‘करीअरच्या नव्या दिशा‘
‘करिअरच्या नव्या दिशा’ हे लेखक व महाराष्ट्र राज्याचे निवृत्त माहिती संचालक श्री.देवेंद्र भुजबळ यांचे गेल्या महिन्यात प्रकाशित झालेले द्वितीय आवृत्तीचे सर्वांग सुंदर पुस्तक नुकतेच हाती आले. सुमारे १७० पानांचे हे पुस्तक म्हणजे ज्ञानाचा अप्रतिम खजिनाच असल्याचे निसंग्धपणे म्हणावेसे वाटते.
आजचे युग प्रचंड स्पर्धेचे आहे. त्यात युवक-युवतींनी ठामपणे उभे राहण्यासाठी हे दुसऱ्याआवृतीचे अद्यावत पुस्तक नावाप्रमाणेच करिअरच्या नव्या दिशा दाखविणारे एक अमूल्य मार्गदर्शक स्वरुपाचे आहे. करिअरसाठी धडपडणाऱ्या तरुणाईसाठी ते केवळ माहिती पुस्तक नव्हे तर एक संदर्भ ग्रंथच झाले आहे, यात तीळमात्र शंका नाही.
हे पुस्तक २०१८ मध्ये प्रथम प्रकाशित झाले आणि २०२४ मधील अद्यावत दुसऱ्याआवृतीचे आहे. यात लेखक श्री देवेंद्र भुजबळ यांनी म्हटल्याप्रमाणे “करिअर म्हणजे केवळ एखादा अभ्यासक्रम, नोकरी, किंवा व्यवसाय नव्हे. तर करिअर म्हणजे प्रगतीशील जीवन होय. त्यामुळे करिअर निवडणे म्हणजे आपले पुढील जीवन निवडून संपन्न करणे इतका व्यापक अर्थ करिअर या संकल्पनेला आहे. त्यामुळे आपली आवड, कल, क्षमता बघून करिअर निवडल्यास ते कधीच कंटाळवाणे ठरणार नाही. कधीच ताणतणाव, थकवा जाणवणार नाही. जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात जाईल म्हणून तरुणांना आपली आवड ओळखण्यास हे पुस्तक सहाय्यभूत ठरेल” असा विश्वास सुरवातीलाच व्यक्त केला आहे आणि तो अतिशय योग्य, उचित असा मार्गदर्शक आहे. किंबहुना हे या पुस्तकाचे खरेखुरे सार आहे असेच म्हटले पाहिजे.
या पुस्तकात विविध अभ्यासक्रमांची ओळख, संबंधित नामांकित शासकीय संस्था, अभ्यासक्रम, प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, प्रवेश निवड प्रक्रिया, संस्थेचा संपर्क क्रमांक, संपूर्ण पत्ता संकेतस्थळ ई-मेल इत्यादी महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश केला आहे. अत्यंत उपयोगी महत्वपूर्ण माहितीचा खजिना यात भरलेला आहे. पारंपारिक पद्धतीचे शिक्षण घेऊन त्याच मळलेल्या पायवाटा तुडविण्यापेक्षा नवनवीन शाखा निवडण्यास या पुस्तकामुळे निश्चितच मदत होणार आहे. नवनवीन संधीकडे उघड्या डोळ्यांनी आपण पाहतो असे नाही. नवीन अभ्यासक्रम कलागुणांना, आवडीनिवडींना, कौशल्याला नवे उमेद देऊन भक्कम स्थैर्यता प्राप्त करून देऊ शकतात. या दृष्टीने पुस्तकात तंत्र शिक्षण, व्यवस्थापन, आरोग्य, कृषी ग्रामविकास, शिक्षण संधी, ललित कला, संशोधन आणि