‘मागोवा‘
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ‘अवर्सा’ नावाच्या शांत आणि सुंदर खेड्यात जन्मलेल्या रमाकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या बालपणी कधीही पोलिस बघितला नव्हता. अशा ग्रामीण भागातील एका खेड्यातील बेताची परिस्थिती असलेल्या मुलाला महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून पोलीस दलात सेवा करावी लागली, त्या रमाकांत कुलकर्णी यांची ही जीवनकथा त्यांनी स्वतः रेखाटली ही आहे हे माझ्यादृष्टीने तर आश्चर्यकारक वाटते.
या आत्मकथनात देश हादरवणाऱ्या, गाजलेल्या गुन्ह्यांच्या कुलकर्णी यांनी केलेल्या तपासकथांचा समावेश या आहे.
२००६ मध्ये प्रकाशित झालेल्या मुळ इंग्रजी आत्मचरित्राचा अनुवाद जवळपास १७ वर्षांनी माझ्या हाती आला आणि तो मी विलक्षण झपाटून वाचून काढला.
आजच्या तरूण पिढीला मार्गदर्शन व्हावे म्हणून मी रमाकांतजी यांनी संघर्ष करून शिक्षणात मिळविलेल्या उज्वल यशाचा आढावा प्रथमतः घेत आहे.
आवर्सा आपल्या गावातच रमाकांतजी यांनी सातवी पर्यंत चे शिक्षण घेतले. त्यांनी प्रत्येक इयत्तेत पहिला क्रमांक पटकाविला. पुढचे माध्यमिक शिक्षण त्यांनी जवळच असलेल्या अंकोला या आजी आजोबांच्या गावात प्रत्येक इयत्तेत सतत पहिला क्रमांक मिळवून, तसेच राज्य सरकारची शिष्यवृत्ती संपूर्ण जिल्ह्यात पहिला नंबर येऊन संपादित केली.
पुढे मुंबईत मामांकडे राहून एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिष्यवृत्ती व एका ब्यांकेत साठ रुपये पगारावर शिक्षण, प्रत्येक वर्गात सतत पहिला क्रमांकाने येऊन पूर्ण केले. तत्वज्ञान आणि मानसशास्त्र हे विषय घेऊन विशेष प्राविण्यासह पदवी प्राप्त झाल्यानंतर सरकारी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि त्याचवेळी विद्यापीठातल्या अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र विभागात एम.एचा अभ्यास सुरु ठेवला. महाविद्यालयात त्यांना वक्तृत्व आणि काव्य यासाठी बक्षिसंही मिळाली. विद्यार्थी परिषदेवर ते निवडून आले.
कॉलेज शिक्षणानंतर त्यांनी आय. ए. एस.व इतर तत्सम परीक्षांना बसायचं ठरवलं.
तत्वज्ञान, राज्यशास्त्र, आधुनिक मेटाफिजिक्स हे विषय घेतले. इंग्रजी, इंग्रजी निबंध, आणि सामान्यज्ञान विषयात ते सहजपणे उत्तीर्ण झाले. दिल्लीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यु.पी.एस.सी.) त्यांना मुलाखतीसाठी बोलाविले. मित्राचा उसने घेतलेला सुट घालून मुलाखतीसाठी रमाकांतजी गेले. हे सर्व शिक्षण त्यांनी पुर्ण वेळ नोकरी करुन केले. पुढे मुलाखत चांगली झाली. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एन.सी.सी. त उपस्थित रहात असल्याने अध्यक्ष व इतर सदस्यांवर चांगली छाप पडली. आणि एके दिवशी भारतीय पोलीस दलासाठी निवड झालेल्या आय.पी.एस. उमेदवारांच्या यादीत रमाकांतजी यांचे नाव झळकले.
