माहिती व जनसंपर्क खात्यातील बॅचमेट आणि माझे जिवलग मित्र श्री देवेंद्र भुजबळ अशा आम्ही दोघांनीही माहिती विभागात कसा प्रवेश केला त्याच्या काही आठवणी देत आहे…..
देवेंद्र आणि माझी दोस्ती सुमारे ४० वर्षांची. ते १९८३-८४ साली पुणे विद्यापीठात जर्नालिझम चा कोर्स करीत होते, त्याच वेळी तोच कोर्स मी नाशिक येथे करीत होतो.
या कोर्स च्या परीक्षेसाठी मी पुणे येथे गेलो असता, तिथे आमची प्रथम भेट झाली. कोर्स पूर्ण झाल्यावर मी काही काळ नाशिक महानगर पालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. पुढे माझी माहिती खात्यात माहिती सहायक म्हणून निवड झाली. १९८५ साली माहिती सहायक म्हणून मालेगाव उप माहिती कार्यालय येथून नगर जिल्हा माहिती कार्यालयात मी बदलून गेलो. श्री ब ऊ कोतवाल साहेब त्यावेळी तिथे जिल्हा माहिती अधिकारी होते.
दरम्यान देवेंद्र ही केसरी पेपर सोडून नगर येथे केसरी प्रकाशनाच्याच साप्ताहिक सह्याद्रीचे नगर जिल्हा प्रतिनिधी म्हणून नगर येथे आले. त्यामुळे कामाच्या निमित्ताने आमच्या नियमित गाठीभेटी होऊ लागल्या.
पुढे देवेंद्र नगर येथून मुंबई दूरदर्शन येथे सहाय्यक निर्माता म्हणून रुजू झाले. तर मी ही ठाण्यात बदलून गेलो. माझे मुलाखती घेण्याचे कौशल्य त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी मला मुंबई दूरदर्शनवर, रोज रात्री ८.३० या प्राईम टाईम मध्ये प्रसारित होणाऱ्या “सामाजिक सुरक्षितता” या कार्यक्रमात, विविध मुलाखती घेण्याची संधी दिली. त्यावेळी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. त्यामुळे मी महाराष्ट्र भर ओळखल्या जाऊ लागलो.
ठाण्यात असतांना एक दिवस महाराष्ट्र टाईम्स मध्ये जिल्हा माहिती अधिकारी पदाची जाहिरात आली. मी तर अर्ज केलाच पण त्यांनाही अर्ज करायला लावला. ठाण्याचे तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी उदयगिरी महंत यांच्याकडून जिल्हा माहिती अधिकारी या पदाची जुनी प्रश्नपत्रिका आम्ही घेतली व ठाण्याच्या माझ्या निवासस्थानी रात्रभर तयारी केली. आम्ही ती परीक्षा दिली.
यथावकाश आम्हा दोघांची सरळ सेवेने जिल्हा माहिती अधिकारी म्हणून सन १९९१ साली नियुक्ती झाली. आणि आम्ही सहकारी झालो.
भुजबळ साहेब यांनी अनेक चढ उतार पाहिले.
अतिशय जिद्दीने व कष्टाने एकेक पायरी चढत ते संचालक पदापर्यंत पोहोचले.
सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी, अफाट जनसंपर्क, प्रामाणिकपणा व सचोटी हे त्यांचे गुण मला फार भावतात.
त्यांची एकुलती एक कन्या देवश्री हिने सुद्धा वडिलांची पत्रकारिता जपून ठेवण्यासाठीच इंग्रजी दैनिकांत काम सुरु केले. नुकतीच तिची अमेरिकेतील प्रख्यात, न्यूयार्क स्थित कोलंबिया विद्यापीठात मास्टर्स इन जर्नालिझम साठी निवड झाली.
तर माझी कन्या भावना हिने 14 वर्षांपूर्वी अमेरिकेत मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स हा कोर्स केला. सध्या जगातील टॉप टेन कंपन्यांपैकी एक असलेल्या Oracle मध्ये अटलांटा येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.
असा हा आमचा जीवन प्रवास, त्यातील काही आठवणी थोडक्यात दिल्या आहेत.
– लेखन : विजय पवार.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, नासिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800