Tuesday, July 1, 2025
Homeलेखमाझी जडणघडण भाग - ९

माझी जडणघडण भाग – ९

कुमुदताई

आम्ही राहत असलेल्या गल्लीत शिरतानाच उजवीकडे एक खूप मोठा ओटा सदृश मोकळा चौथरा होता ज्यास आम्ही “घटाणा” असे म्हणत असू. हा घटाणा म्हणजे एक प्रकारचे गल्लीतले ‘ॲम्फीथिएटरच” होते. तिथे नाना प्रकारचे पारंपरिक, लोककलेचे आणि लोक कलाकारांचे कार्यक्रम विनामूल्य चालत. जसे की डोंबाऱ्याचा खेळ, मदारी, माकडांचा खेळ, डब्यातला सिनेमा, टोपलीतले नाग नागिण, पोतराज आणि असे कितीतरी. त्यातल्या सगुणा, भागुबाई, गंगुबाई, अक्का, माई, जंगल्या, आण्णा, आप्पा अशी नाना प्रकारची पात्रे आजही आठवली तरी सहज हसू येते. डोंबारीचा खेळ पाहताना हातात काठी घेऊन दोरीवर चालणारी ती लहान मुलगी पाहताना छाती दडपून जायची. पुढे आयुष्यात केलेल्या अनेक लाक्षणिक कसरतींचा संदर्भ या लहानपणी पाहिलेल्या खेळांशीही जोडला गेला ते निराळे पण आम्हा मुलांसाठी घटाण्यावरचे खेळ म्हणजे एक मोठे मनोरंजन होते.या पथनाट्यांमुळे आमचे बालपण रम्य झाले.

एक चांगलं लक्षात आहे की या खेळां व्यतिरिक्त मात्र आम्हा मुलांना त्या घटाण्यावर जाण्याची परवानगी नसायची कारण त्या घटाण्याच्या मागच्या बाजूला ट्रान्सजेंडर लोकांची वस्ती होती. ती चेहऱ्यावर रंग चढवलेली स्त्री वेशातील पुरुषी माणसे, त्यांचं टाळ्या वाजवत, कंबर लचकवत सैरभैर चालणं, दोरीवर वाळत घातलेले त्यांचे कपडे पाहताना विचित्र असं भयही जाणवायचं. कधीकधी घटाण्यावर रात्रीच्या वेळी ढोल वाजवत गायलेली त्यांची भसाड्या सूरातील गाणी ऐकू यायची. त्या गाण्यात अजिबात श्रवणीयता अथवा गोडवा नसायचा. आज विचार करताना वाटतं, त्यांच्या जीवनातील भेसूरता ते अशा सूरांतून व्यक्त करत असावेत.

पण तरीही मनात प्रश्न असायचे. ही माणसं अशी कशी? ही वेगळी का? यांचे आई वडील कोण? यांची वस्ती हेच यांचं कुटुंब का? या प्रश्नांची उत्तरे त्यावेळी कधीच मिळाली नाहीत पण आजही त्यावेळी उत्तर न मिळालेले अनेक प्रश्न मनात आहेतच.

एकदा बोलता बोलता जीजी म्हणजे माझी आजी म्हणाली,
”मालु गरोदर असली आणि मी घरात नसले की शेजारची काकी बिब्बा मागायला यायची. मालु भोळसट. ती काकीला द्यायची बिब्बा.”

बिब्बा नावाचं एक काळं, औषधी, सुपारी सारखं ‘बी’ असतं जे स्नायूंच्या दुखण्यावर उपयोगी ठरतं. हे बिब्बे वगैरे विकणाऱ्या बाया “बुरगुंडा झाला बाई बुरगुंडा झाला” अशाप्रकारे काहीतरी गाणी गात सुया, मणी, बिब्बे वगैरे विकत.
जीजी पुढे सांगायची, ”म्हणून तुझ्या आईला तुम्ही पाच मुलीच झालात.”

मालु — मालती हे माझ्या आईचं नाव. मला जीजीचं हे बोलणं अजिबात आवडलं नाही. मी तिला लगेच म्हटलं, “आम्ही मुली म्हणून तुला आवडत नाही का ?”
तेव्हा मात्र जीजी फार खवळली आणि तिने माझे जोरात गालगुच्चे घेतले पण मग दुसऱ्या क्षणी प्रेमाने जवळ घेऊन म्हणाली,” नाही ग ! तुम्ही तर माझे पाच पांडव.”