अबू येथील प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांची प्रथम पोलीस उप अधीक्षक (ए.एस.पी.) म्हणून अहमदाबाद (ग्रामीण) येथे नियुक्ती झाली. पुढे ग्रामीण भागात मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे डी.एस.पी म्हणून चार वर्षे कारकिर्द यशस्वीपणे पुर्ण केली.
नंतर मात्र् मुंबई, पुणे, नवी दिल्ली या शहरी भागात विविध पदांवर सी.आय.डी, सी.बी.आय., एस.आय.टी. यांच्या प्रदीर्घ कालावधीत, अनेक अवघड आणि संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासकाम त्यांनी यशस्वीपणे हाताळलं. त्यापूर्वी अंदमानला देखील त्यांनी सेवा केली. हे सर्व नव्या पिढीतील तरूणांना माहित असावे म्हणून विस्ताराने दिले आहे.
गुन्हा अन्वेषणाचं तंत्र फारसे विकसित झालेलं नव्हतं अशा काळात या कामातली निष्ठा, कर्तव्य कठोरता, याबरोबरच मानवी चुकांमुळे कारणमीमांसा शोधत न्यायबुध्दीने वागणा-या अत्यंत बुद्धिमान, प्रामाणिक, आणि ध्येयनिष्ठ रमाकांतजींनी या पुस्तकात गुन्हा अन्वेषकाच्या अनुभवातून चांगला संवाद साधला आहे.
देश हादरवणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासकथात प्रामुख्याने पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या, रामन राघव खून सत्र, मानवत खूनांचं गुढ, वालकाट-डोंझे या आंतरराष्ट्रीय तस्करांची अटक, चंद्रकला लोटलीकर खून प्रकरण, फिरोझ दारूवाला खून प्रकरण, महामार्गावरील खून, राजभवनातील चोरी, एका आय.पी.एस अधिका-याच्या पत्नीचा खून की आत्महत्या या संवेदनशील प्रकरणाचा तपास, कामगार नेते कृष्णा देसाईंची हत्या या आणि अशा अनेक प्रकरणांचा यशस्वी मागोवा घेणारे रमाकांत कुलकर्णी यांनी अतिशय ओघवत्या शैलीत या गुन्ह्यांच्या तपासकामांच्या कथा सांगितल्या आहेत.
रमाकांतजींतील माणूस, अभ्यासक आणि तत्वज्ञ त्यामधून दिसून येतो.
भारताचे ‘शेरलाक होम्स’ म्हणून नाणावलेल्या या पोलीस अधिका-याचा हा ‘मागोवा’रुपी दस्तऐवज नव्या पिढीतील तरूणांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
गुन्हा आणि गुन्हेगार या विषयातले तज्ञ म्हणून दिल्ली येथील नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्रिमिनालाजी आणि फोरेन्सिक सायन्सचे संचालक पद त्यांनी भुषविले. १९८८ मध्ये ते या संस्थेचे अध्यक्ष झाले.युनोतही १९८५ साली भारताचे प्रतिनिधी म्हणून “गुन्हेगारी प्रतिबंध आणि गुन्हेगारांना मिळणारी वागणूक” याविषयावर बोलण्यासाठी उपस्थित होते.
१९५४ साली भारतीय पोलीस सेवेत रुजू झालेले रमाकांत कुलकर्णी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून १९८९ मध्ये निवृत्त झाले.
अतिशय संवेदनशील आणि तत्वज्ञानाची जोड असलेलं मन लाभलेल्या रमाकांतजींना गुन्हेगारांची मानसिकता समजून घेण्याची विलक्षण हातोटी होती. हातात घेतलेलं तपासकाम यशस्वीपणे पूर्ण करून गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत त्यांना चैन पडत नसे.
रमाकांतजी यांची आणखी दोन इंग्रजी पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ‘मागोवा’ पुस्तक नव्या पिढीला आणि पोलीस दलातील अधिकारी यांना सर्वार्थाने मार्गदर्शक ठरेल, यात काही शंकाच नाही.

– परीक्षण : सुधाकर तोरणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800