सात वर्षांपूर्वीच्या कार्यक्रमाची आठवण आज फेसबुकने करून दिली. त्यावेळी व्यक्त केलेले विचार, आजच्या जागतिक परिस्थितीत अधिकच संयुक्तिक असल्याने, तेव्हाचा वृत्तांत आज पुढे देत आहे.
— संपादक
“मानवी हक्क म्हणजे मानवास मिळालेले नैसर्गिक हक्क” असे सांगून आपले हक्क जपले जावेत म्हणून नागरिकांनी दक्ष रहावे, असे आवाहन निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या प्रख्यात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पोलीस प्रवाह न्यूज़ व अमर प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या, “मानवी हक्क, सायबर गुन्हे आणि प्रसार माध्यमांची भूमिका” ह्या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात बोलत होते.

श्री भुजबळ पुढे म्हणाले की, पहिल्या महायुद्धापूर्वी दोन राजे, त्यांचे सरदार आणि त्यांचे सैनिकच लढत. त्यामुळे युद्धात सैनिकच मृत्युमुखी पडत, जायबंदी होत. नागरिकांना मृत्युमुखी पडावे लागत नसे वा जखमी व्हावे लागत नसे. परंतु, पहिले महायुद्ध हे आधुनिक शस्त्रे, अस्त्रे यांनी लढलं गेलं. त्यामुळे नागरी जीवितहानी झाली. खूप नुकसान झालं. हे टाळण्यासाठी १९१९ मध्ये “लीग ऑफ नेशन” ही संस्था स्थापन केली गेली. दुसऱ्या महायुद्धात तर अधिकच नागरी जीवितहानी, वित्तीय नुकसान झाले. जगात शांतता प्रस्थापित व्हावी, ती कायम रहावी, सर्वच राष्ट्रे विकसित व्हावी म्हणून १९४८ साली युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन (युनो)ची स्थापना करण्यात आली. युनोतर्फे डिसेंम्बर १९४८ मध्ये मानवी हक्क जागतिक जाहीरनामा तयार करण्यात आला. सर्व राष्ट्रांनी या जाहिरनाम्यावर स्वाक्षरी केली.त्यावर भारताची देखील स्वाक्षरी आहे. १९५० मध्ये युरोपियन परिषदेत मानवी हक्क मिळण्यासाठी यंत्रणा निश्चित करण्यात आली. दरम्यान तयार होत असलेल्या भारतीय राज्य घटनेत या हक्कांचा समावेश करण्यात आला. १९६५ साली नागरी, राजकीय हक्क यासाठी जागतिक परिषद झाली. या परिषदेतील ठरावांची प्रत्यक्ष अंमलबजावणी डिसेंबर १९७६ पासून सुरू झाली.

भारताचे मा. राष्ट्रपती यांनी २८ सप्टेंबर १९९३ रोजी वटहुकूम काढला.भारत या अंमलबजावणीत सहभागी झाला.संसदेत विधेयक मांडलं. तें मान्य झालं. भारतात १ जानेवारी १९९४ पासून मानवी हक्क कायदा अंमलात आला. पुढे यथावकाश राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य मानवी हक्क आयोग स्थापन झाले, असे प्रतिपादन करून व्यापक जनजागृतीसाठी प्रसार माध्यमे अधिक चांगली भूमिका कशी बजावू शकतील याबाबत विवेचन केले.

पोलीस प्रवाह न्यूज़च्या संपादक श्रीमती रिटा कदम यांनी माध्यमकर्मींनी अष्टपैलू असण्याची गरज विषद केली.
अमर प्रतिष्ठाणचे प्रमुख श्री संदीप नाईक यांनी समाजात घडत असलेल्या विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची सखोल माहिती देऊन प्रत्येक नागरिकाने जागरूक राहण्याचे महत्व पटवून दिले.
प्रा. डॉ. उत्तम पाठारे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा डॉ. लहू गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. दत्तात्रय मोहिते यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी प्राचार्य श्रीकांत शेवाळे, उपप्राचार्य होले, संपादक नवनाथ कापले, प्रा.राजेंद्र सोनावणे आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधानही करण्यात आले. परिसंवाद अत्यंत उद्बोधक झाल्याने उपस्थितांच्या विचारांना नवी दिशा मिळाली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