पण माझ्या मनात जे उत्तर न मिळालेले अनेक प्रश्न आहेत त्यापैकीचा एक प्रश्न कुमुदताई या आकर्षक व्यक्तिमत्वाभोवती गुंतलेला आहे. घटाणा ओलांडून गल्लीतून बाहेर पडताना उजवीकडे एका जराशा उंच प्लिंथवर दोन बैठी पण वेगवेगळी घरे होती. एक समोरची खोली आणि आत एक स्वयंपाक घर. एक खिडकी हॉलची आणि एक खिडकी स्वयंपाकघराची. परसदारी दोन्ही घरांसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे होती आणि पुढे मागे थोडा मोकळा परिसर होता. त्यातल्या एका घरात लैला आणि कासिमभाई हे बोहरी दाम्पत्य आपल्या इबू आणि रफिक या लहान मुलांसोबत राहत आणि दुसऱ्या घरात चव्हाणकाका आणि कुमुदताई हे नवविवाहित दांपत्य राहत असे. अतिशय आकर्षक असे हे दांपत्य. दोघेही गौरवर्णीय, उंच आणि ताठ चालणारे. त्यांच्याकडे पाहता क्षणी जाणवायचं की धोबी गल्ली परिसरातल्या जीवनशैलीशी न जुळणारं असं हे दाम्पत्य आहे. त्यांचा क्लासच वेगळा वाटायचा. चव्हाणकाका हे उत्तम वकील होते. अर्थात ते नंतर कळलं जेव्हा ते आमचे चव्हाणकाका झाले आणि त्यांच्या पत्नी आमच्यासाठी कुमुदताई झाल्या. आम्हा मुलांना नसेल जाणवलं पण ते नवविवाहित दांपत्य असलं तरी ते प्रौढ होते पण महत्त्वाचे हे होतं की सुरुवातीला काहीसे निराळे, वेगळ्या क्लासमधले ते वाटले तरी तसे ते असूनही खूपच मनमिळाऊ, हसरे आनंदी आणि खेळकर होते. आमच्याशी त्यांचे सूर फारच चटकन आणि छान जुळले. दोघांनाही लहान मुले फार आवडायची. शेजारच्या बोहरी कुटुंबातल्या रफिक आणि इबु वर तर ते जीवापाड प्रेम करत आणि कुमुदताई आम्हा मुलांना तर प्रचंड आवडायच्या.

मी प्रथम त्यांच्याशी कधी बोलले ती आठवण माझ्या मनात आजही काहीशी धूसरपणे आहे. मी आणि माझी मैत्रीण त्यांच्या घरावरून जात होतो.जाता जाता कुतुहल म्हणून त्यांच्या घरात डोकावत होतो. तेवढ्यात त्यांनीच मला खुणेने बोलावलं. खरं सांगू तेव्हा मला इतका आनंद झाला होता! कारण मला त्यांच्याशी नेहमीच बोलावसं वाटायचं पण भीडही वाटायची. आता तर काय त्यांनी स्वतःहूनच हाक मारली होती मला. मी धावतच गेले.
“तुझा फ्रॉक किती सुंदर आहे ग !”
हे त्यांच्याशी झालेल्या संभाषणातलं पहिलं वाक्य. मग मी फुशारकीत सांगितलं,
“माझ्या आईने शिवलाय माझा फ्रॉक.”
“अरे वा ! तुझी आई कलाकारच असली पाहिजे.”
“होयच मुळी.”
आणि मग त्या दिवसांपासून कुमुदताईंची आणि आमची घट्ट मैत्री झाली.

उठसूठ आम्ही त्यांच्याच घरी. रविवारच्या सुट्टीत तर आम्हा सवंगड्यांचा त्यांच्याकडे अड्डाच असायचा. त्यांच्याबरोबर आम्ही खूप पत्ते खेळायचो. पत्त्यातले अनेक डाव. पाच तीन दोन, बदामसत्ती, नॉट ॲट होम, लॅडीस, झब्बू, ३०४ वगैरे. आम्ही आमच्या वयातलं अंतर कधीच पार केलं होतं शिवाय नुसतेच खेळ नसायचे बरं का. कुमुदताई उत्कृष्ट पाककौशल्य असणार्‍या गृहिणी होत्या. खेळासोबत कधीकधी कांदाभजी, सोडे किंवा अंडे घालून केलेले पोहे, वालाची खिचडी असा बहारदार चविष्ट मेनूही असायचा.

