“चारू”
।अमित्रस्य कुत: सुखम्।
हे एक प्रसिद्ध सुभाषित आहे आणि ते खरंच आहे. ज्या व्यक्तीला मित्र-मैत्रिणी नाहीत ते सुखी कसे असू शकतील? सुखी जीवनासाठी चांगले मित्रमैत्रिणी हवेतच. या बाबतीत मात्र मी खरोखरच भाग्यवान आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला अगदी सहजपणे मित्र-मैत्रिणी मिळत गेल्या. गंमत म्हणून सांगते, मी चार-पाच वर्षांचीच असेन. जिथे आमची धोबी गल्ली संपायची तिथून टेंभी नाक्यावर जाणारा रस्ता सुरू व्हायचा आणि तिथेच एका दोन मजली बिल्डिंगच्या खालच्या मजल्यावर “भारती” राहायची. मी तिला पहायचे, तीही मला पहायची. गोरीगोरी पान, निळसर डोळ्यांची, कुरळ्या केसांची भारती मला अगदी सुंदर बाहुलीच वाटायची. मला ती फारच आवडायची. कदाचित तिलाही मी आवडले असेन त्यामुळे आमची खूपच गट्टी जमली. जीजी मला तिच्या घरी सोडायची. तिच्या घरात आम्ही दोघी खूप खेळायचो. लपाछपी, भातुकली, कधी रंगावर रंग (पत्ते) असे छान छान आम्हाला येणारे खेळ खेळण्यात आम्ही रमायचो.
भारतीची आई आम्हाला मधून मधून काही खायलाही आणून द्यायची. तिची आई पण मला फार आवडायची कारण ती कधीच आमच्यावर रागवायची नाही. त्यांच्या घराला रस्ता दिसणारी एक मस्त खिडकी होती आणि त्या खिडकीत बसून मला आणि भारतीला गप्पा करता करता दूधपोहे खायला खूपच मजा येत असे. नंतर काही वर्षांनी भारतीची फॅमिली घंटाळी रोडवर राहायला गेली.माझ्या घरापासून दूर. त्या लहान वयात दुःख म्हणजे काय कळत नव्हतं पण मी खूप रडवेली मात्र त्यावेळी झाले होते इतकं आठवतं.
त्यानंतर मी शाळा नंबर १२ मध्ये पहिली ते चौथी अशी शिकले. त्यादरम्यानही मला खूप मैत्रिणी मिळाल्या. पण भारती माझ्या मनात कायम असायचीच आणि कशी गंमत गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल मध्ये पाचवीच्या वर्गात मी आणि भारती पुन्हा एकत्र आलो. आम्हाला दोघींनाही खूप आनंद झाला. पण तेव्हा मात्र जाणवलं होतं बालपणीच्या आठवणी दोघींच्या मनात असल्या तरी काही वर्षांच्या अंतरामुळे थोडं बदललेलं होतं. आता तिची जिवलग मैत्रीण ज्योती होती, मी नव्हते. भारती, मी आणि ज्योती एकमेकींच्या मैत्रिणी होतोच कारण आम्ही एकाच वर्गात होतो पण ज्योती आणि भारतीचं वेगळं विश्व होतं आणि मी, छाया, गीता, आशा, वासंती असा आमचाही मस्त ग्रुप जमलेला होता. मैत्रीचा अगदी जिव्हाळ्याचा. भारतीचं आणि माझं काय नातं असेल ते असो पण आम्ही एकमेकींच्या आयुष्यात आजही आहोत. त्याच निरागस आठवणींसह. तितक्याच घट्ट मैत्रीच्या भावनेने जोडलेले आहोत.
पाहिलत ना ? या लेखमालेत, बदललेल्या आयुष्याच्या कितीतरी पुढच्या टप्प्यावर असतानाही पुन्हा पुन्हा माझं मन अगदी नकळत सहजपणे बालपणात जाऊन पाखरासारखं भिरभिरतं.
