रात्र संपली पहाट फुलली
क्षितिजी त्या मग फुटे तांबडी
फेकून दुलई अंधाराची
सकाळ हासरी नाचत आली
नवतरुणी परी अवगुंठीत ही
ओढी ओढणी फिक्या धुक्याची
अवचित वारा झुळझुळ वाहे
ओढणीस त्या उडवू पाहे
खट्याळ्यास त्या दाद न देई
घट्ट धुक्यासि लगटूनि घेई
मधु गुंजारव किलबिल कानी
उषा लाजली निबिड विपिनी
सकाळ आठवे रूप तयाचे
स्वप्नी पाहिल्या राजसख्याचे
कधी भेटशील मला सजण तूं
अवगुंठण हे दूर करी तूं
आणि पावला मदन तियेला
गगनी उगवला सायंतारा
खजिल,अधीर ती होई बावरी
सुप्रभाती शशी काय हा करी?
दाट धुक्याने केली गंमत
झाकूनी टाकी तोचि भास्कर
यास्तव दिनकर भासे शशीधर
कशी ग केली गम्माडी गंमत
क्षणात तेजोनिधी स्वबळे
उडवुनी लावी पडदे सगळे
अवगुंठन ते दूर सारीले
सोनसळी गळी रविकर पडले
दोन मनांचे मीलन झाले
प्रभातीस मग तेज मिळाले
धुके बिचारे फजित पावले
जग सारे अभिनंदन वदले
— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर
सुंदर