Home लेख मुलामुलींनो, नाउमेद होऊ नका !

मुलामुलींनो, नाउमेद होऊ नका !

0

पालकांशी झाले बोलून आता मुलामुलींनो मला तुमच्याशी बोलायचे आहे !
खरे सांगायचे तर आज तुमच्याशी संवाद साधताना मन विषण्ण आहे. तुमची मनोवस्था बघून अत्यंत दुःखी आहे.आपला काहीही दोष नसताना आपल्याला जेव्हा विनाकारण शिक्षा भोगावी लागते तेव्हा होणाऱ्या वेदना मी समजू शकतो. तुमचे उमलते वय, उत्साहाने भारलेले, स्वप्नांनी भरलेले अशा कोवळ्या स्वप्नांची जेव्हा राख होते तेव्हा होणाऱ्या जखमा कधीही भरून न निघणाऱ्या असतात. आपण मन लावून अभ्यास करतो, जीवापाड कष्ट करतो, आपले आईवडील देखील जीवाचे रान करून, हाल अपेष्टा सहन करून आपल्या शिक्षणासाठी, भविष्यासाठी झटतात. त्यांच्याही स्वप्नांची एका क्षणात राख रांगोळी होते. हे खरेच अकल्पनीय आहे. दुष्टतेचा कळस गाठणारे आहे.

आज आपली सामाजिक नैतिकता इतक्या खालच्या पातळीवर गेली आहे की आपली आपल्यालाच लाज वाटली पाहिजे. जे शिक्षक, प्राध्यापक मुलांना, घडविण्याचे, द्यान दानाचे पवित्र काम करतात तेच पैशाच्या लोभाने भ्रष्टाचाराच्या नरकात कुजत आहेत. लाखो विद्यार्थ्याच्या स्वप्नांची राख रांगोळी करीत आहेत, क्षुल्लक स्वार्थापोटी!यात आणखीन विषण्ण करणारी बाब म्हणजे तुमच्या पैकीच काही मुले मुली, त्यांचे गर्भ श्रीमंत पालक मोहाला बळी पडून, कोचिंग क्लासच्या मोह जाळात फसून हा भ्रष्टाचाराचा व्यवहार करीत आहेत.हे वाम मार्गाने मिळवलेले यश कितपत टिकणार आहे ? पैसे देऊन पास होणे, लाखोच्या देणग्या देऊन प्रवेश घेणे, मग तिथे गेल्यावरही पास होण्यासाठी दरवर्षी तोच, तसाच भ्रष्टाचार करत राहणे.. ही अशी मिळविलेली डॉक्टरची पदवी कोणत्या कामाची ? अशा मुन्नाभाई बदमाश डॉक्टर कडून त्यांचे स्वतःचे आईवडील तरी उपचार घेतील का ? खरेच हे सगळे भयानक, कल्पनातीत आहे.

एरवी स्त्री म्हटले की पावित्र्याची मूर्ती, प्रेमळ माता, दया करुणेची मूर्ती..वगैरे प्रतिमा आपल्या मनात साठवल्या आहेत. पण पकडल्या गेलेल्यात स्त्री शिक्षिकाची संख्या लक्षणीय आहे. या बायकांना मुले बाळ नाहीत का ? आपली आई जेलमध्ये गेलेली, भ्रष्टाचाराची पुतळी आहे हे बघून काय लाजीरवाणी अवस्था होईल त्या कोवळ्या जीवांची?

मला खरेच काळजी वाटते तुमची. आज लाखो विद्यार्थ्यांना त्यांचा काही दोष नसताना पुनः परीक्षा द्यावी लागते. पुन्हा अभ्यास, पुन्हा टेन्शन, तेच दडपण..या कोवळ्या जीवांनी सहन करायचे तरी किती ? आश्चर्य म्हणजे या सर्वाला कारणीभूत असलेले एन टी ए चे अधिकारी, या परीक्षेची योजना करणारे प्राध्यापक, त्या कमिटी वर काम करणारे मोठमोठे अधिकारी.. सगळे मूग गिळून स्वस्थ बसले आहेत. खरे तर या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे येऊन दिलगिरी व्यक्त करणे, विद्यार्थ्याची, पालकांची क्षमा मागणे अपेक्षित होते. पण त्यांचे कातडे गेंड्याचे असावे. शिक्षण मंत्री देखील काही विशेष गंभीर न झाल्यासारखे थंड, निष्क्रिय आहेत! एरवी मन की बात मधून, परीक्षेपे चर्चा मधून मोठमोठ्या गप्पा मारणारे, शहाणपणाचे डोस देणारे शासन कर्ते देखील काहीच न घडल्या सारखे आपल्याच धुंदीत, आपल्याच राजकारणात व्यग्र आहेत.

