Home लेख माझी जीवन नौका : ८

माझी जीवन नौका : ८

0

लोकपालक वर

आता जहाजाच्या रोजच्या वेळापत्रकाशी, रितीरिवाजांशी, अधिकाऱ्यांच्या श्रेणीशी, माझी हळूहळू ओळख होत होती.

जहाजावरती इंजिन साईड आणि डेक साइड असे कामाचे दोन विभाग पडतात. सर्व जहाजाचे प्रमुख कॅप्टन असतात. त्यातही मुख्य करून डेक साईडची सर्व कामे ते पाहत असतात. त्यांच्याखाली चीफ ऑफिसर, सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसर, कॅडेट्स असे अधिकारी असतात.

इंजिनरूम, त्यातली सर्व मशिनरी आणि जहाजावरची सर्वच यंत्रे यांचे प्रमुख चीफ इंजिनियर असतात. त्यांच्या हाताखाली सेकंड इंजिनियर, थर्ड इंजिनियर, फोर्थ आणि फिफ्थ इंजिनियर, तसेच इलेक्ट्रिकल ऑफिसर्स, हे ऑफिसर्स आणि फिटर्स हे पेटी-ऑफिसर्स काम करत असतात.

या सगळ्या अधिकाऱ्यांची भारतीय शिपिंग मध्ये गमतीशीर नावे पडली आहेत.

जहाजाच्या भाषेत कॅप्टनला कॅप्टनसाब किंवा मास्टर म्हणतात आणि आपापसातील बोलीभाषेत त्यांना *ओल्ड मॅन* असे म्हणतात. सर्व कॅप्टन्स वयाने, अनुभवाने मोठे, बरेच सीनियर व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांना हे नाव चिकटलं आहे.
चीफ ऑफिसरला चिफसाब, सेकंड व थर्ड ऑफिसर ना सेकंड मेट, थर्ड मेट म्हणतात.
चीफ इंजिनियरला बडासाब, मग सेकंड इंजिनीयर सेकंडसाब, थर्डला तीनसाब, मग क्रमाने चारसाब, पांचसाब‌ तर इलेक्ट्रिकल ऑफिसर्सना बत्तीसाब अशी बारशी केली आहेत.

फिफ्थ इंजिनियर्स, नुकते इंजिनियर होऊन आलेले, नवशिके असायचे. सगळे सीनियर ऑफिसर्स त्यांना *पांचू* म्हणायचे.
डेकसाईडचे कॅडेट्स तर वयाने लहान, सतरा अठरा वर्षाची मुलं असायची.

या धाकट्या मंडळींना पण घरची फार आठवण यायची. जसे काही माझ्यासारखेच ते नवे नवे सासरी आले होते. त्यामानाने सीनियर ऑफिसर्स जहाजाच्या जीवनाला…. खरंतर घरापासून दूर राहण्याला सरावलेले असत.खंबीर झालेले असत.

जहाज बंदरात उभं होतं. त्यामुळे मुकुंदाना इंजिन रूम मध्ये सकाळी सात ते संध्याकाळी पाच असे काम असायचे.

आमच्या केबिनसाठी आमचा स्टुअर्ड करवालो होता. तसेच टॉयलेट, बाथ टब, बाथरूम साफ करायला जो सफाई कामगार यायचा, त्याला टोपाझ म्हटलं जायचं.

आमचा सकाळचा नाश्ता, चहा करवालो केबिनमध्येच घेऊन यायचा. त्यात उपीट कधी पोहे, कधी इडली सांबार अगर डोसा त्याचबरोबर ब्रेड बटर, अंड्याचं आमलेट, दूध, कॉर्न फ्लेक्स असं सगळं असायचं. प्रत्येक केबिनमध्ये प्रत्येकासाठी भरपूर फळं आणून ठेवली जायची.

