दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे नुकतेच मुंबई जिल्हा साहित्य संमेलन झाले. मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित केले गेले होते. संमेलनात ‘न्यूज स्टोरी टुडे’ या वेब पोर्टलचे संपादक आणि माझे जुने सहकारी देवेंद्र भुजबळ यांची भेट झाली. मग अर्थात बऱ्याच गप्पा वगैरे झाल्या. निवृत्त झाल्यावरही भुजबळ यांचे विविध प्रकारचे सुरू असणारे काम मी जवळून पहात आहे. त्याबद्दल मला त्यांचे कौतुक वाटते. गप्पा सुरू असताना त्यांनी आपली पिशवी उघडून त्यातील आपल्या प्रकाशनाची नवी दोन पुस्तके काढली आणि मला दिली. ‘माध्यम भूषण’ आणि कोवळे ऊन हा नीला बर्वे यांचा कथासंग्रह.
प्रथमदर्शनीच दोन्ही पुस्तके मला आवडली. त्यांची निर्मिती छान झालेली आहे. मुखपृष्ठे कलात्मक आहेत. कागद चांगला वापरलेला आहे. ‘फॉन्ट’ची निवडही काळजीपूर्वक केलेली आहे. कोणतेहि पुस्तक माझ्या हातात आले की मी पहिल्यांदा ह्या गोष्टी पाहतो मग मजकुरावरून नजर टाकत शुद्धलेखनाच्या चुका शोधत राहतो. (किंवा त्या मला आपोआप दिसू लागतात.) या पातळीवर जेव्हा माझी निराशा होते तेव्हा ते त्या पुस्तकांचे अपयश आहे हे माझ्या लक्षात येते आणि मी ते बाजूला ठेवतो. या पार्श्वभूमीवर ही दोन्ही पुस्तके मला उत्तम वाटली. घरी आल्या आल्या ती प्राधान्याने वाचली आणि संतोष पावलो.

जीवनाच्या विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या ३६ मान्यवरांवर जीवनावर आधारित लेखांचे संकलन म्हणजे ‘माध्यम भूषण’ हे पुस्तक ! त्यातील बहुतेक सगळे मान्यवर आणि त्यांचे काम जवळून पाहण्याची संधी मलाही मिळाली आहे. त्यामुळे पुस्तकाने मला आपल्याकडे ओढून घेतले. “एखाद्या समाजात काम करणाऱ्या उत्तम माणसांची माहिती घेणे म्हणजे त्या समाजाचे चरित्र समजून घेणे” अशा आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. माध्यमभूषण या पुस्तकाकडे पाहत असताना मला ते सतत आठवत होते.

असाच गोड अनुभव नीला बर्वे यांच्या कोवळे ऊन या कथासंग्रहाने दिला. हल्ली कथासंग्रह खूप निघत असतात. त्यांचे पुढे काय होते याची नेमकी कल्पना येत नाही. पण काळाच्या ओघात उत्तम ते टिकते आणि सामान्य ते इतिहासजमा होऊन जाते हे सोपे उत्तर आहे. नीला बर्वे यांच्या कथा समांतर काळाचा अनुभव देणाऱ्या झाल्या आहेत हे लक्षात आले. नीला बर्वे या मूळच्या मुंबईकर पण मुलाच्या नोकरी व्यवसायानिमित्त आता परदेशी राहणाऱ्या. गेल्या पंधरा वर्षातील १६ कथा त्यांनी या संग्रहात दिल्या आहेत. मानवी भावभावनांचे विविध कंगोरे या कथा मधून वाचकाच्या समोर येतात. कथालेखनासाठी आवश्यक असणारी प्रतिभा त्यांना प्रसन्न आहे. त्यांची शब्दकळा, शैली, अनुभवाला सामोरे जाण्याची असोशी आणि घटना प्रसंगातील नावीन्य टिपण्याची संवेदनशील वृत्ती त्यांच्या सोबतीस आहे त्यामुळे हे पुस्तक वाचनीय आणि संग्राह्य झाले आहे.
प्रत्येक कथेनंतर त्यांनी शेवटी क्यूआर कोड दिला आहे. तो स्कॅन करून वाचकाला जगात कुठेही या कथा लेखिकेच्या आवाजात ऐकता येतात. हे त्यांच्या पुस्तकाचे एक वेगळेपण ठरले आहे. विशेषतः वरिष्ठ नागरिकांची आणि दृष्टिहीन वाचकांची त्यामुळे खूप चांगली सोय झाली आहे.
साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात एखाद्या कृतीचे शास्त्रोक्त पद्धतीने मूल्यमापन करण्याची पद्धत आपल्याकडे विकसित झाली नाही असे खेदाने म्हणावे लागते. दुसऱ्याचे मनमोकळेपणाने कौतुक करण्यासाठी सर्वांनी हिरीरीने पुढे आले पाहिजे हा मुद्दा आता अनेक विचारवंत आपल्या अविष्कारांमधून सर्वच व्यासपीठावरून स्पष्ट करू लागले आहेत.
रसिकांनी, जबाबदार वाचकांनी, समीक्षकांनी अशा पुस्तकांच्या आस्वादक समीक्षेसाठी आणि त्यांच्या अभिसरणासाठी जबाबदारीने पुढे यावे किंबहुना एखादी व्यवस्था निर्माण करावी असे सतत मला वाटत राहते. भुजबळ यांनी सुरू केलेले वेब पोर्टल आणि प्रकाशन संस्था ही त्याच आस्थेपोटी जन्माला आलेली आहे. मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. नीलाताई यांच्या कथा मराठी साहित्याच्या विश्वात माणुसकीची प्रेमाची संवेदनशील वृत्तीची नवी उब निर्माण करतील आणि माध्यम भूषण मधील सगळ्या व्यक्ती तशाच प्रकारच्या अन्य उपक्रमात धडपडत असणाऱ्या मंडळींना उमेदीचा हात देतील अशी मला खात्री आहे.
भुजबळ यांनी त्यांच्या प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केलेली इतरही अनेक पुस्तके मी पाहिली आहेत. या माध्यमातून लेखकांना प्रोत्साहन द्यावे आणि वाचकांच्या समोर काही विचारांची मांडणी करावी हा ही त्यांची भूमिका अतिशय कौतुकास्पद आहे आणि फायदा तोट्याचा विचार न करता ते हे काम जिद्दीने आणि प्रामाणिकपणे करत आहेत हे मला खूप महत्त्वाचे वाटते
या पुस्तकांचे नेमके सौंदर्य काय आहे या गुपिताची मी उकल न करता ती पुस्तके रसिकांनी विकत घेऊन वाचावी आणि संग्रही ठेवावी, इतरांना त्याची शिफारस करावी, एक सुंदर समाजमन तयार करण्याच्या प्रयत्नामागील प्रक्रिया समजून घ्यावी आणि त्यातील आनंद मिळवावा हेच अधिक महत्त्वाचे !

— परीक्षण : प्रल्हाद जाधव. निवृत्त माहिती संचालक,
नाटककार, लेखक. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

प्रल्हाद जाधव सरांनी दोन्ही पुस्तकांचा अतिशय उत्तम परिचय करून दिला आहे. प्रल्हाद जाधव सरांचे आभार व अभिनंदन आणि दोन्ही पुस्तकांचे लेखक श्री. देवेंद्र भुजबळ सर आणि लेखिका नीला बर्वे ह्यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