शिष्यवृत्ती या भागासंबंधीचे लेखकाने भारत व राज्य सरकारच्या नामांकित शासकीय संस्थेतील सर्व कोर्सेसह आवश्यक बाबींवर अतिशय परिश्रमपूर्वक उत्तमरीत्या लेखन केले आहे. महाराष्ट्रातीलच परंतु वेगळी वाट चोखाळलेल्या विद्यार्थ्यांची ते शिकत असलेल्या अभ्यासक्रमाबाबत, त्यांच्या कोर्सेसच्या भवितव्याबाबत लेखकाने संवाद साधून अद्यावत अशा सर्व अभ्यासक्रमांची माहिती या पुस्तकातून सहजपणे प्राप्त करून देण्याची भूमिका बजावलेली आहे. याशिवाय संबंधित संस्थेचा संपर्क क्रमांक, संकेतस्थळ, संस्थेचा पत्ता, दिल्याने संस्थेची संवाद साधने, तिथपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होण्यास या पुस्तकामुळे निश्चितच मदत झाली आहे. झटपट नोकरी, व्यवसाय, अल्पमुदतीचे रोजगाराभिमुख कोर्स, दहावी बारावी नंतर काय, पर्यटन, दूर शिक्षण, पाककला, सहकार, संशोधन, शिक्षण संधी या आठ क्षेत्रातील अपूर्व संधी बाबतही सविस्तर अशी माहिती लेखकाने प्रामुख्याने अभ्यासपूर्णरीत्या सादर केली आहे.
पुस्तकातील काही अभ्यासक्रम हे दहावी नापास झालेल्या मुला मुलींसाठी आणि दिव्यांगांसाठीही आहेत. त्यामुळे दहावी-बारावी नापास झालेल्या मुला मुलींनी, तसेच दिव्यांगांनी आपली उमेद हरवू न देता असे अभ्यासक्रम करून आपले करिअर घडविण्याच्या दृष्टीने या पुस्तकात लेखकांनी अतिशय सोप्या सरळ, सुटसुटीत भाषेत लेखन केले आहे हे या पुस्तकाचे अत्यंत बहुमोलाचे वैशिष्ट्य मानले पाहिजे.
शासकीय अभ्यासक्रम, नामांकित संस्था, याबाबत अनेक जण तसेच पालकही अनभिज्ञ असतात. अथवा त्यांना अपूर्ण माहिती असते. परिणामी पाल्य, पालक, शिक्षकांना पुरेशी माहिती होत नाही. अनेक अभ्यासक्रमाबाबत तसेच नामांकित संस्थांबाबत अपूर्ण, मोजकीच, माहिती असल्याने पारंपारिक शिक्षणाकडेच विद्यार्थी नेहमी वळतात. त्यांना इतर अभ्यासक्रमांची देखील माहिती व्हावी, अनेक ठिकाणी नवनवीन कोर्सेस आहेत, तिथले शिक्षण चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतो. आपल्या भविष्यातील प्रगतीची दारे खुली करू शकतो, परंतु त्यासाठी हवी असलेली अचूक खात्रीलायक सविस्तर अद्यावत माहिती याची गरज ओळखून महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी हा पुस्तकाचा विडा उचललेला आहे. तो अतिशय उपयुक्त व संग्राह्यअसा आहे. या सर्वां भागांची अतिशय उत्तम शब्दात, प्रभावीपणे मांडणी केलेली आहे. त्यामुळे हवी असलेली माहिती शोधण्यास समजण्यास सोयीचे झाले आहे. याचे एकच उदाहरण विस्तारभयापोटी देत आहे.
