‘बापलेकी’
बाप-लेकी हे आपल्या कुटुंबव्यवस्थेतील एक मूलभूत पण धड उमलू न शकलेलं, बरचसं दुर्लक्षित राहिलेलं नातं आहे. म्हणून पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर, विद्या विद्वांस यांनी समाजातील मान्यवर लेखिका, संपादिका व नेहमीच साहित्यात चर्चेत असलेल्या प्रथितयश लेकींकडून तसेच मान्यवर बापांकडून या नाते संबंधात सत्याला धरून अतिशय प्रांजळपणे लिहिलेली मनोगते संपादित केली आहे.
२००४ साली प्रकाशित झालेलं सुमारे ४०० पानांच्या वर पुस्तक नव्हे तर या ग्रंथाची २०१३ मधील सातवी आवृत्ती माझ्या हाती दहा वर्षांनी हाती आली. आणि बाप लेकीच्या नात्यातला विविध टप्प्यांचा, शक्यतांचा, नव्या वळणांचा आणि छटांचा अंदाज आला.
लेकींपैकी विद्या बाळ, प्रतिभा रानडे, सई परांजपे, गौरी देशपांडे, अरुणा ढेरे, प्रिया तेंडुलकर, रजिया पटेल, मोनिका गजेंद्रगडकर, स्मिता भागवत इत्यादी २१ लेकींचा यात समावेश आहे. अर्थात त्यात वरील तिन्ही संपादिकांचाही देखील समावेश आहे.
मान्यवर प्रथितयश साहित्यिक बापांपैकी विजय तेंडुलकर, मे.पुं.रेगे, वसंत गोवारीकर, आनंद अंतरकर, हेमंत कर्णिक, मुकुंद टाकसाळे आदि दहा लेखकांच्या प्रांजळ मनोगतांचा समावेश आहे. तर चौघा समीक्षकांचं विशेष विवेचन देखील आहे.
बापलेकींच्या नात्यांचा रंग नेमका कसा आहे ? लेकीच्या आयुष्यात बापाचं स्थान काय ? लेकींचं संगोपन, जडण घडण, शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, मानसिकता, करियर आणि शेवटी समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून वाढ यात बापाचा वाटा नेमका काय असतो ? ते बाप कितपत समजून घेतात आणि जबाबदारी निभावतात यांचा परामर्श संपादिकांनी या ग्रंथात घेतला आहे.
बाप लेकींचे नाते सामाजिक दृष्टीकोनातून मराठी साहित्य क्षेत्रात मांडण्याचा पहिलाच प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. बाप-लेकींनी देखील आपली मनोगते अत्यंत हृदयस्पर्शी, मनोरम, प्रामाणिक आणि प्रांजळपणे लिहिलेली आहेत. त्यातूनच हाती आलेल्या निरीक्षणातून पारंपरिक कुटुंब व्यवस्थेत बापाचं स्थान कोणतं होतं आणि आज बदलत्या काळात मर्यादित झालेल्या कुटुंब व्यवस्थेत ते कसं असावं या मानसिक गुंतागुंतीचा मानसशास्त्रीय संशोधनात्मक वेध घेण्याचा उत्कट प्रयत्न या ग्रंथात केलेला असल्यामुळे या ग्रंथाचे महत्व अनन्यसाधारण आणि मराठी साहित्यात अतिशय मोलाचे, महत्वाच आहे यांत काही शंकाच नाही. तिघीही संपादिका या या प्रयत्नांत उत्तम पैकी यशस्वी झाल्या आहेत.

– परीक्षण : सुधाकर तोरणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मधमाशी सुंदर फुलांतील मकरंद हळुच काढून आपल्या पोळ्यात मध इच्छुक लोकांसाठी साठवण करते अगदी तसेच तोरणे सर यांनी बापलेकी ह्या सुंदर पुस्तकाचं मकरंद आपल्या पुढे सादर केले आहे. अभिनंदन अभिनंदन
खूप छान परिचय करून दिला आहे.