तर सांगत काय होते.. की, मित्र-मैत्रिणींच्या बाबतीत मी किती भाग्यवान आहे ! जळगाव तसं लहानसं गाव. जिल्ह्याचं ठिकाण म्हणून महत्त्वाचं. म्हणजे गावाचं क्षेत्रफळ किती, लोकसंख्या किती या भौगोलिक तपशीलात न पडता, इतकंच सांगेन की जळगावात सगळेच सगळ्यांना ओळखत असत. शेजारपाजारचे, गल्लीतले, समोरचे, बाजूचे तर असतच पण अगदी दुकानदार, सरकारी ऑफिस मधले, वकील, डॉक्टर, शिक्षक, बँकर्स सगळ्यांशीच एकमेकांचा चांगला परिचय असलेला जाणवायचा.
“चारुशीला पाटील” हे असंच जळगावातलं एक सर्वपरिचित, गुणी आणि अत्यंत गोड व्यक्तीमत्व. नुसतंच कौटुंबिक नव्हे तर सामाजिकही आणि अशा व्यक्तीशी माझं किती जवळचं नातं होतं आणि तेही अनेक वर्षापासून याची जाणीव झाल्यावर मी सुखावले. कारण चारू… आता मी “चारू” असाच उल्लेख करते. ही माझ्या जिवलग सखी अंजूची मोठी बहीण. दीदी. शिवाय माझ्या ताईची कॉलेजमधली एकदम गळ्यातली मैत्रीण. जग किती लहान असतं ना ? जळगावात स्थायिक व्हायचं ठरवल्यानंतर मनावर जो एक परकेपणाचा भाव सतावत होता तो, ”अगं दीदी जळगावतच असते.” हे अंजूने सांगितल्यावर लगेच ओसरला पण तरी मनात शंका होतीच. लग्नापूर्वीचं आयुष्य वेगळं आणि नंतरचं वेगळं. खूप काही बदल हे अपेक्षितच आणि स्वाभाविक असणारच. चारु आता, ”तीच आमची पूर्वीची दीदी असेल का ?” आता ती बॅरिस्टर बी.एन. पाटलांची सून, भल्या मोठ्या हवेली टाईप असलेल्या घरातलं तिचं वास्तव्य, श्री. घनश्याम पाटलांचा मोटार गॅरेज चा नावाजलेला वर्धित व्यवसाय, एकत्र कुटुंबातलं तिची “थोरली सून” ही मानाची ओळख आणि त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटनेतलं तिचं स्थान, पालिकेच्या महिला दक्षता विभागातलं महत्त्वपूर्ण पद आणि कार्य, तिची एक सामाजिक ओळख या सगळ्यांपुढे तिच्यासाठी “तिच्या धाकट्या बहिणीची अंजुची मैत्रीण किंवा तिच्या मैत्रिणीची बहीण” म्हणून नुकतीच जळगावात स्थायिक झालेली “मी” नक्की किती महत्त्वाची ठरू शकते ? फार तर एखाद्या वेळेस येईल भेटायला किंवा आम्हाला बोलवेल. एक नागरी कर्तव्य म्हणून. त्याहून अधिक महत्त्व “ती” मला कशाला देईल ? पण हा माझा भ्रम ठरला. कारण एका भेटीपुरताच आमचा संबंध न राहता पुढे अनेक वर्ष आम्ही मैत्रीच्या नात्याने अनौपचारिकपणे घट्ट बांधले गेलो. सहजपणे. आता चारू ही माझ्या मैत्रिणिची दीदी किंवा माझ्या मोठ्या बहिणीची मैत्रीण अशी ओळख न राहता मी आणि चारू आता सख्या मैत्रिणी झालो होतो. वास्तविक चारू आणि भाई (घनश्याम पाटील) आम्हा दोघांपेक्षा वयाने मोठे होते पण मैत्री आणि वय यांचे काही मोजमाप नसते. आम्ही चौघंही एकमेकांच्या प्रेमातच पडलो म्हणाना.