ते असे- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम.. या अंतर्गत सेवा उद्योगासाठी रुपये १० लाखापर्यंत, उद्योग क्षेत्राकरिता २५ लाखापर्यंत उपलब्ध करून देण्यात येते. विशेष म्हणजे या योजनेत एकट्या ऐवजी दोन किंवा जास्तीत जास्त पाच लाभार्थींना भागीदारीमध्ये उद्योग व्यवसाय सुरू करता येतो. या योजनेअंतर्गत प्रकल्प मंजूर रकमेच्या वर्गवारीनुसार १५ ते २० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. बँकेच्या कर्जावर प्रचलित दराने व्याज आकारणी व परतफेड करण्याच्या कालावधी तीन ते सात वर्ष असा आहे. उमेदवाराला प्रकल्प किमतीच्या किमान पाच ते दहा टक्के स्वतःची गुंतवणूक करायची असते. उर्वरित रक्कम राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज स्वरूपात अर्जदार उमेदवाराला मिळू शकते. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्जदार विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करू शकतात. या योजनेसाठी अर्जदार कमीत कमी आठवी पास अथवा आयटीआय पास अथवा सरकार मान्य संस्थेतून तांत्रिक स्वरूपाचा कमीत कमी सहा महिन्याचा कोर्स पूर्ण केलेला असावा. त्याचे वय १८ ते ५० वर्ष दरम्यान असावे. ज्या जिल्ह्यात व्यवसाय करायचा आहे, तेथील त्याचे कमीत कमी वास्तव्य तीन वर्षे इतके असावे. विवाहित महिलांसाठी वास्तव्याची अट शिथिलक्षम आहे. या योजने अंतर्गत करता येणाऱ्या उद्योगांची संपूर्ण यादी देखील पुस्तकात देण्यात आली आहे.
ती अशी – सेवा उद्योगाचे ३८ उद्योग. व्यापार उद्योग विभागाचे २७ व्यवसाय, आणि लघु उद्योगांमध्ये तर १७३ उद्योग सुचविण्यात आले आहेत, तो सर्व तपशील आपण पुस्तकातच वाचला पाहिजे. अर्थातच सर्वच कोर्सेस, अभ्यासक्रम यांची माहितीही या पुस्तकात सर्वांनीच वाचली पाहिजे. म्हणूनच पुस्तकाचे मोल ‘अनमोल‘ असे आहे. यात शंका नाही.
खरं म्हणजे हे पुस्तक महाराष्ट्र राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावात, शासनाचे ग्रामविकास विभागाने एकगठ्ठा खरेदी करून ते प्रत्येक गावात पोहचविले पाहिजे इतके ते महत्वाचे आहे. गरजेचे आहे. महाराष्ट्रातील आपल्या सर्व तरुणांना वाचावयास उपलब्ध करून दिले पाहिजे.
अशीच प्रक्रिया शासनाच्या नगरविकास विभागाने नगरपालिका, महानगरपालिका यांना पुरेशा प्रतीत उपलब्ध करून दिले पाहिजे. तसेत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभागाने आपल्या प्रत्येक शाळेत, विद्यालय, महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना पुरेशा प्रतीत उपलब्ध करून देण्यात यावे.
तसेच ग्रंथालय संचालनालयाने आपल्या अनुदानातून महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या ग्रंथालयांना प्रत्येकी किमान दोन चार प्रती उपलब्ध करून दिल्या तर वाचकांना ही माहिती सहजपणे उपलब्ध होईल इतके या पुस्तकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असे मला प्रामाणिकपणे सुचवावेसे वाटते.
‘करिअरच्या नव्या दिशा’ या पुस्तकाचे अप्रतिम मुखपृष्ठ, सुबोध आखणी, मांडणी, उत्कृष्ट, सुबक मुद्रण याबाबत अत्यंत परिश्रमपूर्वक उत्तमरीत्या कार्य करणाऱ्या न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशनच्या प्रकाशिका सौ.अलका भुजबळ यांच्या नियोजन बध्द कुशलतेचा, परिश्रमाचा लेखका इतकाच फार मोलाचा वाटा आहे. त्याबद्ल उभय लेखक-प्रकाशकांचे मनापासून अभिनंदन. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे नवनवीन अभ्यासक्रमांकडे या पुस्तकाद्वारे निश्चितपणे लक्ष वेधून घेइल आणि हे पुस्तक जीवघेण्या तीव्र स्पर्धेच्या युगात तरुणाईच्या जीवनाला निश्चितपणे नवीन दिशा व प्रेरणा देणारे ठरेल यात मात्र मुळीच शंका नाही.
— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नासिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800