स्टोरी टेलर
चित्रपटनिर्मिती क्षेत्रातील अनुभवावर एका निर्माता – दिग्दर्शकाचे पुस्तक शोधत होतो, अचानक सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री.गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेल्या व डिसेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झालेला ३१२ पृष्ठांचा अतिशय सुरेख ग्रंथच माझ्या हाती आला.
मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्वाचे नाव म्हणजे गजेंद्र अहिरे ! करमणूकप्रधान आणि विनोदी चित्रपटांनी मराठी चित्रपट क्षेत्र व्यापलेले असतांना, गजेंद्र अहिरे यांनी सामाजिक आणि स्त्री प्रधान विषय अतिशय संवेदनशीलतेने आपल्या चित्रपटातून मांडले आणि त्यातून चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख ओळख निर्माण केली !
तसा नाटककार म्हणून या क्षेत्रात आल्यानंतर प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर अनेक दर्जेदार नाटके गजेंद्रजींनी आणली. त्यातील काही नाटके पहाण्याचा योग मला आला. नाटकांनंतर आपल्या चित्रपटात देखील अनेक वेगवेगळ्या कथेतून जगण्यातील वेदना ठळक पध्दतीने मांडत आपला वेगळा ठसा उमटविला. आजपर्यंत मराठी व हिंदी मिळून एकूण ६० आशयघन चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.
केवळ चित्रपट दिग्दर्शक म्हणून एवढीच ओळख मर्यादित न ठेवता गजेंद्रजीनी चित्रपटांसाठी कथा, पटकथा, गीतलेखन, संगीत दिग्दर्शन केले. इतकेच नव्हे तर नृत्य दिग्दर्शन देखील उत्तमोत्तम केले आहे. आता ते विविध पुरस्कारांनी गाजलेल्या प्रस्थापित कलाकारांबरोबरच भारताबाहेरील अनेक प्रयोगशील कलाकारांबरोबर नवनवीन प्रयोग चित्रपटातून करत आहेत. या ‘स्टोरी टेलर‘ पुस्तकात त्याचा तपशीलवार आढावा घेतला आहे !

तसे पाहिलं तर हे पुस्तक म्हणजे एका मनस्वी सर्जनशील दिग्दर्शकाच्या प्रवासाचा उत्तमपणे रेखाटलेले सर्वांगसुंदर आलेखच आहे.
‘स्टोरी टेलर‘ मध्ये दिग्दर्शक म्हणून वीस वर्षांच्या कारकिर्दीत ६० चित्रपटांपैकी १२ निवडक चित्रपटांच्या निर्मिती मागच्या कथा, गजेंद्र अहिरे यांनी सांगितल्या आहेत. कथा पटकथा लेखन, निर्मात्याचा शोध, कलाकारांची निवड, प्रत्यक्ष चित्रीकरण, संकलन, संगीत, प्रसिध्दी अशा अनेक आघाड्यांवर एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून समोर उभी राहिलेली आव्हानं या प्रवासातून समजतात !
याबरोबरच प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीशी अनेक रंजक किस्से आणि बरे, वाईट अनुभवांचं जुळलेलं नात्यांच सडेतोड लेखन त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे ! या सगळ्या गोष्टी चित्रपटांच्या ‘मेकिंग’कडे गजेंद्रजी पुन्हा एकदा बघतात, आणि स्वतःला तपासतात !

या पुस्तकाचे वैशिष्ट्य हे की या क्षेत्रातील आघाडीचे कलाकारही आपले मनोगत मनमोकळेपणाने कथन करतात. गजेंद्रजी यांच्या पुस्तकात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पोस्टकार्ड’. ‘टूरिंग टाँकीज’, ‘सुंबरांन’, ‘बयो’, ‘अनुमती’, ‘द सायलेन्स’, ‘शेवरी’, ‘नाँट ओन्ली मिसेस राऊत’, ‘पिंपळ’, ‘त्या रात्री पाऊस होता’, ‘विठ्ठल विठ्ठल’, ‘डियर माँली,’ या चित्रपटांच्या निर्मितीचा, आव्हानांचा कौशल्याने आढावा घेतला आहे. त्याबरोबर यातील अनेक कलाकारांनी सुबोध भावे, मकरंद अनासपुरे, मिलींद शिंदे, मृण्मयी लागू, नागराज मंजुळे, नीना कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम, प्रोड्युसर सुनील फडतरे आणि पत्नी वृंदा गजेंद्र अहिरे यांनी आपापले अनुभव कथन केले आहेत.
या पुस्तकामुळे चित्रपट क्षेत्रात येऊ इच्छिणारे आणि चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या विभागात प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच या क्षेत्रातील नवोगतांसाठी हे पुस्तक म्हणजे एक संग्राह्य गाईड ठरणार तर आहेच, तथापि सिनेरसिक आणि अभ्यासक, यांना देखील ‘स्टोरी टेलर’ रंजक दस्तऐवज वाटेल !
चित्रपट रसिकांच्या शासकीय पातळीवर गजेंद्र अहिरे यांचा यथोचित गौरव झाला आहे. याची व चित्रपटातील विविध प्रसंगाची छायाचित्रे देखील या पुस्तकात समाविष्ट केली आहेत.
आजपर्यंत त्यांच्या चित्रपटासाठी २१ महाराष्ट्र राज्य पुरस्कार, २ राष्ट्रीय पुरस्कार, ५ आंतरराष्ट्रीय, २ ‘फिल्मफेअर’ पुरस्कार, ७ वेळा इंडियन पँनोरमामध्ये निवड अशा भरघोस पुरस्कारांचे ते व काही कलावंत मानकरी आहेत.
उत्तम कथेला चित्रपटात ढाळून सतत एका सर्जनशील प्रक्रियेत सहभागी राहण्याचा ध्यास असलेल्या गजेंद्र अहिरे यांच्याकडून भारतीय चित्रपट क्षेत्रात उत्तमोतम चित्रपटांची निश्चितच भर पडेल याची ग्वाही ‘स्टोरी टेलर‘ वाचतांना अगदी सहजपणे लक्षात येते हे या पुस्तकाचे मोठे यश मी मानतो !

— परीक्षण : सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक.नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
