काय सांगू माय माझी
आज ओटिवरी नाही
पान कुटण्याचा तो नाद
आज कानावर नाही
गाय वासरू पाजेना
बैल चारा तो खाईंना
गोजीरवाणे रुप तुझे
डोळ्या पुढून जाईना
भरलेले घर माझे
आज सूनेसूने वाटे
आठवाने आज तुझ्या
उरी महापुर दाटे
भरलेले घर माझे
आज वाटते उदास
चुलीवरच्या भाकरीचा
मज होतो आहे भास
थंड पडलेल्या जात्याला
येतो डांगराचा वास
शेतामंदि राबलेले
तुझे कष्टकरी हात
पाठीवरुन फिरताना
करीत मायेची बरसात
तुझा करारी तो बाणा
व्हता गावात दरारा
येताजाता साद देती
वाटेच्या त्या वाटेला
आंगण तुझे फुललेले
नातवंडांचा किलबिलाट
सुट्टी मध्ये येतो म्हणती
आई बघशील ना तु वाट?
गेली मायेची सावली
उभे आम्ही निंबरात
याद तुझी सदा राहील
आमुच्या या ह्रुदयात.
– रचना : स्मिता लोखंडे.
आज पर्यंत आई वडील भाऊ बहीण इत्यादी नात्याला कवितेनं गुंफणारे अनेक झाले किंबहुना असतात परंतु आपल्या सासूबाई न वर कविता करणारी एखादीच गुणी सुनबाई असते या कवितेचे कवयित्री स्मिता लोखंडे यांनी अतिशय सोप्या शब्दात त्यांचं सासुशी असणार नात व्यक्त केलं आहे अभिनंदन स्मिता आणि अभिनंदन प्रसिद्धी देणाऱ्या Mr&Mrs भुजबळ यांना