वास्तविक आम्ही जळगावला येण्यापूर्वीच चारु भाईंचा एक मैत्री ग्रुप होताच. जयश्री- अनिल कोतवाल, अलका -सतीश गुप्ता आणि मिस्टर अँड मिसेस सरोदे. पण चारुनेच आम्हाला या ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतले आणि एका सुंदर मैत्रीचं बीज आमच्या आयुष्यात अंकुरलं आणि गेल्या ५० वर्षात ते घनदाट बहरत गेलं.
नेहमीच मी चारुमध्ये एक बहुआयामी स्त्री पाहिली. तिची स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा, जुन्या पद्धतीच्या घराला आधुनिकतेची जोड देऊन जुना नव्याचा सुंदर संगम साधत सजवलेलं तिचं अत्यंत कलापूर्ण घर मला नेहमीच आकर्षित करायचं. जळगावात पहिलं ब्युटी पार्लर तिचंच, पहिला जीम आणि योगा वर्ग तिचाच. “सुंदर दिसावं आणि फिट् रहावं” या स्वयंस्फूर्तीतूनच तिने हे निर्मिलं. असे हे विविध व्याप सांभाळत आल्या गेल्यासाठी तितकाच गोड हसतमुख पाहुणचार करताना तिच्यातली “उत्तम सुगरण” मला नवलाईची वाटायची. ती नुसतीच सुगरण नव्हती तर एखाद्यासमोर पदार्थाची थाळी ठेवताना त्याची रचना, मांडणी इतकी कलात्मक असायची की खाणाऱ्याला ते पाहूनच भूक लागावी. चारूचं सुगरणपण हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल.
जसा ती पदार्थ लोभसपणे सजवायची तसेच ती स्वतःलाही अगदी काळजीपूर्वक सजवायची. घरात असो, बाहेर असो मला तिच्यात कधीही गबाळेपणा दिसलाच नाही. सदैव इस्त्रीत. तिचं मात्र एक म्हणणं असायचं की, “कुठल्याही वयातल्या स्त्रीने नीटनेटकं, रंगसंगती जमवून वेलड्रेस्ड का राहू नये ? त्यामुळे मन प्रसन्न राहतं.”
मी एकदा तिला म्हणाले होते, ”वेळ कुठे असतो गं ?”
तिने मला पार खोडून काढलं होतं. “सवय केली तर वेळ लागत नाही.”
हे मात्र खरं. कारण तिला स्वतःला तयार व्हायला कधीच वेळ लागायचा नाही. घरातून बाहेर पडण्यापूर्वी घरात असणाऱ्या लोकांची पूर्ण व्यवस्था करून.. म्हणजे कुणाचं जेवणासाठी ताट मांडून ठेवणं, कुणाची औषधं काढून ठेवणं, कुणाचे कपडे लावून देणं, कुणाचा डबा भरून देणं, जाताना प्रत्येकाला सूचना देऊन ती नीट नेटकी तय्यार होऊन प्रसन्न मुद्रेनेच बाहेर पडणार. कपाळावरच्या टिकलीपासून ते पायातल्या चपलेपर्यंत सगळं देखणं, रेखीव. तिला प्रत्येकाची आवड निवड माहीत असायची. कुणाला भेटायला गेली तर त्या घरातल्या माणसांना काय आवडतं याचा विचार करून त्यांच्यासाठी डबा घेऊन जायची. छायाच्या सासर्यांना तिने बनवलेली सुपारी आवडायची. विलासला पापडाचा चुर्मा, मिरचीचा ठेचा आवडायचा. अनिलला मेथीचं घुब्बड. (एक खानदेशी मेथीच्या भाजीचा रसयुक्त प्रकार.), सतीशला वालाचं बिर्ड हे सगळं लक्षात ठेवून ती आली की हे सर्व सोबत घेऊनच यायची. शिवाय सगळ्यांचं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत भरभरून कौतुकही करायची. प्रत्येकाचे चांगले गुण हेरून त्यास मनापासून दाद देणं हे तिचं स्वभाव वैशिष्ट्यच होतं. त्यामुळेच चारू खरोखरच घराघरात प्रिय होती. कुठे ती चारुमावशी होती कुठे ती चारुआत्या असेल तर कुठे मामी असेल पण सगळ्यांची आवडती.

