काळात दिलासा देणारी आहे. प्रत्येकाला आपल्या जीवनाचा उद्देश, अर्थ निश्चित करता आला, जीवनात आपलं प्रयोजन काय याचा वेध घेता आला तर चिंता, नैराश्य, अनिश्चितता तसेच मृत्यूभयावर मात करत नवा, रसरशीत दृष्टिकोन आपलं जीवन सुकर, सुखी करु शकेल असे ते शेवटी म्हणाले.
या चर्चासत्रात अनेक संस्था प्रतिनिधी, कार्यकर्ते त्रिवेंद्रम, बंगळुरु, टेक्सास, इ. ठिकाणाहून सहभागी झाले होते.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.