गणपती आपले आराध्य दैवत. प्रत्येक देवघरात बहुतेक गणपती असतोच. पण काही वर्षांपूर्वी, काही देवळं प्रसिध्द झाली, आणि देवळासमोरच्या दुकानात, रस्त्यावर गणपती मिळायला लागले, शोपिस म्हणून, प्रेझेंट देण्यासाठी म्हणून, विविध प्रकारचे गणपती बाजारात उपलब्ध झाले.
नविन कार घेतली की कार मध्ये ठेवायला पण कारबरोबर गणपती मिळायला लागला. आणि मग देवघर सोडून घरांत, ॲाफिसमध्ये, टेबलावर, भिंतीवर सर्वच ठिकाणी गणपती दिसायला लागले.
गणपतींचे रूप इतके सोज्वळ आहे, सुंदर आहे कि प्रत्येकाला ते आपल्या कलेतून साकार करावे असे वाटते. पेंटिंग असो, रांगोळी असो, शिल्पकला असो… आपला भाव, आपली श्रध्दा त्या प्रतिमेतून साकार करावी, असे वाटते.
मला ही वाटते… त्यातल्याच काही कलाकृती..आणि कविता…


देव नाही मावत …मंदिरी,
जरी मूर्ती असे… गाभारी….
वास त्याचा… चराचरी,
आणि भक्तांच्या ..अंतरी
रूप जरी एक असे,
मनी तो वेगळाच वसे,
ज्याला तो जसा दिसे,
त्याला तो तसा भासे…
भक्तीच्या भावना,
कधी घेतात ताना….
कधी रेखाटतांना,
रंग चढतात शब्दांना..

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800