“भद्रकाली नाट्य संस्थेच्या” माध्यमातून ३८ नाटकांचे लेखक- निर्माता- दिग्दर्शक आणि अभिनेता असलेले, मालवणी भाषेतील अमर नाव म्हणजे मच्छिंद्र कांबळी. त्यांच्या एकेका नाटकाचे शेकडो प्रयोग झालेले आहेत.
“घास रे रामा” , “पांडगो इलो रे बा इलो”, “केला तुका नि झाला माका”, “फादर माझा गाॅडफादर”, “येवा कोकण आपलाच आसा”, “चाकरमानी” , “धुमशान”, “भैय्या हातपाय पसरी” ,”माझा पती छत्रपती” आहे. “वय वर्षे ५५”, “वस्त्रहरण” ही त्यांची गाजलेली नाटके.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. मच्छिंद्र कांबळी यांना जयंती निमित्त भावपूर्ण आदरांजली.
– संपादक.
झेंडो रोवल्यान मालवणी भाषेचो
नाट्यसम्राट मच्छिंद्र कांबळी बापून
त्येनचो जन्मदिवस चार एप्रिल
मानवतो मालवणी भाषा दिन //१//
आसा आमच्या मायेचा स्थान
मालवणी भाषा हटकेपार
नाटकाच्या माध्यमातसून
गेली साता समुद्रापार //२//
मालवणी भाषा ऐकताना
कानाक मधुर वाटता
बोलताना तान-सुरात
अभिमान आमका वाटता //३//
आवशीक खाल्ल्यान रांडेच्याक
जिभेर गाळी रेंगाळता
आपला खावचा नि दडान हगाचा
विनोदी म्हणी मालवणीत ऐकता //४//
भारसून काटे नि आतसून रसाळ
फणसाच्या उपमेत मालवणी शोभता
साधो-भोळो प्रामाणिक माणूस
अख्ख्या विश्वात कोकणात गावता //५//
निसर्गरुपी स्वर्गात कोकण वसला
मालवणी भाषा प्रसारमाध्यमात झळाकता
साधू-संत वीर राजांच्या भूमीर
मालवणी भाषा मशाली पेटवता //६//
— रचना : सौ.वर्षा भाबल. नवी मुंबई
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800