इंजिन रूम मध्ये एक फेरी टाकून, हाताखालच्या इंजिनियर्सना कामे वाटून देऊन मुकुंद चहा नाश्ता करायला केबिनमध्ये यायचे. ते इंजिन रूम मधे परत गेले की मी आरामात अंघोळ, कपडे धुऊन टाकणं वगैरे उरकायची.

त्यावेळी शिप वर चीफ ऑफिसर आणि कॅप्टन या दोघांच्याही बायका नुकत्याच आलेल्या होत्या. त्या दोघी माझ्यापेक्षा खूपच मोठ्या होत्या. त्यांना कॉलेजमध्ये जाणारी मुलं होती. ओळख करून घेण्यासाठी मला त्यांनी बोलावलं. मग डेकवर आम्ही तिघी फिरायला गेलो.

पहिला प्रश्न आला तो भाषेचा. त्या दोघींशी हिंदी किंवा इंग्लिश मध्ये बोलायला लागत होतं. माझा या दोन्ही भाषांमधला संवाद म्हणजे सगळा आनंदच होता. खरंच आपल्या भाषेची आपल्याला किती सवय असते ! नवऱ्या पलीकडे कोणाशी तरी मराठी बोलता यावं असं खूप वाटायचं.

सारं नवखं वातावरण. त्या दोघी तुझं शिक्षण काय झालंय, घरी कोण असतं, सासरी कोण कोण असतं वगैरे चौकशी करायच्या.

केबिनच्या बाहेर पडताना साडी नेसून व्यवस्थित तयार होऊन मी जायची. चीफ ऑफिसरची बायको कौतुकाने म्हणायची, “अभी देखो, नयी नवेली दुल्हन कैसी तयार हो के आयेगी |”
मला चीफ ऑफिसरचं आडनाव आता आठवत नाही. ते दोघे बंगाली होते. त्यामुळे तिचं हिंदी बंगाली ढंगाचं असायचं. थोडी काळी सावळी मध्यम उंचीची, साडी नेसणारी मध्यमवयीन होती. तिच्या हातात पांढऱ्या हस्तिदंताच्या आणि लाल बांगड्या होत्या. भांगात सिंदूर असायचा. बंगालमध्ये बायका अशा बांगड्या रोज घालतात असं तिने सांगितलं. वयाने माझ्यापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या. कॉलेजची शिक्षणं संपत आलेली त्यांची मुलं घरी होती.माझं मंगळसूत्र, कुंकू, पायातली जोडवी, बांगड्या यांचा त्यांना कौतुक वाटायचं.

कॅप्टन कुठार पारसी आणि त्यांची बायको ही पारसी होती. ती उंच, सडसडीत, गोरीपान, निळ्या डोळ्यांची, गुडघ्याच्या खाली जाणारा स्कर्ट व ब्लाउज घालणारी होती. ती थोडी यंग होती. खूप हसरी, मोकळी होती. हसताना तिचे डोळे बारीक व्हायचे. गुजराती ढंगाचं हिंदी बोलायची. तिच्याबरोबर शाळेला जाणारा त्यांचा मुलगाही दिवाळीच्या सुट्टीत थोड्या दिवसासाठी आला होता.ती नोकरी करणारी होती. तिला थोडीशीच रजा होती. तर चीफ ऑफिसरच्या पत्नीलाही मुलांसाठी  लवकर परत जायचं होतं.

अधून मधून आम्ही तिघी भेटायचो. त्या खूप प्रेमानं गप्पा मारायच्या. पण पदार्थ करणे, मुलांची शिक्षणं, महागाई, नोकरी, खरेदी, असे त्यांचे विषय असायचे. हे सगळे मोठ्या बायकांचे विषय मला त्यावेळी अजिबातच परिचित नव्हते. त्यामुळे त्यात कसा भाग घ्यायचा समजायचं नाही.
अगदी आपण सासुरवाशीण आहोत असंच वाटायचं.

अकराच्या सुमारास मुकुंद केबिनमध्ये यायचे. मी पण केबिनमध्ये परत यायची. सर्वच ऑफिसर्सना त्यावेळी लिंबू सरबत….. जहाजाच्या भाषेत लाईम ज्यूस दिला जायचा.