खरे तर सध्या चालू असलेले भयंकर युद्ध, त्या परिणाम स्वरूप निर्माण झालेली इंधन टंचाई, आर्थिक त्सुनामी..या इतकेच हे तरुणाचे भाव विश्व कुस्करून टाकणारे राक्षसी कृत्य महा भयंकर आहे. पण त्याचे कुणालाच काही वाटत नाही. मला तुमच्या भाव विश्वात उसळलेला लाव्हा स्पष्ट दिसतो आहे. तुमची जीवघेणी अस्वस्थता स्पष्ट दिसते आहे. प्रचंड निराशेने काळवंडलेले तुमचे मन बघता येते सहज मला.. पण काही गोष्टी खरेच आपल्या हातात नसतात.

आजची परिस्थितीच इतकी विचित्र आहे की दुसऱ्या कुणाच्या चुकांचे परिणाम आपल्याला विनाकारण भोगावे लागतात. तुम्ही नियम पाळून रस्त्याने चालत असला तरी दुसरा कुणी बेदरकारपणे गाडी चालवत तुमचा जीव घेऊ शकतो. आणि पैशाच्या, सत्तेच्या बळावर त्यातून सही सलामत सुटू देखील शकतो !
हे जगच भ्रष्टाचाराच्या भस्मासुराने पादाक्रांत केले आहे. या चौकशा, हे तपास सगळी नाटकं आहेत. छोटे मासे पकडले जातात. खरी यंत्रणा सत्तेच्या जोरावर कुंपणाच्या बाहेर टाळ्या वाजवत असते. इतके गुन्हे घडले. हत्या, आत्महत्या घडल्या.. हजारो कोटींचे घोटाळे झाले. पण कोण पकडले गेले ? इ डी, सी आय डी, एस आय टी, सगळी देखाव्याची नाटकं आहेत. यातून खरे गुन्हेगार कधीच बाहेर येत नाहीत. अपुरे पुरावे, संशयाचा आधार, गुन्हा सिद्ध करण्यात अपयश अशी ठरलेली कारणे दाखवत न्याय यंत्रणा देखील हतबल झालेली दिसते. न्यायालयात न्याय मिळत नाही. मिळतो तो मनस्ताप हे अनेक दशकापूर्वी येऊन गेलेल्या कानून पिक्चरने सिद्ध केले आहे !

एक लक्षात ठेवा. आपल्याला याच जगात राहायचे आहे. याच परिस्थितीत जगायचे आहे. तुम्ही इराण इस्रायल युद्ध थांबवू शकत नाही. तुम्ही ट्रम्प ला समजावू शकत नाही. तुम्ही तुम्हीच निवडून दिलेले सरकार बदलू शकत नाही. तुम्ही या व्यवस्थेला नावे देखील ठेऊ शकत नाही. कारण हे सरकार आपणच निवडून दिलेले. ही व्यवस्था आपणच निर्माण केलेली. हे भ्रष्टाचारी राक्षस आपलेच भाऊ..हे गुंड, ही विनाशी, विषारी प्रवृत्ती ही आपल्याच व्यवस्थेची निर्मिती..हे विसरून कसे चालेल ? यावर उपाय ? आपण आपला संयम ढळू न देणे..आपण या व्यवस्थेचा भाग न होता डोक्यावर बर्फ ठेऊन स्वस्थ बसणे.. यापासून अलिप्त राहणे. आपण आपले कर्तव्य बजावत राहणे. शेवटी यश अपयश हे आपल्या हातात नसते. ते नशिबाचा भाग म्हणून स्वस्थ बसावे. धीर सोडू नये. गर्दी एका दिशेला जातेय म्हणून आपणही त्या गर्दीच्या मागे जाऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. आपण आपली स्वतंत्र वेगळी वाट शोधावी. कदाचित फार गर्दी नसलेली एकट्याची वाट असेल ती. पण कुणास ठाऊक त्या वाटेवर पुढे कुठे तरी सुंदर नंदनवन असेल. सुगंधी बाग असेल. खूप दूर क्षितिजावर सप्तरंगी इंद्र धनुष्य दिसेल. खळाळता झरा दिसेल.. गर्दी नसली तरी आवडीचा निसर्ग असेल सोबतीला. शेवटी नैसर्गिक गोष्टीनाच मूल्य असते. कृत्रिम कछकड्याच्या बाहुल्या केव्हाही तुटून पडतात. तेव्हा अगदीच निराश होण्याचे, खचून जाण्याचे काहीच कारण नाही. तुमचेही चांगले दिवस येतील.

आजकाल ऋतुचक्त आरपार बदलले आहे. सगळीकडे लाव्हा उसळल्या सारखे तापले आहे.. पण वातावरण शांत, थंड करणारे ढग देखील येतील, बरसतील…पुन्हा हिरवळ उगवेल, बागा बहरतील. हेही दिवस जातील. माझा अनुभव सांगतोय. आशेला जागा आहे. तेव्हा काळजी नको. उत्साह हवा. जोश हवा. शुभेच्छासह..

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू .हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version