माझी धाकटी बहीण छुंदा त्यांना फार आवडायची .ती सुंदर म्हणून तिला चव्हाणकाका लाडाने “प्रियदर्शनी” म्हणायचे. त्यांचंही आमच्या घरी जाणं-येणं होतं. चव्हाणकाकांचं आणि पप्पांच अनेक विषयांवर चर्चासत्र चालायचं आणि “कुमुदताई” माझ्या आईची खूप छान मैत्रीण झाल्या होत्या. अर्थात यातही मैत्रीचं पहिलं पाऊल त्यांचंच होतं. आईकडून आणि जिजी कडूनही शिवणकामातल्या अनेक कौशल्याच्या गोष्टी अगदी आत्मीयतेने त्यांनी शिकून घेतल्या. आईने त्यांना कितीतरी पारंपारिक पदार्थही शिकवले . जसे कुमुदताईंकडून आमच्याकडे डबे यायचे तसेच आमच्याकडूनही त्यांना डबे जात.मग एकमेकींनी बनवलेल्या पदार्थांची चर्चाही घडे.

कुठल्याही अडचणीच्या वेळी कुमुद ताई आईची मदत घेत आणि हे दोन्हीकडून होतं. आम्हा मुलांना तर त्यांच्यासाठी काहीही करायला आवडायचे. त्या एकट्या असल्या तर अभ्यासाची वह्या पुस्तके घेऊन आम्ही त्यांना सोबत करायचो. असं खूपच छान नातं होतं आमचं. त्यांच्याबरोबर गाणी ऐकली, सिनेमे पाहिले. कितीतरी वेळा— बालमन कधी दुभंगलं तर त्यांच्यापुढेच उघडं केलं आणि त्यांनी आमच्या डोळ्यातलं पाणी वेळोवेळी टिपलं.

मग नक्की काय झालं ?
कुमुदताई गर्भवती झाल्या, चव्हाण काका आणि कुमुदताईंना ‘बाळ’ होणार म्हणून खरं म्हणजे सारी गल्लीच आनंदली. दुसऱ्यांच्या मुलांवर जीवापाड प्रेम करणारं, मुलांमध्ये रमणारं हे जोडपं आता स्वतः “आई-बाबा’ होणार ही केवढी तरी आनंदाचीच गोष्ट होती पण कळत नकळत का होईना जाणवायला लागलं होतं ते पडत चाललेलं अंतर, त्यांच्या वागण्या बोलण्यातला अधोरेखित फरक. बालमन बारकावे टिपण्याइतकं परिपक्व नसतं पण कुठेतरी आत संवेदनशील नक्कीच असतं.

आजकाल रोज येणाऱ्या कुमुदताई आमच्याकडे येईनाशाच झाल्या होत्या. अत्यंत तुटकपणे बोलायच्या. नंतर तर बोलणंही संपलं. गल्लीतल्या बाकीच्यांशी मात्र त्यांचं काही बिनसलं नव्हतं.

प्रश्नांची खरी उत्तरं फक्त “जीजी” कडे मिळायची. जीजी आपणहूनच म्हणाली एक दिवस, “ तुझ्या कुमुदताईंना विसर आता. आता नाही येणार त्या आपल्याकडे.”
“पण का ?”
माझे डोळे तुडुंब भरले होते. कुमुदताईंसारख्या आवडत्या व्यक्तीला तोडणे कसे शक्य होते ?
“त्यांना भीती वाटते की तुझ्या आईचा चेहरा त्यांनी पाहिला तर त्यांनाही मुलगीच होईल. त्यांना मुलगी नको मुलगा हवाय.”

हा मला बसलेला ‘मुलगी’ विषयीचा अनादर दाखवणारा एक प्रचंड धक्का होता. त्या क्षणी मी माझ्या आईला घट्ट मिठी मारली आणि तेव्हा एकच जाणवलं,” माझ्यासाठी या जगात माझ्या आई इतकी महान व्यक्ती दुसरी कुणीच नव्हती. एक वेळ मी परमेश्वराची आरती करणार नाही पण माझ्या आईची महती गाणारी आरती जन्मभर करेन.”

आई आणि जीजीमध्ये सासू—सून नात्यातले वाद असतील पण अशा कितीतरी भावनिक, संवेदनशील संघर्षामय क्षणांच्या वेळी जीजी आईमागे भक्कमपणे उभी असायची.

शेतात उंचावर बसवलेल्या बुजगावण्यासारखं माझ्या मनातलं कुमुदताईंचं स्थान एकाएकी कोसळलं आणि रात्रीच्या भसाड्या आवाजातल्या ट्रान्स जेंडरांचं गाणं अधिक भेसूर वाटलं.