ते इंजिन रूम मध्ये गेले की माझं ही रोजचं गजानन विजयाचा एक अध्याय वाचणं, इतर पुस्तक वाचणं, कधी कधी ट्रंक उघडून अभ्यासाची पुस्तकेही बाहेर काढणं असं सुरू असायचं.
आई बाबा, प्रसन्न दादा, अतुल, आजी मावशी मामा मामी, मामे भावंडं आणि सासरी दादा वहिनी वृंदा यांच्या आठवणी व्याकुळ करायच्या.त्यामुळे मोठं काम होतं पत्रे लिहिणं. इतक्या नियमित पत्रलेखन आयुष्यात प्रथमच करत होते. माझे बाबा फार सुंदर पत्र लिहायचे.
ती सासर माहेरहूनची पत्रे मुंबईच्या ऑफिसच्या पत्त्यावर पाठवली जायची. ती पण आम्हाला अधून मधून मिळत होती.घरची खुशाली तर कळायचीच. पण घरच्या आठवणींनी गलबलून जायला होत होतं.
आपल्या माणसांची त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली पत्रं ही साक्षात भेटीची तहान भागवत होती. मी अक्षरशः त्याची पारायणं करायची आणि अर्थातच डोळे भरून यायचे. घरी असताना ज्या सहज रोजच्या परिचयाच्या पण फारसं लक्ष न दिलेल्या किंवा लक्षातही न येणाऱ्या गोष्टी…..त्या सगळ्या बारीकसारीक गोष्टींची आठवण ही उसळून यायची. अगदी घरातलं टेबल भांडीकुंडी, कपाटं, अभ्यासाची जागा, अगदी घरातली झाडणी सुद्धा…. सगळं….. सगळं आठवायचं !
या साऱ्यांनी अबोलपणे आपल्या आयुष्याला किती सुखी आनंदी बनवलं होतं याची नकळत जाणीव व्हायची.

दुपारच्या जेवणाच्या आधी मुकुंद केबिनमध्ये यायचे. बारा सव्वा बाराला केबिनमध्ये आले की त्यांचा अवतार बघण्यासारखा असायचा. अंगावर बॉयलर सूट चढवलेला, डोक्यावर कॅप, पायात इंजिन रूमचे शूज, बॉयलर सूटच्या गुडघ्यावरच्या आणि साईडच्या खिशांमधून  कुठे पाना, स्क्रू ड्रायव्हर वरच्या खिशात बॉल पेन अशा गोष्टी डोकावत असायच्या.
अंगावर परफ्युम मारावा तसा इंजिन रूमच्या ऑइलचा वास दरवळत असायचा. हातात लोकरीच्या गुंड्यासारख्या कॉटन रॅग्ज असायच्या. त्याला हात पुसतच हा माझा मुकुंदा एन्ट्री घ्यायचा. कधीकधी चेहऱ्यावर एखादा तेलाचा काळपट डाग असला तर मूर्तीचं सौंदर्य…..
काय वर्णन करू….. आणखीनच खुलून यायचं !

मग अंघोळ वगैरे करून मेस मध्ये जेवायला जायचं. जेवण करून दोनला केबिन मध्ये आलो की डोळ्यावर झोप दाटून आलेली असायची. तासभर झोप घेऊन मुकुंद परत साडेतीनला इंजिन रूम मधे उतरायचे.
साडेचार वाजता चहा बिस्कीट केबिनमध्ये यायचं. चहाला कधीतरी मुकुंद वर यायचे किंवा इंजिन रूम मध्येच चहा घ्यायचे.

चहा घेऊन मी काही वेळा डेकवर फेरफटका मारायला जायची. एकदा फिरत फिरत सहा डेक खाली कधी उतरले समजलंच नाही. शिपच्या सगळ्या मजल्यावरच्या केबिन्स, ऍलिवेज म्हणजे केबिनच्या मधले पॅसेजिस, हे एक सारखेच असतात.
जिने आणि ऍलिवेजच्या त्या भुलभुलैय्यातून फिरत फिरत अचानक खाली गॅंगवे जवळच्या शेवटच्या डेकवर पोहोचले आणि चुकायलाच झालं.

तिथले ते ठोकाठोकीचे आवाज, ऑइलचा वास, गुंडाळून ठेवलेले अगडबंब रोप्स, समोर जेट्टी कडे उतरणारा गँगवे, बॉयलर सूट किंवा युनिफॉर्म मध्ये काम करत असलेले लोक बघून गोंधळून गेले.

माझा गोंधळ बघून तिथे काम करणाऱ्या फिटरने मॅडम आप शायद रास्ता भूल गई हो. शुरू शुरू मे ऐसा होता है.”
मग मी परत निघाले तर मागून साद आली
मॅडम, इधर से नही उधर से मी चुकून क्रू ऍकोमोडेशनच्या दिशेने निघाले होते.

क्रू आणि ऑफिसर्स यांची ऍकोमोडेशन्स आणि मेस स्वतंत्र असतात, असं ज्ञानही मला त्या क्षणी प्राप्त झालं.

मग माझ्याबरोबर वाटाड्या म्हणून एक कॅडेट दिला. त्याने मला ऑफिसर्स ऍकोमोडेशन कडे आणून पोहोचवलं. तिथून सहा मजले चढून आल्यावर समोर आपली केबिन, वर सेकंड इंजिनियर असं नाव वाचलं आणि हुश्श झालं….. अगदी जत्रेत हरवलेल्या मुलाला आपलं घर सापडावं तसं !

डेक वरून आजूबाजूचा बंदराचा नजारा फार छान दिसतो. निरनिराळ्या जेट्टीना अनेक जहाजं उभी असतात. कुठे एखाद्या जेट्टीवर जहाजाच्या हॅचीस मध्ये माल भरणं – loading तर कुठे माल उतरवणं- unloading सुरू असायचं. धक्क्याच्या त्या बाजूला येऊन लागणारे ट्रक्स, loading – unloading करणारी अवाढव्य यंत्रं, क्रेन्स यांचे घर्र.. घर्र..चींsss असे आवाज, कुठे दुरुस्तीसाठी ठाकठोक सुरू असायची. कधी अवाढव्य क्रेन्स त्यांच्यासाठी घातलेल्या रुळावरून एका जेट्टीकडून दुसऱ्या जेट्टीकडे हलवल्या जायच्या. अखंड चालणारी कामे आणि यंत्रांचे आवाज यांनी बंदर सतत भरून गेलेलं असतं. बंदर कधीच झोपत नाही‌‌. चोवीस तास जागंचजे असतं. तिथे आळसाला वावच नसतो. एका बाजूला अखंड लाटा खेळवणारा समुद्र आणि एका बाजूला अखंड कामात बुडलेलं बंदर…. जणू यांच्यात अविरत उत्साहाची स्पर्धाच लागलेली असते.

एखादं जहाज बंदरात येऊन जेट्टीला लागत असेल तर त्याची हळुवार होणारी हालचाल, त्याला दिशा दाखवणाऱ्या पायलटच्या मोठ्या आवाजातल्या सूचना, त्या जहाजाच्या ब्रिजवरून किंवा डेक वरून वाजवणाऱ्या शिट्ट्या, त्या हालचालीबरोबर बदलणारे इंजिनचे आवाज आणि सावकाश पण सफाईदारपणे ते अनेक मीटर लांबीचं महाकाय धूड अलगद सहजपणे जेट्टी जवळ उभे राहायचं. टाकल्या जाणाऱ्या anchor – नांगराचा घडघड आवाज, त्याच्या फेअर लीड मधून डेक वरून बोलार्डला बांधण्यासाठी फेकले जाणारे दोरखंड, ते दोरखंड पकडून बोलार्डला बांधणारे भक्कम कामगार…..
जहाजाचा हा बंदरातला प्रवेश फार विलोभनीय असतो.

ऊन, पाऊस या कशाचीच पर्वा न करता अखंड काम करणारे ऑफिसर्स, कामगार लोक…. आणि यंत्रांच्या आवाजाचं त्या साऱ्याला मिळालेलं संगीत हे सगळं एक जिवंत नृत्यनाट्यच असतं. बा. सी मर्ढेकरांच्या  कविते प्रमाणे मलाही यंत्र युगातील नृत्याचा हा अविष्कार फार सुंदर वाटायचा.

मुकुंद संध्याकाळी केबिनमध्ये आले की अंघोळ वगैरे करून आम्ही फिरायला बाहेर पडायचो. आम्ही दोघं, हरिहरन् आणि एखाद दुसरा ड्युटी संपवून आलेला ऑफिसर बरोबर असायचा.
मग मार्केटमध्ये भटकायचं, काही बारीक सारीक आणि कधी उगीचच खरेदी करायची. कधी कधी बाहेरच जेवण घ्यायचं आणि जहाजावर रात्री परत यायचं.

जहाजावर रात्रीचं जेवण सर्वांसाठी संध्याकाळी साडेसहा वाजता असायचं. हा सगळा ब्रिटिश खाक्या होता. सकाळी ब्रेकफास्ट, दुपारचं लंच आणि रात्री डिनर यांचा रोज छापलेला मेनू डायनिंग टेबलवर असायचा.

अगदी इंटरनॅशनल खाना असायचा. ज्या प्रदेशात आपण असू त्या प्रदेशाची करी असं शिजवलेल्या मसालेदार डाळीला  नाव असायचं. म्हणजे आंध्रात असेल तर आंध्रा करी, बंगाल मध्ये असेल तर कलकत्ता करी, गोवा करी, मद्रास करी असं ! पण कोणी सत्यदेव म्हणा, कोणी सत्यनारायण म्हणा तसं शेवटी प्रांताचे नाव बदललं तरी करीची चव एकच असायची. इतक्या विविध प्रांतांच्या कऱ्या एकाच चवीच्या करायचं कसब फक्त जहाजाच्या कुक्सनाच साध्य करता येतं !

आम्ही फिरून आलो की सर्व स्टुअर्ड्स ड्युटी आवरून परत गेलेले असायचे. आमचं जेवण हॉट प्रेस मध्ये ठेवलेलं असायचं. हॉट प्रेस मधून ते बाहेर काढून एकत्र जेवायचो.
रात्रीच्या जेवणात पोळ्या पराठे दुपार प्रमाणेच भाजी, डाळ, सॅलड, नॉनव्हेज डिश असायच्या. काहीतरी गोड पदार्थही – पुडिंग, शिरा आईस्क्रीम, खीर वगैरे असायचं. रात्रीच्या जेवणात भात असायचा नाही.

इथे येऊन आठवडा होऊन गेला होता. पण जहाज अजूनही बंदरात जेट्टीलाच उभं होतं. आता जहाज पुढे कुठे जाणार, आपल्याला कुठला देश बघायला मिळणार, याची खूप उत्सुकता वाटत होती.

पुढच्या कार्यक्रमाबद्दल शिपच्या ऑफिसर्स मध्ये नेहमी चर्चा  चालायच्या. त्याबद्दल रोज काहीतरी नवी बातमी यायची. काहीतरी तर्क लढवले जायचे. त्यामुळे माझी उत्सुकता तर पार शिगेला पोहोचली होती.

पण जहाजाचा पुढचा कार्यक्रम मुंबई ऑफिस मधे अजून ठरायचा होता. त्यांच्याकडून अजून कुठलाच फायनल मेसेज आला नव्हता.

आता प्रतिक्षा होती ती पुढच्या प्रवासाची !
क्रमशः

— लेखन : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version