पण तरीही एक होतं, आम्हा मैत्रिणींना तिचा धाकही वाटायचा. अर्थात गमतीशीर. ती येणार असली की मी अगदी घराचा कोपरा नि कोपरा स्वच्छ, व्यवस्थित ठेवण्यासाठी मेहनत करायची. एकदाच माझ्याकडे आमच्या ग्रुप करिता जेवण असताना चुकून तडा गेलेला ग्लास ठेवला गेला आणि तो तिच्या नजरेतून मुळीच सुटला नाही. ती काही बोलली तर क्षणभर तिचा रागही यायचा पण तो टिकायचा मात्र नाही कारण वेळोवेळी तिने अत्यंत मायेने, प्रेमाने, काळजीने आपल्यासाठी काय काय केलेय याची आठवण कशी पुसता येईल ?
एकदा माझा, रस्त्यात माझी ‘कायनेटिक’ घसरल्यामुळे अपघात झाला होता. मला खूप लागलं होतं. रस्त्यावर मदतीसाठी आसपास कोणीच नव्हतं. एका रिक्षावाल्याने पाहिलं आणि मला समोरच्या दवाखान्यात अॅडमिट केलं आणि तो तिथून सरळ चारूकडे गेला. त्याला माझ्याबद्दल एवढंच माहीत होतं की मी चारुताईंची मैत्रीण आहे. चारुनेही कायनेटिक वरून जाणारी मीच असणार हे ताबडतोब ओळखलं आणि भाईंना घेऊन ती हातातलं काम सोडून धावत दवाखान्यात आली. तिला पाहिल्यावर मला रडूच कोसळले. मी तिच्याकडे आरसा मागितला. अपघातात माझा एक दात पडला होता आणि वरचा ओठ फाटला होता. पण तिने फक्त माझा हात हातात घेतला आणि माझ्या हाताला झालेला तिचा तो अलौकिक नरम, मायेचा स्पर्श मी कधीही विसरू शकणार नाही.
चारुला स्वतःचं मूल नव्हतं पण तिने घराघरातल्या मुलांवर, नात्यातल्या मुलांवर मनापासून प्रेम केलं. त्यांच्या आवडीनिवडी जपल्या. कोणी आजारी झालं तर पटकन जाऊन इच्छा देवीला ती साकडं घालायची आणि प्रसाद अंगारा वगैरे घेऊन यायची. चारू आम्हा सगळ्याच मैत्रिणींच्या आयुष्यातला एक अतूट महत्वाचा सांधा होती. ती जाऊन आता बरीच वर्ष झाली पण आमच्या अस्तित्वाच्या कोपऱ्या कोपऱ्यात तिचं वास्तव्य आहे आणि ते तसेच टिकून राहणार आहे.
आयुष्यात महत्त्वाचं काय आहे याचा विचार करताना मला इतकंच वाटतं, “तुम्ही सुंदर नसलात तरी चालेल. सुंदर दिसणं आणि सुंदर असणं यात फरक आहे पण थोड्याशा प्रयत्नाने तुम्ही स्वतःला, तुमच्या भोवतालाला प्रसन्न आणि सुंदर नक्कीच करू शकता.”
चारुने हे कळत नकळत आमच्यावर बिंबवलं मात्र. आजही आम्ही मैत्रिणी भेटतो तेव्हा चारुची आठवण निघतेच. तिच्या हातच्या खाल्लेल्या अनेक चवदार पदार्थांचीही आणि चुकून जर कोपर्यात कुठे भिंतीवर जाळं राहिलं असेल तर “चारु काय म्हणाली असती ?” हे आठवून एकाच वेळी हसूही येतं आणि डोळ्यांच्या कडा आपोआप भिजतात.
“स्वत:वरही प्रेम करावे” हा एक महत्त्वाचा विचार चारूने मनात रुजवला हे नक्की.. ती वेगळी होती, ती खास होती.
क्रमशः

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800