त्यानंतर चव्हाणकाका आणि कुमुदताईंनी घरही बदललं. ठाण्यातल्याच “चरई’ सारख्या प्रतिष्ठित भागात त्यांनी स्वतःचं मोठं घर घेतलं. चव्हाणकाकांची वकिली जोरात चालू होती. ठाण्यातील नामांकित वकील म्हणून त्यांची ओळख निर्माण होत होती. घटाण्या समोरची त्यांच्या घराची खिडकी कायमची बंद झाली आणि आमच्यासाठीही तो विषय तिथेच संपला.

आमच्याही आयुष्यात नंतर खूप बदल झाले. आम्ही मोठ्या झालो. भविष्याच्या वाटेवर आम्हा बहिणींची— आई वडील आणि आजीच्या प्रेम आणि मार्गदर्शनाखाली आयुष्ये फुलत होती.’ मुलगा नसला तरी..’ हे वाक्य सतत कानावर पडत राहिलं तरीही कधी कधी ते चांगल्या शब्दांबरोबरही गुंफलेलं असायचं. “मुलगा नसला तरी ढग्यांच्या मुली टॅलेंटेड आहेत. ढग्यांचे नाव त्या नक्कीच राखतील.” तेव्हा त्या व्यक्तिंबद्दल “ही माणसं आपल्या विचारांची” असंही काहीसं वाटायचं.

अनपेक्षित पणे एक दिवस, ध्यानीमनी नसताना आमच्याकडे चव्हाणकाका आणि कुमुदताई आले. मध्ये बर्‍याच वर्षांचा काळ लोटला होता. काळाबरोबर काळाने दिलेले घावही बोथट झाले होते. आमच्यावर लहानपणापासून झालेला एक संस्कार म्हणजे, “ झालं गेलं विसरून जावे, कोणाही विषयी विचार करताना केवळ त्यांच्या आनंदाचा, सुखाचा, अथवा त्यांच्याच भूमिकेतून विचार करावा. कुठलाही आकस मनात ठेवून टोकाची प्रतिक्रिया कधीही देऊ. नये.”

कुमुदताईंना तीन मुली झाल्या. सुंदर गुणी, त्यांच्यासारख्याच आकर्षक. मुलगा झाला नाही. तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर चव्हाण दांपत्य पेढे आणि बर्फी दोन्ही घेऊन आमच्याकडे त्या दिवशी आले होते.
कुमुदताईंनी माझ्या आईला घट्ट मिठी मारली. एक अबोल पण अर्थपूर्ण मीठी होती ती! एका वैचारिक चुकीची जणू काही कबुलीच होती ती. त्यानंतर कृष्णमेघ ओसरले. आकाश मोकळे झाले.

आज प्रातिनिधिक स्वरूपात विचार केला तर वाटते यात ‘कुमुदताईंना’ दोष देण्यात काय अर्थ आहे? सामाजिक वैचारिकतेचा हा पगडा असतो.अजून तरी समाज पूर्णपणे बदलला आहे का ?
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. किती छान लिहीलं आहे!!माझ्या डोळ्यासमोर कुमुदताई प्रत्यक्ष आल्या.

  2. अतिशय उत्तम प्रकारे कुमूदताई हा लेख लिहिला आहे. घटाणया याबाबतीत प्रथमच ऐकले. प्रियदर्शिनी हे नाव पण अगदी साजेसे आहे छुंदाताईच. आजच्या काळात ही मुलग/ मुलगी हा भेदभाव बऱ्याच लोकांच्या मनात आहेच. हे दुर्दैवच. प्रत्येक लेख सहज सोप्या, साध्या शब्दांत उत्तम प्रकारे लिहीला आहे. 👌👍
    ताई तुम्ही नेहमीच आम्हाला वाचनाची अशीच मेजवानी देत रहा. 🙏

  3. नमस्कार राधिकाताई…. कुमुदताई हा लेख वाचतांना
    त्या समोर आल्या व प्रत्यक्ष भेट झाली असे वाटले.अगदी सुंदर व्यक्तीरेखाटन.धन्यवाद,

  4. छान लिहिले आहे राधिकाताई!
    चव्हाण दांपत्याची विचारसरणी ,पूर्वी अशीच होती.
    छान टिपले आहे ,निरीक्षण
    फारच छान निरीक्षण ,राधिकाताई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील